Breaking News
Home / मराठी तडका / खऱ्या आयुष्यात अशी आहे शुभ्रा, बघा तिची जीवनकहाणी

खऱ्या आयुष्यात अशी आहे शुभ्रा, बघा तिची जीवनकहाणी

आपण युट्युबवर अनेक वेळेस मनाला उभारी देणारे विडीयोज पहात असतो. यात टेड टॉकवरील विडीयोज प्रामुख्याने पहिले जातात. कारण, या संस्थेच्या माध्यमांतून फक्त मान्यवरांना बोलण्याची संधी मिळते. अनेक मराठी भाषिक मान्यवर या संस्थेच्या व्यासपीठावर आपले अनुभव मांडून आले आहेत. यातील मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती लक्षणीय. अशाच एका अभिनेत्रीच्या अभिनय प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या गुणी अभिनेत्रीचं नाव आहे, तेजश्री प्रधान. ती कधी प्रेक्षकांची लाडकी जान्हवी असते तर कधी असते लाडकी शुभ्रा. तर कधी एका रियालिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसते, तर कधी चित्रपटांतील नायिका म्हणून प्रेक्षकांना भुरळ पाडताना.

अभिनयाची तिला लहानपणापासून आवड आणि आज याच तिच्या आवडीमुळे विविध भूमिका, माध्यामं यांतून मुशाफिरी करताना ती प्रत्येक वेळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आनंद देत आली आहे. तेजश्रीची सुरुवात झाली ती काही चित्रपटांतील भूमिकांमधून. काही पूर्ण झाले तर काही दुर्दैवाने अपूर्ण राहिले. पण जे पूर्ण झाले ते अगदी हिट ठरले. त्यातील ‘झेंडा’ हा अवधूत गुप्ते यांचा प्रसिद्ध चित्रपट. यातील भूमिकेचं कौतुकही झालं होतं. पुढे शर्यत, लग्न पहावे करून, असेही एकदा व्हावे या चित्रपटांतून तिने भूमिका केल्या. पण ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातील, तरुण वयातली, मंदा आमटे यांची भूमिका आणि ‘ती सध्या काय करते’ मधली नायिका या दोन भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या. मराठीसोबत तिने ‘बबलू बॅचलर’ हा हिंदी चित्रपटहि केला आहे. हा चित्रपट या वर्षी २० मार्चला प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे तो रखडला. अर्थात हे झालं चित्रपटांविषयी.

आपण तिला विशेष ओळखतो ते टी.वी. वरील तिच्या मालिकांसाठी. सध्या चालू असलेल्या ‘अग्ग बाई सासूबाई’ या मालिकेतील शुभ्रा तर विशेष गाजते आहे. आपल्या सासूची काळजी घेणारी, नवऱ्याच्या चुकीच्या वागणुकीवर थेट बोट ठेऊन बोलणारी हि व्यक्तिरेखा. याच्या जवळपास जाणारी पण अजून थोडी निरागस अशी तिची भूमिका गाजली ती ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवीची. हि मालिका चालू असताना जान्हवी हे पात्र इतकं प्रसिद्ध होतं, कि जान्हवी सारखं मंगळसूत्र सुद्धा अनेक स्त्रियांनी बनवून घेतलं होतं. अर्थात जान्हवी सोबतच, श्री हि भूमिकासुद्धा तेवढीच गाजली. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. खऱ्या आयुष्यातही ते एकत्र आले. पण काही कारणांनी ते एकमेकांपासून दुरावले. प्रेक्षकही यामुळे हळहळले. पण आजही श्री आणि जान्हवी या पात्रांवर त्यांनी केलेलं प्रेम हे फार कमी व्यक्तिरेखांच्या नशिबी आलं हे मात्र खरं.

तेजश्रीने या दोन लोकप्रिय मालिकांसोबतच ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’, ‘लेक लाडकी या घरची’ या मालिकांमध्येही लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. तर अशी तेजश्री, प्रत्येक भूमिकेत झोकून देऊन काम करत असताना नाटकासारखं जिवंत आणि रसरशीत माध्यम कसं अव्हेरेल. तिने नाटकातही उत्तम काम केलं आहे. प्रशांत दामले आणि तेजश्री याचं ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक गेल्या काही काळात महाराष्ट्रभर हाउसफुल्ल दौरे करत होतं. तिला काही सांगायचंय, मै और तुम ह्या नाटकांतूनही तिनं अभिनय केला आहे. बबलू बार्बर मध्ये काम करणारे शर्मन जोशी, मै और तुम या नाटकातहि तिचे सहकलाकार होते. हे नाटक गाजलं, अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतली होती.

मालिका, नाटक, चित्रपट यांच्या सोबतच बदलत्या काळाची बिनधास्त माध्यमं असणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्समध्येही तीने काम केलंय. अनकम्फर्टेबल हि शॉर्ट फिल्म तर दखल घ्यावी अशी आहे. यात एकही वाक्य उच्चारलं गेलेलं नाहीये. केवळ चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोली यांचा वापर व्यक्त होण्यासाठी केला गेलाय. युट्युबवर जवळपास सात लाखांहून अधिक जणांनी हि शॉर्ट फिल्म बघितली आहे. लॉ’रिअल या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जाहिरातीत ती झळकली आहे. अभिनयासोबत तिने ‘सूर नवा, ध्यास नवा’ या प्रसिद्ध रियालिटी शोच्या पर्वाचं सूत्रसंचालन केलं आहे. या शोमधील पुष्कराज चिरपुटकर आणि तेजश्री यांची गंमतीशीर नोकझोक प्रेक्षकांना नक्कीच आठवत असेल.

 

याच शोप्रमाणे तेजश्रीने प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. तेजश्री हि नेहमीच कामाला प्राधान्य देत आली आहे. पण जेव्हा तिला मोकळा वेळ मिळतो तेव्हा तिला बाहेर भटकंती करायला खूप आवडतं. तिची खूप जवळची मैत्रीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्यासोबत तिने अनेक ठिकाणी भटकंती केली आहे. त्याचे फोटोज तिने आपल्या चाह्त्यांसमवेत सोशल मिडियावर शेअर केलेलं आहेत. सध्या ती, ‘अग्ग बाई सासुबाई’ या मालिकेत व्यस्त आहे. पण येत्या काळात तिचे बहुप्रतीक्षित ‘बबलू बार्बर’ आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या काळात या चित्रपटांच्या व्यतिरिक्तही तिच्या नवनवीन भूमिका आपल्याला पहायला मिळतीलच, हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.