भारदस्त आवाज, दमदार व्यक्तिमत्व आणि यांच्या जोडीला उत्तम अभिनय ही रवी पटवर्धन यांची ओळख. आपल्या आयुष्यातील बहुतांश काळ रंगमंच, मालिका आणि चित्रपट या माध्यमांतून त्यांनी अभिनय कलेची सेवा केली. त्यांचा हा अखंड केलेला प्रवास २०० चित्रपट, १२५ नाटकं, असंख्य मालिका यांच्या नंतर थांबला. ५ डिसेंबर २०२० च्या रात्री त्यांना आरोग्याविषयी तक्रार वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आणि तिथे त्यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर कलाविश्व, प्रेक्षक यांच्या तर्फे शोक व्यक्त केला जात आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मराठी गप्पाची टीमही या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही आमच्या टीमची प्रार्थना.
रवी पटवर्धन यांनी वयाच्या ६ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं. पुढे एकांकिका, नाटकं यांतून त्यांनी अभिनय प्रवासाला सुरवात केली. १९६४ साली त्यांनी प्रथमतः व्यावसायिक नाटकांतून अभिनय केला. पुढे सव्वाशे पेक्षा जास्त नाट्यकृती त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या. एकच प्याला, तुझं आहे तुझंपाशी, आरण्यक ही त्यांची लोकप्रिय नाटके आजही नाट्यरसिक आणि जेष्ठ कलाकार यांच्या स्मरणात आहेत. त्यांचा पहाडी आवाज, दमदार व्यक्तिमत्व यांमुळे त्यांनी सदैव दमदार व्यक्तिरेखा साकारल्या. नाटकांतून काम करताना त्यांनी चित्रपट आणि मालिका यांतूनही विपुल काम केले. मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपट त्यांनी केले. या माध्यमांतून कारकीर्द घडवत असताना त्यांनी रंगमंचाकडे कधीही पाठ फिरवली नाही. अगदी काही काळापूर्वी त्यांनी आरण्यक ही नाट्यकृती पुन्हा रंगमंचावर होत असताना, त्यात धृतराष्ट्राची भूमिका पुन्हा साकार केली होती. त्यावेळी वयोमान ८० पलीकडे असतानाही त्यांनी कलेच्या प्रेमापोटी दाखवलेला उत्साह हा एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता. त्यांची गेल्या काही काळापासून चालू असलेली ‘अगगं बाई सासूबाई’ ही मालिका शेवटची मालिका ठरली.
यातील त्यांनी साकारलेले आजोबा त्यांच्या तिखट बोलण्याने पण प्रेमळ स्वभावामुळे सगळ्यांच्या लक्षात राहिले. यावरून त्यांच्या अभिनयाची ताकद किती जबरदस्त होती हे लक्षात येते. आज त्यांचं निधन झाल्यामुळे रंगमंच, टीव्ही आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांतील एक सशक्त कलाकार हरपल्याची भावना त्यांच्या चाहते, कलाकार यांच्याकडून व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक कलाकारांनी विविध वाहिन्यांशी बोलताना कलाक्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच एक भारदस्त कलाकार आपल्यातून निघून गेल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राचं नुकसान झाल्याची भावना त्यांच्या प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. मराठी गप्पाच्या टीमकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– Vighnesh Khale