Breaking News
Home / मराठी तडका / अभिनेता शरद केळकरची पत्नी आहे हिंदी अभिनेत्री, बघा ह्या मराठमोळ्या अभिनेत्याची जीवनकहाणी

अभिनेता शरद केळकरची पत्नी आहे हिंदी अभिनेत्री, बघा ह्या मराठमोळ्या अभिनेत्याची जीवनकहाणी

अनलॉक प्रक्रियेत सिनेमागृह ५०% क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण तरीही प्रेक्षक संख्या कमी असण्याच्या कारणामुळे अनेक सिनेमागृहे अद्याप उघडलेली नाहीत. अशा वेळी एक नवं माध्यम आपल्या मदतीस धावून आलं आहे. सरत्या लॉकडाऊनमध्ये या नवीन माध्यमाचा उपयोग अनेक सिनेमानिर्मात्यांनी एव्हाना करून घेतलेला आहेच. ओ.टी.टी. (O.T.T.) हे ते नवीन माध्यम. अनेक जुने नवीन सिनेमे या माध्यमांतून आपल्या भेटीस आले आहेत. या मांदियाळीतील एक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. लक्ष्मी असं या सिनेमाचं नाव. बहुप्रतीक्षित असा हा सिनेमा. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरीही यातील एका अभिनेत्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक सध्या सोशल मिडियावरून होतं आहे. या अभिनेत्यावर चहूबाजूंनी प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे हा मराठमोळा अभिनेता आहे. नाव आहे, शरद केळकर.

लक्ष्मी या सिनेमात शरद केळकर ह्यांनी एका तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेची लांबी कमी असली तरीही अभिनय इतका जबरदस्त आहे कि अनेक जण त्यांच्या भूमिकेवर फिदा आहेत. यातील एक चाहता तर असंही म्हणतो कि तुम्ही या भूमिकेत जेव्हा रडलात तेव्हा मलाही माझे अश्रू अनावर झाले. प्रेक्षकांसामावेतच अनेक कलाकारांनीही शरद यांचं कौतुक केलं आहे. शरद यांच्या या लोकप्रिय होत असलेल्या भूमिकेच्या निमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. शरद केळकर यांनी आपल्या कलाप्रवासाची सुरुवात केली ती मॉडेल म्हणून. मॉडेलिंग करता करता त्यांनी हिंदी मालिकांमधून नायक आणि खलनायक अशा भूमिका करणं सुरु केलं. शैतान – क्रिमिनल माइंड, बैरी पिया, कोई लौट के आय है, एजंट राघव, उतरन, आक्रोश, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे, कहीं तो होगा ह्या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. यातील काही मालिकांमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत म्हणजेच कीर्ती गायकवाड-केळकर यांच्या सोबत काम केलेलं आहे.

कीर्ती याही उत्तम कलाकार आहेत. त्या उत्तम अभिनेत्री आणि चित्रकार आहेत. ‘ससुराल सिमर का’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी सिमर हि मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तसेच शरद आणि कीर्ती हे जोडपं नच बलियेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होतं. अभिनेता म्हणून काम करताना त्यांनी आपल्या भरदार आवाजात काही कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलेलं आहे. आवाजातील भारदस्तपणा यांमुळे त्यांनी अनेक भाषांतील कलाकृतींना स्वतःचा आवज दिलेला आहे. यातील एक प्रसिद्ध कलाकृती म्हणजे ‘बाहुबली’ सिनेमातील बाहुबली या मुख्य व्यक्तिरेखेला दिलेला आवाज. तसेच हॉलीवूडच्या हॉब्स अँड शॉ या सिनेमातील जेसन स्टॅथम याच्या व्यक्तिरेखेला आवाज दिलेला होता. अशाच प्रकारे त्यांनी अनेक पसिद्ध व्यक्तिरेखांना आपला आवज दिला आहे. काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘आर्या’ या कलाकृतीत साठीहि त्यांनी डबिंग केलेलं होतं. सिनेमातील व्यक्तिरेखांसाठी आपला आवाज प्रदान करताना त्यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केलं आहे हे आपल्याला माहिती आहेच. ‘तान्हाजी’ या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमाप्रमाणेच त्यांनी इतरही अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.

हिंदीत त्यांनी राम-लीला, भूमी, बादशाहो, इरादा हे सिनेमे सुरुवातीस केले. पुढे रॉकी हँडसम, हिरो द फिल्म, गोलमाल ४, सरदार गब्बर सिंग या सिनेमातूनही त्यांनी अभिनय केला. नायक, खलनायक, विनोदी भूमिका अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी या काळात साकारल्या. हिंदीत अशी हि मुशाफिरी चालू असताना, मराठीतही त्यांनी लय भारी या सिनेमातून पदार्पण केलं. यात ‘संग्राम’ हा खलनायक त्यांनी रंगवला. या त्यांच्या भुमिकेसाठी त्यांना ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ खलनायक हा पुरस्कारही मिळाला. पुढे त्यांनी संघर्षयात्रा या सिनेमाच्या माध्यमांतून कै.गोपीनाथजी मुंडे साहेब यांची व्यक्तिरेखा साकारली आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या लोकप्रिय सिनेमांसोबत त्यांनी यंग्राड, माधुरी, राक्षस या सिनेमांमधून अभिनय केला आहे. तसेच इडक या मराठी सिनेमाची निर्मितीतही हातभार लावला. यात कीर्ती या त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत होत्या. मालिका, सिनेमा आणि डबिंग या क्षेत्रांमध्ये रमत असताना त्यांनी नव्याने येऊ घातलेल्या वेब सिरीज मध्येही कामे केली आहेत. द फॅमिली मॅन ह्या गाजलेल्या वेब सिरीजचा ते एक भाग होते. तसेच ब्लॅक विडोज, रंगबाज या त्यांच्या अन्य वेब सिरीजहि गाजल्या. यासोबतच त्यांनी जाहिराती, म्युझिक विडीयोज मधूनही अभिनय केलेला आहे. त्यांची गाजलेली जाहिरात म्हणजे त्यांचे आवडते अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांच्या समवेत केलेली जाहिरात. तसेच मजबुरीयां हा त्यांचा एकमेव म्युझिक विडीयो. या म्युझिक विडीयोला आत्तापर्यंत ५७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

कलाक्षेत्रांतील या अशा विविध माध्यमांतून शरद यांनी आपला अभिनय केलेला आहे. नायक, खलनायक, विनोदी अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. सध्या लक्ष्मी या सिनेमाला मिळत असलेला अमाप प्रतिसाद पाहून त्यांची हि दोन दशकांच्या काळात कलाक्षेत्रात घेतलेली मेहनत कशी फलद्रूप होते आहे हे पाहायला मिळते आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्यांच्या कारकिर्दीत ते सतत प्रयोगशील राहिलेले दिसतात आणि त्यामुळे कधीच एका विशिष्ठ प्रकारच्या भूमिकेत अडकून पडलेले दिसत नाहीत. येत्या काळातही त्यांचा पहिला तामिळ सिनेमा प्रदर्शित होईल. अयालान (Ayalaan) असं त्याचं नाव. सिनेमाच्या पोस्टरवरून हा सिनेमा एलियन भोवती फिरणारा साय फाय कॉमेडी सिनेमा असावा असं दिसतंय. तसेच दरबान हा सिनेमाही येत्या काळात आपल्या भेटीस येईल. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेते बिपीन नाडकर्णी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं असून, रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कथेवर आधारित हा सिनेमा आहे. आत्ता पर्यंत शरद यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत योग्य ते रंग भरले आहेत. नजीकच्या काळात येऊ घातलेले हे सिनेमीही त्याला अपवाद नसणार हे नक्की. मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांचं प्रथमतः लक्ष्मी सिनेमातील भूमिकेच्या यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि येत्या काळातील कलाकृतींसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.