Breaking News
Home / मराठी तडका / अभिनेत्री कृतिका देव हिचा पती आहे मराठी अभिनेता, बघा जीवनकहाणी

अभिनेत्री कृतिका देव हिचा पती आहे मराठी अभिनेता, बघा जीवनकहाणी

काही दिवसांपूर्वी आपण अभिषेक देशमुख या उभरत्या कलाकाराविषयी मराठी गप्पावर एक लेख वाचला असेलंच. अभिषेक हा सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधतीच्या मुलाच्या भुमिकेसाठी खूप लोकप्रिय झाला आहे. या लेखाच्या निमित्ताने अभिषेक याची पत्नी कृतिका देव हिच्या कामाविषयी सुद्धा थोडं लिहिलं होतं. पण तिचं काम फक्त तेवढ्यावरच मर्यादित नाहीये. तिने फार कमी काळात नाटक, सिनेमा, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, मालिका, जाहिराती अशा विविध माध्यमांतून भूमिका केल्या आहेत. तसेच ती उत्तम नृत्यांगना आणि निवेदकही आहे. नुकतीच तिची अमिताभ बच्चन, मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत रिजर्व बँक ऑफ इंडियाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या निमित्ताने कृतिकाच्या कलाजीवनाचा घेतलेला आढावा.

कृतिकाला नाटकांची खूप आवड. आपल्या कॉलेज जीवनात तिने अनेक नाटकांत कामे केली आहेत. त्यातील दोन प्रामुख्याने नाव घ्याव्या अशा कलाकृती म्हणजे म्हणजे सावल्या आणि ओ ! फ्रिडा. यातील “ओ ! फ्रिडा” हे फ्रिडा कोएलोच्या जीवनावर आधारित आणि अभिषेक देशमुख लिखित आणि दिग्दर्शित नाटक होतं. या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या जीवनावर आधारित या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयोग झाले आहेत. आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्स मध्ये या नाटकाची वाहवा झाली. कृतिकाने नाटकांसोबतच टेलीविजनच्या पडद्यावरही काम केलं आहे. “इंटरनेट वाला लव” हि तिची पहिली मालिका. या मालिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. नाटक आणि मालिका यांच्यासोबत तिने मराठी, हिंदी सिनेमांत कामेही केली आहेत. ‘राजवाडे आणि सन्स’ हा तिचा मराठीत गाजलेला सिनेमा. नुकतंच काही वर्षांपूर्वी तिने ‘बकेट लिस्ट’ या मराठी सिनेमात माधुरी दीक्षित यांच्यासोबत एक महत्वाची भूमिका बजावली. मराठी सोबत तिने हिंदीतही चांगलं काम केलं आहे. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला पानिपत या हिंदीमधील बिग बजेट सिनेमात तिची महत्वपूर्ण भूमिका होती. अन्या, हवाईजादा या हिंदी सिनेमातही ती होती. अन्या या सिनेमात तिने प्रथमेश परब बरोबर काम केलं आहे. पुढे हीच जोडी ‘प्रेम हे’ या मालिकेत दिसली होती.

नाटक, सिनेमा, मालिका यांच्यासोबतच बदलत्या काळानुसार प्रसिद्ध झालेल्या शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीज या माध्यमांतूनही अभिनय केला आहे. डिलिवरी गर्ल, अब मेरी बारी, देरू या तिच्या शॉर्ट फिल्म्स आणि डेट गॉन व्रॉंग हि तिची वेबसिरीजहि गाजल्या आहे. अभिनयासोबत तिला इतर कलांतही रस आहे. तिने निवेदन केलं आहे. तसेच तिने कथ्थकचे प्रशिक्षणसुद्धा घेतले आहे. ती मुगल ए आजम या नृत्याच्या अतिशय उत्तम कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. तिच्या चाहत्यांसाठी तिने तिचे काही नृत्याचे विडीयोज सोशल मिडिया वर अपलोडहि केले आहेत. एकंदरच तिचा प्रवास हा अवघ्या काही वर्षांचा पण तितकाच वैविध्यपूर्ण आहे. जवळपास सगळ्याच मनोरंजन माध्यमांतून तिने आपली अभिनय कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. दिग्गजांचा सहवास यानिमित्ताने तिला लाभला आहे. त्यामुळे तिच्या गाठीशी उत्तम अनुभव आहे असे म्हणू शकतो. अनेक लोकप्रिय कलाकृतींमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये काम करणं हे तिच्यासाठी नवीन राहिलेलं नाही. त्यामुळे येत्या काळात या सगळ्या घटकांचा परिपाक म्हणून कृतिकाच्या कित्येक सुंदर आणि लोकप्रिय भूमिका आपल्याला पहायला मिळतील यात शंका नाही. तिच्या या वैविध्यपूर्ण वाटचालीत तिला सतत आणि उदंड यश मिळत राहो हीच मराठी गप्पाच्या टीमकडून शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.