Breaking News
Home / मराठी तडका / अचानक जग सोडून गेले हे मराठी कलाकार, सातव्या नंबरची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती खूप लोकप्रिय

अचानक जग सोडून गेले हे मराठी कलाकार, सातव्या नंबरची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती खूप लोकप्रिय

कोणतीही व्यक्तिरेखा हि कोणत्याही कलाकृतीचा एक ठराविक वेळ भाग असते. एन्ट्री आणि एक्झिट या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय मिळण्यासाठी लेखक, दिग्दर्शक योग्य तो वेळ त्या त्या व्यक्तिरेखांना गरजेनुसार देतात. पण काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या एवढ्या पसंतीस उतरतात कि त्यांची एक्झिट मनाला हुरहूर लावते.

तसच, कलाकार सुद्धा अचानक आपल्या जगाचा निरोप घेतात तेव्हा मन हळहळतं. ती एक अकाली एक्झिट मनाला एक कधी न भरणारी जखम देऊन जाते. अश्याच काही कलाकारांचा आज आपण मागोवा घेणार आहोत. असे कलाकार जे त्यांच्या कालागुणांमुळे प्रसिद्ध पावले पण काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातला.

 

आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे : एखादी कलाकृती ऐन भरात असताना, कलाकाराने अकाली एक्झिट घेणं प्रेक्षकांना घोर लाऊन जातं. असच काहीसं झालं, आनंदजी अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या कलाकारांबाबत.

आनंद अभ्यंकरांना हे आपल्या लक्षात आहेत ते त्यांच्या विविध व्यक्तिरेखांमुळे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्याचं निधन झालं. पण या एवढ्याश्या आयुष्यातही त्यांनी विविध रोल साकारले. मग तो ‘असंभव’ मधील ८५ वर्षाच्या वृद्धाचा रोल असू दे कि ‘फु बाई फु’ मधल्या धमाल विनोदी भूमिका. त्यांनी सगळ्या कलाकारांबरोबर तेवढ्याच ताकदीने कामे केली. मग ते अक्षय पेंडसे यांच्या सारखा तरुण आणि गुणी अभिनेता असू दे कि आई रिटायर होतेय मधे भक्ती बर्वे यांच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करणं असू दे. अक्षय पेंडसे यांनी सुद्धा आपल्या अवघ्या ३३ वर्षांच्या आयुष्यात विविध ढंगी भूमिका केल्या. ते लक्षात राहिले ते ‘काय द्या च बोला’, ‘उत्तरायण’ या सारख्या दर्जेदार कलाकृतींसाठी.

हे दोन्ही कलाकार ‘मला सासू हवी’ या मालिकेत एकत्र काम करत होते. हि मालिका तुफान चालू होती. लोकप्रिय झाली होती. आणि २०१२ साली २३ डिसेंबर ला बातमी आली कि आनंदजी आणि अक्षय हे याच मालिकेच्या शुटींग साठी मुंबई ला परतत होते. आणि तेव्हा झालेल्या वाहन अपघातात, हे दोघेही मृत्युमुखी पडले. त्यांच्या अकाली निधनाने जशी बरीच हळहळ व्यक्त झाली तसेच नंतर बराच काळ, रस्ते अपघातांबद्दल माध्यमांमधून चर्चा होत राहिली.

रसिका जोशी : एक हरहुन्नरी अभिनेत्री. नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांनी मुक्तसंचार केला. आपल्या बिनधास्तपणा मुळे त्या नेहमीच सहकलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. विले पार्लेच्या साठे विद्यालयापासून सुरु झालेला त्यांचा अभिनय प्रवास त्यांच्या निधनाने थांबला. पण, त्यांच्या कामामुळे त्यांनी स्वतःची छाप कायमस्वरूपी सोडली आहे. ‘व्हाईट लिली’ आणि ‘नाईट रायडर’ हे त्याचं गाजलेलं नाटक. त्यांनी हिंदीत सुद्धा काम केले होते. ‘भूलभुलैया’, ‘मालामाल विकली’ ह्या सारख्या लोकप्रिय चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली.

 

आपल्या कामाप्रती त्यांची निष्ठा त्यांच्या नाटक प्रयोगातून दिसून यायची. कला सदर करताना पूर्ण लक्ष कामाकडे असावं, असा त्यांचा कल असे. त्याचमुळे, प्रेक्षकगृहात नियम न पाळणाऱ्या प्रेक्षकांना पुढे येऊन समजावण्यात त्या मागे पुढे बघत नसत. अशा या लढवय्या अभिनेत्रीने कर्करोगालाही झुंजवले. पण या लढाईत मात्र त्या जिंकू शकल्या नाहीत. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी २०११ साली त्याचं निधन झालं आणि मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्र एका गुणी अभिनेत्रीला मुकलं. पण आजही त्यांच्या कलाकृतींमुळे त्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत आणि राहतील.

लक्ष्मीकांत बेर्डे : महाराष्ट्र ज्या व्यक्तींच्या जाण्याने आजही सावरू शकलेला नाही ते म्हणजे लक्ष्मीकांतजी. त्याचं विनोदाचं टायमिंग, सदाबहार विनोदी वाक्य आणि जोडीला सर्वोत्तम अभिनय. पण म्हणून केवळ विनोदी भूमिकांमध्ये त्यांनी स्वतःला जखडून घेतलं न्हवतं. त्यांचा ‘एक होता विदुषक’ याची प्रचीती नक्की देतो. त्यामुळे विनोदी अभिनेता अशी ओळख असली तरीही त्यामुळे त्यांच्या इतर भूमिका विस्मृतीत जात नाहीत. त्यांनी मराठी सोबत हिंदी मधेही लक्षणीय काम केले. मराठी आणि हिंदीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. मराठीतले ‘अशी हि बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘हमाल दे धमाल’ हे त्यांच्या अभिनयाच्या मुकुटातले शिरोमणी.

आपल्या जीवनात अखेर पर्यंत कामाला प्राधान्य देणाऱ्या या अवलिया कलाकाराने त्यामानाने लवकरच निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत अवघ्या ५० व्या वर्षी मालवली. जर तसे झाले नसते, तर आजही आपणाला दर्जेदार विनोदाच्या आणि अभिनयाच्या या बादशाहाला नक्कीच अनुभवता आलं असतं.

 

सिद्धार्थ (सुशांत) रे : अशी हि बनवाबनवी हा चित्रपट महाराष्ट्रात कोणी पाहिला नाही आणि त्याला तो आवडला नाही असा मराठी माणूस विरळा असेल. यातलं प्रत्येक पात्र त्या त्या कलाकारांनी जिवंत केलं होतं. शंतनू हे त्यातलंच एक पात्र. सिद्धार्थ रे यांनी अशोक सराफ (धनंजय माने) ह्यांचा लहान भाऊ, एक प्रियकर या त्यांच्या भूमिकेच्या दोन्ही बाजू मन लाऊन साकारल्या.

सिद्धार्थ रे हे व्ही. शांताराम यांचे नातू. त्यांनी बालकलाकार म्हणून ‘चानी’ या सुप्रसिद्ध सिनेमामधे काम केले होते. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत हि काम केले होते. शाहरुख खान यांच्या बरोबर त्यांनी ‘बाजीगर’ मध्येही काम केले होते. ‘चरस’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. २००४ साली म्हणजे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आलेल्या हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

रंजना देशमुख : मराठी सिनेप्रेक्षकांना रंजना यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. ‘बिनकामाचा नवरा’, ‘चानी’, ‘मुंबईचा फौजदार’ यासारख्या प्रसिद्ध सिनेमांसाठी आपण त्यांना ओळखतो. मराठी सिनेमांमध्ये ७०-८० चे दशक गाजवणारे काही चेहरे होते त्यात रंजनाजी आघाडीवर होत्या. सिनेसृष्टीतील दिग्गज, अशोक सराफ, श्रीराम लागू, कुलदीप पवार, निळू फुले यांबरोबर त्यांनी कामे केली. आपल्या करियरमधे सर्वोत्तम ठिकाणी असताना, त्यांना एका भीषण अपघाताला सामोरे जावे लागले आणि त्यात त्यांचे दोनही पाय निकामी झाले. हालचालींवर निर्बंध आलेले तरही जमेल तेव्हा त्यांनी आपली अभिनय कला जोपासली. अशा या गुणी अभिनेत्रीचे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

स्मिता पाटील : काही कलाकार हे त्यांच्या कलाक्षेत्रात, नैसर्गिकरित्या प्रतिभावान म्हणून नावाजले जातात. त्यांच्या प्रतिभेची झेप एवढी मोठी असते कि त्यांच्या दुःखद निधनानंतर सुद्धा ते त्यांच्या कलाकृतींसाठी ओळखले जातात. या अशा सर्वोत्तम कलाकारांच्या यादीतील आघाडीचं नाव म्हणजे स्मिता पाटील. ७०-८० च्या दशकातील नावाजलेल्या आणि आजही लक्षात राहणाऱ्या अभिनेत्री.

स्वभावाने थेट आणि बिनधास्त. त्यांची हीच प्रतिमा त्यांच्या अनेक भूमिकांमध्ये दिसून येते. त्यांनी प्रायोगिक, व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या कलाकृतींमध्ये भाग घेतला. स्वतःमधे अभिनय कला उपजत असूनही त्यांनी आपल्या कलेला नेहमीच मेहनतीची जोड दिली. त्यांच्या एका सिनेमामधल्या रोल साठी त्यांनी अनेक वेळेस झोपडपट्टीमधे जाऊन तिथल्या लोकांचे निरीक्षण केले. एका प्रथितयश घरात जन्मूनहि केवळ अभिनयाच्या प्रेमापोटी त्यांनी हे केलं, यामुळे त्यांची आपल्या कलेप्रती समर्पित वृत्ती दिसून येते. याच समर्पित वृत्तीमुळे केवळ अवघ्या ३१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अभिनय कलेची खूप सेवा केली आणि त्याचमुळे आजही त्यांची आठवण कलाप्रेमींना नेहमी होतेच. पण त्यांच्या अकाली निधनाने झालेली पोकळी मात्र सच्चा सिनेमाप्रेमींना तशीच कायम दुःख देत राहील.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.