अजिंक्य देव हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी सिनेसृष्टीतील नावाजलेलं असं नाव. छाप पडेल असं व्यक्तिमत्व, दमदार संवादफेक यांमुळे आपल्याला ते नेहमीच लक्षात राहतात. त्यांनी केलेल्या भूमिकाही त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशा होत्या. त्यांनी केलेले वॉरियर क्वीन ऑफ झांसी, तान्हाजी हे त्यांचे नजीकच्या काळातील सिनेमे. त्यांनी दीडशेच्या आसपास सिनेमे केले आहेत, त्यातले हे काही. पण त्यांच्या या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीला ज्या सिनेमाने सुरुवात झाली आणि आजही प्रेक्षक ज्या सिनेमामुळे ओळखतात तो म्हणजे सर्जा. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक मानाचा तुरा. या सिनेमावेळी त्यांचं कॉलेज जीवन संपत आलेलं होतं. त्यावेळी हा सिनेमा प्रसिद्ध झाला. हा सिनेमा आला आणि पुढील सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काळात त्यांचं लग्न झालं.
अजिंक्यजींनी त्यांची कॉलेजमधील जिवलग मैत्रीण आणि पुढे प्रेयसी झालेल्या आरती यांच्यासोबत लग्न केलं. लग्न होण्याअगोदर चार वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांची भेट झाली होती ती कॉलेज मध्येच. अजिंक्य हे त्यावेळी सिनेमातून काम करत नव्हते. कॉलेजमधला एकत्र वावर यांच्यामुळे आरतीजी आणि अजिंक्यजी यांच्यात मैत्री निर्माण झाली होती. अजिंक्य यांना आरती यांच्याविषयी प्रेमही वाटू लागलं होतं. एके दिवशी त्यांनी आपल्या मनातल्या भावनांना व्यक्त केलं. पण आरतीजींकडून काहीही उत्तर आलं नाही, उलट त्या रडायला लागल्या. अजिंक्यजी एकदा या आठवणींना उजाळा देताना म्हणाले होते कि या रडण्यामागे खरं कारण तर होकार होता, हे त्यांना काही काळाने कळलं. पण त्यावेळी मात्र दोघांनी काहीच न बोलणं पसंत केलं. काही काळ गेला, पण आरतीजींकडून उत्तर येईना. मग मात्र अजिंक्यजींनी पुन्हा विचारलं. ‘जर तुला मी आवडत नसेन तर बोलूयाही नको, मी दूर जातो’ अशा आशयाचे ते बोलले. मग मात्र आरतीजींनी आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. होकार दिला. पण आधी सांगितल्या प्रमाणे या क्षणा पासून ते लग्न होईपर्यंत चार वर्षे गेली. तो पर्यंत दोघांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. कारकिर्दीची सुरुवातही केली होती. सगळं स्थिर स्थावर होण्यास सुरुवात झाल्यावर मग त्यांनी लग्न केलं.
आज तीन दशकांहून अधिक काळ ते एकत्र आहेत. या काळात अनेक स्थित्यंतरं आली आणि गेली. पण दोघेही परीस्थिला शरण जाण्याऐवजी, त्यातून तावून सुलाखून निघाले, संसाराचा हा गाडा दोघांनी हिंमतीने पेलला. मुलांचं संगोपन, आपलं काम, व्यवसाय, शिक्षण, छंद, बाकीचं कुटुंब हे सांभाळताना दोघांनीही उत्तम समतोल साधला. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली. एकमेकांना समजून घेणं, परिस्थितीनुसार स्वतःत आणि जोडीदारात कराव्या लागणाऱ्या बदलांचा समतोल साधणं, एकेमेकांच्या कारकिर्दीत खंबीरपणे साथ देणं हे त्यांच्या नात्याला बांधून ठेवणारे काही महत्वाचा घटक आहेत असं सतत जाणवत राहतं. या जोडीच्या मुलाखती ऐकल्यानंतर त्यांच्यात असलेल्या निखळ प्रेमाची प्रचिती येते. अशा या प्रेमळ जोडीला, मराठी गप्पाच्या टीम कडून पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)