सध्या लग्नाचा माहोल असा काही जोमात आहे कि अनेकांच्या घरी शुभमंगल सावधानचे सूर कानी पडत आहेत. अनेकांनी या काळात आपल्या साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटीज आहेत हे तर आपण पाहिलं आहेच. यातील काहींनी आपल्या लग्नाची तारीख पुढील वर्षापर्यंत ढकलली आहे. यातील सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या जोडीचं नुकतंच केळवण झालं. त्यांच्या लग्नाची तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण एका सेलिब्रिटीने मात्र आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. ह्या सेलिब्रिटीचा साखरपुडा नुकताच झाला होता. त्याविषयीची बातमीही तुम्ही मराठी गप्पावर वाचली होती.
ही सेलिब्रिटी म्हणजे मानसी नाईक. होय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, नृत्यांगना असलेल्या मानसीच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. तिचं लग्न आंतरराष्ट्रीय बॉक्सर परदीप खरेरा याच्याशी होणार आहे ते जानेवारी महिन्यात. परदीप हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध बॉक्सर असून, मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे. अनेक प्रथितयश नाममुद्रांसाठी त्याने मॉडेलिंग केलेलं आहे. मानसी आणि परदीप यांची ओळख सामायिक मित्रांच्या तर्फे झाली. हळूहळू या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांचा साखरपुडा या वर्षीच्या १० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला होता. अचानक आलेल्या या बातमीने मानसी आणि परदीप यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला होता. आता साखरपुड्यानंतर जानेवरीतील १८ तारखेला मेहेंदी आणि संगीत सोहळा पार पडेल आणि लगोलग दुसऱ्या दिवशी १९ तारखेला हळद आणि लग्नाचा कार्यक्रम होईल. हा विवाह सोहळा निवडक निमंत्रितांच्या सानिध्यात पुण्यात संपन्न होईल. काही मुलाखतींतून मानसी आणि परदीप हे एकत्र झळकले होते. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून लग्न लवकरच होईल, असा थोडा अंदाज त्यांच्या चाहत्यांना आला होताच. आता त्यांनी जाहीर केलेल्या तारखांमुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद होतो आहे.
तसेच या सरत्या वर्षात मानसी हिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी फेब्रुवारी महिन्यात परदीप सोबतच्या आपल्या रिलेशनशिपची कबुली चाहत्यांना दिली होती. त्यामुळे येत्या वर्षातील पहिले दोन महिने हे मानसी आणि परदीप यांच्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाचे असतील. या आनंदात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. मानसी आणि परदीप यांना त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! मानसीप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीज यांचे साखरपुडे आणि लग्न सध्या होत आहेत. मराठी गप्पावर याचे ताजे अपडेट्स आपल्याला सदैव मिळत असतातच. आपण त्यापैकी काही अपडेट्स वाचले नसतील तर काळजीचं काहीच कारण नाही. वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा आपण वापर करा. सर्च ऑप्शन मध्ये जाऊन साखरपुडा, लग्न असं लिहून सर्च करा. आपल्याला या विषयावरील विविध बातम्या मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी धन्यवाद !