अनलॉकला सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरु करण्याकडे कल दिला गेला. या काळात मालिकांचं थांबलेलं शुटींगही सुरु करण्यास परवानगी दिली गेली होती. अर्थातच सरकारने जाहीर केलेल्या नियमावली पाळूनच. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी या सगळ्या अटी-शर्ती, नियमावली पाळून कामं सुरु केली. पण असं असलं तरीही काही जणांना यात कोविड-१९ ची बाधा झालीच. काही ठिकाणी शुटींग थांबलं हि गेलंय. यांत नुकतीच अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे निवेदिता सराफ जोशी. जेष्ठ अभिनेत्री आणि सध्या सुरु असलेल्या ‘अग्ग बाई सासूबाई’ मालिकेतील आसावरी. झालं असं कि १६ तारखेला त्यांना थोडी सर्दी असल्यासारखं वाटू लागलं. त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या, घरघुती उपाय करू शकल्या असत्या. पण त्यांनी तसं काही केलं नाही.
त्यांचा प्रवास तसा फक्त घर ते शुटींग आणि परत असा असला तरीही, घरी अशोकजी सराफ आणि बाकीची माणसं, तसचं त्या काम करत असलेल्या मालिकेचं अख्खं युनिट. करोना पॉजीटीव असल्यास हा संसर्ग एवढ्या सगळ्या जणांना होण्याचा संभाव. हे टाळण्यासाठी, त्यांनी टेस्ट करण्याचा आणि स्वतःला होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. १९ तारखेला आलेल्या रिपोर्ट मुळे तो निर्णय योग्य ठरला. त्यांनी लगोलग, अशोकजी आणि घरातील बाकीच्यांची टेस्ट करून घेतली. पण, सुदैवाने ती निगेटिव आली. तसेच टेस्ट देण्याच्या दिवशी त्यांनी, मालिकेच्या निर्मात्यांना याची कल्पना दिल्याने त्यांनी सगळे कलाकार आणि बाकीची टीम यांचीही तत्परतेने चाचणी करून घेतली. या मालिकेतील मुख्य कलाकारांसकट, सगळ्यांची टेस्ट सुदैवाने निगेटिव आली.
निवेदिताजी सध्या होम क्वारंटाईन असल्या तरीही येत्या काळात त्यांची टेस्ट निगेटिव येईल आणि लवकरच त्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात करू शकतील असा आत्मविश्वास त्यांना आहे. काही मालिकातील कलाकारांना झालेला करोनाचा संसर्ग, मालिकांच शुटींग थांबणं, आणि कालच झालेलं आशालता ताई यांचं झालेलं दुःखद निधन यामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा आहे, त्यात हि बातमी. तरीही निवेदिता जी पूर्ण बऱ्या होऊन पुन्हा शुटींग सुरु करू शकतील यासाठी आशावादी आहेत. त्यांना कोविड – १९ मधून बऱ्या होण्यासाठी आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी टीम मराठी गप्पा कडून त्यांना शुभेच्छा !
(Vighnesh Khale)