काही व्यक्तिरेखा या आपल्या आठवणींचा एक भाग होऊन जातात आणि अशा अनेक व्यक्तिरेखा एखाद्या कलाकाराने निभावणं म्हणजे दुर्मिळच. पण मृणाल कुलकर्णी यांच्यासारख्या अभिनेत्री ते इतक्या लीलया करून जातात कि सगळं कसं सहज वाटावं. राजा शिवछत्रपती किंवा फर्जंद मधील आई जिजाऊ असोत, लढवय्यी अवंतिका असो वा मुलांना मदत करणारी सोनपरी. विविध शेड्स असणाऱ्या भूमिका मृणालजींनी त्यांच्या करियरमध्ये केल्या आहेत. येत्या काळात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एखादी कलाकृती त्या साकारताना दिसतील, असं त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोच्या कॅप्शन वरून वाटतंय. त्यांच्या या कलाप्रवासात सतत काम, पुणे मुंबई प्रवास, घर या सगळ्यात ज्यांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली ते म्हणजे त्यांचे पती ॲड. रुचिर कुलकर्णी होय. ते दोघेही नुकतेच एकत्र पहिल्यांदा काम करताना दिसले ते एका प्रसिद्ध चहाच्या जाहिरातीत. जी शूट केली होती त्यांचा मुलगा विराजस याने. आज याच निमित्ताने जाणून घेऊयात रुचिरजी आणि मृणालजी यांच्या प्रेम कथेविषयी.
मृणालजी आणि रुचिरजींचा कलाक्षेत्राशी संबंध लहानपणापासून. मृणालजींचे आजोबा म्हणजे प्रसिद्ध लेखक गो.नी. दांडेकर. रुचिर यांचे वडील म्हणजे जयराम कुलकर्णी. अनेक प्रसिद्ध मराठी सिनेमामध्ये त्यांनी निभावलेली पोलिसांच्या भूमिका आपल्याला माहिती आहेतच. मृणालजी आणि रुचिरजी एकमेकांना तसे लहानपणापासून ओळखत. पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यात खऱ्या अर्थाने मैत्री झाली. रुचिर हे मृणालजींना सिनियर आणि कॉलेजच्या नाटक आणि इतर उपक्रमांमध्ये आवडीने भाग घेणारे. त्यांचा एका नाटकातल्या भुमिकेसाठी एका मुलीचा शोध चालू होता. त्यांच वेळी मृणालजी स्वामी या सुप्रसिद्ध झालेल्या मालिकेत काम करत असत. त्यांनी मृणाल यांना या भूमिकेसाठी विचारलं. त्यांनीही होकार दिला. कामानिमित्त सहवास वाढत गेला. आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांनाच कळलं नाही.
प्रेम आहे समजल्यावर लग्नाचे वेध तर लागतात पण शिक्षण पूर्ण करणं हे महत्वाचं. म्हणून दोघांनीही लग्न केलं ते पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर. तो दिवस होता १० जून. नुकत्याच होऊन गेलेल्या १० जूनला मृणालजींनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर रुचिरजींबरोबरचा एक फोटो अपलोड केला होता. मागील वर्षी तर त्यांनी त्यांच्या लग्नातला फोटो याच तारखेस अपलोड करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. लग्नाला बरीच वर्षे झाली, पण अजूनही या जोडीतलं चैतन्य आणि केमिस्ट्री अजूनही अबाधित आहे आणि तसेच ते राहो. या केमिस्ट्रीची झलक त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चहाच्या जाहिरातीसाठी केलेल्या जाहिरातीत दिसून येते. त्यात संवादांबरोबरच देहबोलीचा वापर दोघांनीही अगदी नैसर्गिकरित्या केलेला आहे. अशा या चैतन्यपूर्ण आणि प्रसन्न जोडीला पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)