Breaking News
Home / मराठी तडका / अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी हे लोकप्रिय मराठी कलाकार इथे नोकरी करायचे, बघा

अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी हे लोकप्रिय मराठी कलाकार इथे नोकरी करायचे, बघा

कलाक्षेत्राची चमचमत्या ताऱ्यांची दुनिया आपल्या सगळ्यांनाच भुरळ पाडते. कलाक्षेत्रात येणं हे आपल्या पैकी अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक जण झटत असतात. काही जण पूर्ण वेळ या क्षेत्रात कार्यरत होतात, तर अनेक जण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून या क्षेत्रात उतरत असतात. काहींचा प्रवास हा सुरुवातीस नोकरी आणि मग पूर्ण वेळ कलाक्षेत्र असाही होतो. एकूणच काय तर, ज्यांना या क्षेत्रात यायचं असतं आणि या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं ते अनेक बाबतीत तारेवरची कसरत करत प्रवास करत असतात. अशाच काही मराठी सेलिब्रिटीजच्या प्रवासाविषयी आपल्या टीमला थोडीशी माहिती मिळाली. आणि जे आपल्या टीमला कळतं, ते आपली टीम आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवत असते. चला तर मग, आज जाणून घेऊयात अशा कलाकारांविषयी ज्यांनी कलाक्षेत्राव्यतिरिक्त ही काम केलं आहे आणि कलाक्षेत्रात कारकिर्दीही केली आहे.

किरण गायकवाड :
देवमाणूस या मालिकेचा विषय निघाला आणि किरण गायकवाड या गुणी नटाचं नाव आठवलं नाही तरच नवल. शालेय जीवनापासून अभिनयात गती असलेला हा अभिनेता शिक्षण घेतल्यानंतरच्या काळात पुण्यातील महिंद्रा कंपनीत नोकरीला होता. पुढे अर्थातचं कालाक्षेत्रकडे असलेला ओढा आणि मिळालेलं प्रोत्साहन यांच्या जोरावर त्याचा मोर्चा या क्षेत्राकडे वळला. मूलतः असणारी अभिनय क्षमता आणि तिचा किरण याने केलेला उत्तम वापर यांमुळे त्याच्या प्रत्येक भूमिकेत त्याने रंग ओतले. त्यामुळे प्रत्येक भूमिका लोकप्रिय होत गेली आणि पुढे जो घडत गेला, घडतो आहे तो इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. किरण आजच्या घडीचा एक आघाडीचा अभिनेता आहे हे त्याचमुळे. येत्या काळातही त्याच्याकडुन अनेक उत्तमोत्तम कलाकृतींतून लोकप्रिय व्यक्तिरेखा साकार होताना पाहायला मिळतील हे नक्की.

रुक्मिणी सुतार :
देवमाणूस ही मालिका जशी डॉक्टर या मुख्य व्यक्तिरेखेच्या काळ्या कारवायांनी गाजली, तशीच सरु आजींच्या मिश्किल, टोकदार म्हणींनी सुद्धा. या म्हणींच्या काचाट्यातुन कोणीही सुटू शकलेलं नाही. सिम्पल नसणारी डिंपल आणि टोन्या हे तर नेहमीची या म्हणींनी घायाळ झाले. या म्हणींवर महाराष्ट्राने ही प्रेम केलंय. तर अशी ही लोकप्रिय व्यक्तिरेखा साकार केली आहे रुक्मिणी सुतार यांनी. कलाक्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी आपली छाप सोडली आहेच. त्याआधी बराच काळ त्या सरकारी सेवेत रुजू होत्या हे कळून येतं.

गायत्री बनसोडे :
देवमाणूस या मालिकेतील रेश्मा ही व्यक्तीरेखा साकार करणारी ही अभिनेत्री. तिचा उत्तम अभिनय, बोलके डोळे आणि बिनधास्त वागणं यांमुळे ती अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. देवमाणूस ही तिच्या कारकिर्दीतील एक महत्वाची मालिका. त्याचप्रमाणे गायत्री हिची मुख्य भूमिका असलेली ‘जेव्हा गर्लफ्रेंड शिव्या देते’ ही वेबसिरीज सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इतकी गुणी अभिनेत्री त्यामानाने अभिनय क्षेत्राकडे अंमळ उशिराच आली. आधी तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. मग एका कंपनीत सेल्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी ही चालू होती. पण मग ओळखीच्यांपैकी कोणी तरी तिला नाटकांतून अभिनय करण्याविषयी सुचवलं. मग नाटक आणि वाचन हे तर तिच्या आयुष्यातले अगदी महत्वाचे भाग बनले. त्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आजपर्यंत तिने या क्षेत्रांत केलेली घोडदौड. यापुढेही तिची कलाक्षेत्रातील घोडदौड चालू राहील हे नक्की.

सोनाली पाटील :
देवमाणूस या मालिकेत येणारे ट्विस्ट हमखास एखादं नवीन पात्र घेऊन येत असतात. आर्या देशमुख हे असंच प्रेक्षकांसमोर आलेलं पात्र. हे पात्र साकारणारी अभिनेत्री आपल्या परिचयाची आहेच. सोनाली पाटील या गुणी अभिनेत्रीने साकारलेली ही भूमिका जशी लोकप्रिय होते आहे, तशीच तिने साकारलेली ‘वैजू’ ही व्यक्तिरेखाही प्रसिद्ध झाली होती. खरं तर गायत्रीला अभिनय क्षेत्रात येण्याची खूप इच्छा होती. तिचं शिक्षण पूर्ण होत असताना आणि नंतरही तिचं एकांकिका आणि नाटकांतून काम करणं चालू होतं. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ती सिनिअर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम केले आहे. जवळपास तीन वर्षे नोकरी आणि अभिनय यांचा ताळमेळ साधत तिने प्रवास केला. पुढे तिच्या मेहनतीची फळं म्हणजे प्रथितयश कलाकृतींतून तिला अभिनय करण्याची संधी मिळू लागली. तिनेही त्या संधीचं सोनं केलं आणि आज ती एक उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून नावारूपास येते आहे.

माधवी निमकर :
सध्या मालिका क्षेत्रात ज्या खल पात्रांची चलती आहे त्यापैकी एक नाव म्हणजे शालिनी. ही भूमिका साकार केली आहे माधवी निमकर यांनी. उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना आणि आरोग्य जपणाऱ्या योगा गर्ल ही त्यांची ओळख. पण आज त्यांना मिळत असलेलं यश हे काही एका रात्रीत आलेलं नाही. त्यांनी काम करताना राखलेलं सातत्य, मेहनत, तारेवरची कसरत करत केलेला प्रवास हा त्यांच्या यशाचा महत्वपूर्ण भाग आहे. या प्रवासात सुरवातीस त्या काही काळ एका कंपनीत काम करत असत. अभिनय आणि हे काम यांच्यात ताळमेळ साधताना त्यांची दमछाक होत असे, पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी त्यांचा प्रवास चालूच ठेवला. त्याची परिणीती म्हणजे आज त्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. यापुढील काळातही त्यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम कलाकृती सादर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील हे नक्की.

रुपाली भोसले :
आई कुठे काय करते या मालिकेतील आघाडीचं पण खल भूमिकेतील नाव म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा साकार केली आहे रुपाली भोसले यांनी. रुपाली यांचा प्रवास जाणून घेताना त्यांच्या आयुष्यात जे चढ उतार आले ते पाहता त्यांनी केलेला प्रवास हा स्पृहणीय आणि कौतुकास्पद ठरतो. आपल्या कुटुंबास हातभार लागावा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कामं केली. त्या एका कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणूनही कामाला होत्या. तिथलं काम आणि अभिनयाची आवड सांभाळत त्यांनी बराच काळ तारेवरची कसरत केली. पुढे त्यांना यश मिळालं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्या या क्षेत्रापासून दूर गेल्या. पण काही काळाने त्या पुन्हा परतल्या. पण त्यांचा हा कमबॅक एवढा जबरदस्त होता. त्यांची हीच जिद्द त्यांना आजच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या लिस्ट मध्ये वरच्या स्थानावर घेऊन जाते. त्यांच्या जिद्दीला सलाम.

सुबोध भावे :
बायोपिक म्हणजे सुबोध भावे असं काही काळापूर्वी एक समीकरण तयार होतं की काय अशी परिस्थिती तयार झाली होती. इतक्या दिग्गज व्यक्तिमत्वांची आयुष्यं त्यांनी चित्रपटात चितारली आहेत. ते ही अगदी खुबीने आणि अभ्यासू वृत्तीने. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही व्यक्तिरेखेची सरमिसळ झाली नाही. याव्यतिरिक्त त्यांच्या अन्य भूमिकाही गाजल्या आहेत हे आपण जाणतोच. अशा या गुणी कलाकाराने कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात एका प्रायव्हेट कंपनीत सेल्स विभागात नोकरी केली होती. ती नोकरी आणि अभिनय क्षेत्रात काम करणं चालू होतं. यथावकाश पुढे कलाक्षेत्रात कारकिर्दी घडवायची असा विचार करून या क्षेत्रात पूर्णवेळ काम करणं स्वीकारलं. पुढे त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा रंगवल्या. मग ती नायक असो वा खलनायक. त्यांच्या प्रत्येक व्यक्तितेखेची मोहिनी आजही आपल्या सगळ्यांच्या मनावर कायम आहे आणि येत्या काळातही ती तशीच राहील हे नक्की.

तर वाचकहो, आपल्या लाडक्या कलाकारांपैकी ज्यांनी ज्यांनी या कलाक्षेत्रात येण्यापूर्वी एखाद्या ठिकाणी नोकरी केली होती त्यांची संक्षिप्त यादी आपण वर दिली आहेच. पण आपणही जाणता की ही पूर्ण यादी नाही. पण सध्या लेखाची मर्यादा असल्यामुळे केवळ निवडक लोकप्रिय कलाकारांविषयी लिहिलं आहे. येत्या काळात या विषयावर आपल्या टिमकडून अजून लिखाण होईल हे नक्की. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल असा विश्वास आहे. आपण वाचक म्हणून नेहमीच आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. त्यामुळे आमच्यात टीमचा नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा उत्साह दुणावतो. तेव्हा आपला हा पाठींबा यापुढेही आम्हाला लाभू दे ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *