मराठी गप्पाच्या टीमने वेळोवेळी विविध कलाकारांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे लेख लिहिले आहेत. यात काही उदयोन्मुख कलाकार असतात, तर काही अनुभवी, काही पदार्पण करणारे, तर काही पुनरागमन करणारे कलाकार. आजच्या या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत ज्या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा एका हिंदी मालिकेतून आपल्या भेटीस येणार आहेत. ‘शौर्य और अनोखी की कहानी’ या हिंदी मालिकेतून या अभिनेत्री आपल्या भेटीस येतील. आपल्या पैकी काहींनी बरोबर ओळखलं आहे. आज आपण दीपा परब यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याचसोबत दीपा ह्या मराठीतल्या लोकप्रिय सुपरस्टार अंकुश चौधरी ह्यांच्या पत्नी सुद्धा आहेत.
दीपा यांचा जन्म मुंबईतला. मुंबईतंच बालपण गेलं, पूर्ण शिक्षण झालं. महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. या काळात त्या विविध एकांकिकांमधून कार्यरत होत्या. स्वतःतील अभिनेत्रीला पैलू पाडत होत्या. त्यांनी ऑल द बेस्ट सारख्या तुफान गाजलेल्या नाटकातूनही अभिनय केलेला आहे. त्यांचा अभिनय दिवसेंदिवस प्रगल्भ होत गेला आणि पुढे त्यांनी अनेक मालिका, जाहिरातींमधून कामं केली. मराठीतील ‘दामिनी’ ही त्यांनी केलेली सुप्रसिद्ध मालिका. अशा अनेक मालिकांतून त्यांनी अभिनय केला. हिंदी मालिकांतूनही त्या कार्यरत होत्याच. ‘आँचल के छाव में’, ‘छोटी माँ’ या त्यांनी अभिनित केलेल्या हिंदी मालिका. मालिका जाहिरातींसोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतुनही अभिनय केलेला आहे. मराठा बटालियन, क्षण, चकवा हे त्यांनी अभिनित केलेले काही चित्रपट. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांनी अंड्याचा फंडा या चित्रपटातुन पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर पुनरागमन केलेलं होतं. सध्या त्या ‘शौर्य और अनोखी की कहानी’ या मालिकेत व्यस्त आहेत.
त्यांच्या या प्रवासात त्यांना खंबीर आणि उत्तम अशी साथ लाभली आहे ती त्यांच्या पतीची म्हणजेच अंकुश चौधरी यांची. महाविद्यालयीन जीवनात एकांकिका करत असताना या दोघांची भेट झाली. पुढे मैत्री आणि मग काही वर्षांनी लग्न. आज या गोड जोडीला प्रिन्स नावाचा एक गोड मुलगा सुदधा आहे. आज दीपा या पुन्हा एकदा मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या भेटीस आल्या आहेत. येत्या काळातही विविध कलाकृतींमधून वेळोवेळी त्या त्यांच्या चाहत्यांच्या भेटीस येत राहतील हे नक्की. त्यांच्या मालिकेतील या पुनरागमनासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !