गेल्या दशकभरात अनेक विनोदी रियालिटी शोज आपण बघितलेले आहेत. आपल्या धकाधकीच्या जीवनाला हास्याची सोनेरी किनार देण्याचं काम या शोज नी केलेलं आहे. यातही काही कलाकार तर आपल्याला विशेष लक्षात राहतात. कुशल बद्रिके हे या मांदियाळीतलं सगळ्यांत वरचं नाव. चला हवा येऊ द्या ही जणू क्रिकेट पिच आहे आणि त्यावर आपल्याला बॅटिंग करायची आहे या हिशेबाने कुशल हे नेहमी काम करत असतात. प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण दाखवताना आपली निरीक्षण शक्ती आणि कल्पकता यांचा पुरेपूर वापर करणारा हा अष्टपैलू कलाकार. यांच्या जोडीला शाब्दिक कोट्यांचं भांडार हे असतंच. असा हा आपला हरहुन्नरी कलाकार जसा चला हवा येऊ द्या मधील कामासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच सिनेमे, वेब सिरीज साठीही प्रसिद्ध आहे. बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, खेळ मांडला आणि स्ट्रगलर साला ही यातील काही प्रातिनिधिक उदाहरणं.
एक उत्तम कलाकार हा तेवढाच संवेदनशील माणूस असतो. कुशल हे याचं उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या कविता, त्यांनी संकटग्रस्तांना वेळोवेळी केलेली मदत यातून त्यांच्या मनाची एक हळवी बाजू समोर येते. ही संवेदनशीलता येते ती अनुभवातून. अतिशय प्रतिकूल परिस्थितून कुशल यांनी वाटचाल करत आज लोकप्रिय कलाकार होण्याचा मान मिळवलेला आहे. यात अनेक अडथळे आले, चढ उतार आले पण कुशल आपली वाट चालत राहिले. यश अपयश यांचा खेळ चालू होता पण ध्येय नक्की होतं आणि इरादे अगदी खंबीर. या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना खंबीरपणे साथ लाभली आहे ती त्यांच्या पत्नीची. त्यांची पत्नी म्हणजे सुनैना बद्रिके. स्वतः उत्तम अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना असणाऱ्या सुनैना या कुशल याच्या पाठीशी नेहमीच अगदी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. या दोघांची पहिली ओळख झाली ती एकांकिकांच्या माध्यमातून. एका एकांकिकेमध्ये कुशल हे अभिनय करत होते. तर दुसऱ्या एकांकिकेत सुनैना होत्या. सुनैना यांनी ती फुलराणी मधील भूमिका साकार केली होती असं कळतं. दोघांनाही त्या स्पर्धेत पारितोषिके मिळाली.
सोबतच कळत नकळतपणे कुशल यांना सुनैना आवडायला लागल्या होत्या. नंतर एक सुदैवी योगायोग जुळून आला. जेव्हा एका नाट्यकृतीच्या माध्यमातून हे दोघे एकत्र अभिनय करते झाले. यावेळी सहवास वाढला आणि मैत्री वाढली. या काळात या दोघांमधील अभिनय कला जशी फुलत गेली तसंच प्रेम सुद्धा. पुढे ऐके दिवशी सुनैना यांनी कुशल यांना प्रपोज केलं. कुशल यांनी अर्थातच हो म्हंटलं. याबाबतीत घरी सांगितल्यावर थोडा वेळ गेला, पण यथावकाश दोन्ही कुटुंबांनी होकार दिला आणि या आपल्या आवडत्या जोडीने लग्न केलं. आज या जोडप्याला एक छोटा मुलगा आहे. या तिघांनाही आपण अनेक व्हिडियोज मधून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे. खासकरून त्यांनी नजीकच्या काळात क’रोनाबद्द्ल प्रबोधनात्मक असा जो व्हिडियो केला होता तो खूप लोकप्रिय झाला आहे. याव्यतिरिक्त ही अनेक व्हिडियोज मधून आपण त्यांना बघत आलेले आहोतच. यात कुशल यांनी तयार केलेले छोटे विनोदी व्हिडियोज जसे असतात, तसेच काही व्हिडियोज मधून सुनैना यांनी साकार केलेले नृत्याविष्कार ही पाहायला मिळतात.
स्वतः उत्तम कथक नृत्यांगना असणाऱ्या सुनैना या उत्तम कथक शिक्षिका आहेत हे आपण जाणतोच. असं हे आपलं आवडतं कलाकार जोडपं. गेल्याच एप्रिल महिन्यात या जोडीच्या लग्नाचा वाढदिवस झाला. आजच्या या लेखाच्या निमित्ताने या जोडीला मराठी गप्पाच्या टिमकडून त्यांच्या यशस्वी आणि सुखी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! आपल्या वाचकांप्रति मराठी गप्पाची टीम सदैव तत्पर असते. आपल्याला आवडणाऱ्या विषयांवर आपली टीम सातत्याने लेखन करत असते. त्यात मनोरंजन विश्वातील बातम्या, वायरल व्हिडियोज वरील लेख आणि बरेच विषय समाविष्ट असतात. आपणही ते नियमितपणे वाचता. शेअर ही करता. यांमुळे आमच्या टीमला प्रोत्साहन मिळत राहतं. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन देणं चालूच ठेवा. आपला लोभ कायम आमच्या टीमसोबत असू द्या. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!