राजा राणीची गं जोडी हि मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहेत. सुरु झाल्या पासून ते आजतागायतच्या वाटचालीत, सुरुवातीपासूनच रणजित ढाले पाटील आणि संजीवनी ढाले पाटील या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकताच या मालिकेत एक ट्वीस्ट येताना दिसतो आहे. तो म्हणजे संजीवनी हे पात्र अल्पवयीन असल्याचा खुलासा होण्याचा. यानिमित्ताने प्रेक्षकांना ज्याची उत्सुकता होती, तो काळ आता मालिकेत सुरु झाला आहे. या मालिकेच्या निमित्ताने आपण आत्ता पर्यंत रणजित ढाले पाटील साकारणाऱ्या ‘मणिराज पवार’ आणि बेबी मावशी साकारणाऱ्या ‘गार्गी फुले’ यांच्या अभिनय प्रवासाचा आढावा घेतला आहे. त्या लेखांना असंख्य वाचक लाभले. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आज आपण या मालिकेतील अजून एक पात्र, जे सतत मालिकेच्या केंद्रस्थानी असतं, तिच्या अभिनय प्रवासाचा आढावा घेणार आहोत.
शिवानी सोनार. मालिकेतील संजीवनी उर्फ संजूची भूमिका तिने वठवली आहे. धीरगंभीर आणि समंजस रणजित समोर हीच अवखळ, वेळ पडेल तसं चुरूचुरू बोलणारी व्यक्तिरेखा संजीवनी हिने उभारली आहे. तिचा मालिका आणि शॉर्ट फिल्म्स मधला अनुभव तिने यात उत्तमरीतीने वापरला आहे. संजीवनी च्या व्यक्तिरेखेत लग्नानंतर स्वभावात होत जाणारे बदल सुद्धा तिने बारकाईने टिपले आहेत. या मालिकेच्या आधी, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘गर्जा महाराष्ट्र’ या मालिकांमध्ये कौतुकास्पद काम केलेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका असो, वा गर्जा महाराष्ट्र मधील पेशेवेकालीन भूमिका तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकपसंती मिळवली आहे. मालिकांसोबतच शिवानीने ‘द अग्ली डस्क’ आणि ‘T.Y.’ या शॉर्ट फिल्म्स काही काळापूर्वी केल्या होत्या. जवळपास एक लाखांहून अधिक प्रेक्षकांनी द अग्ली डस्क हि शॉर्ट फिल्म पहिली आहे.
येत्या काही काळातच हा आकडा, सव्वा लाखांच्या घरात जाईल हे नक्की. T.Y. हि त्याच्या आधीची शॉर्ट फिल्म. दोन्ही शॉर्ट फिल्म्सना अनेक मानांकनं आणि पुरस्कार मिळाले आहेत. अभिनया सोबतच, शिवानीला मेहेंदी आणि मेकअपचं काम करायला उत्तम जमतं. तिने आपलं वाणिज्य शाखेतील शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सोबतच, मेकअप करण्याचं शिक्षण घेतल्याचं तिने एका मुलाखतीत नमूद केलेलं होतं. या व्यतिरिक्त, भटकंती करणे, गाणी ऐकणे, वाचन करणे यांची तिला आवडते. तिला एकदा नुक्कड साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ठ अभिवाचक म्हणून पुरस्कार मिळाला होता. आपण जे काम करायचं ते अगदी लक्षपूर्वक आणि मन लाऊन करायचं असा तिचा स्वभाव दिसतो. आता एका मुलाखतीत तिने सांगितलेल्या एका गोष्टीचं उदाहरण घ्या ना. शिवानीचं बालपण शहरांत गेलेलं. पण, संजूची भूमिका साकारताना तिने पकडलेला लहेजा अगदी अस्सल वाटावा असा आहे.
त्यावरून तीचं शहरातलं राहणीमान डोकावत नाही. प्रेक्षकांनी तिच्या या बोलीचं कौतुक केलं आहे. त्यात सातत्य राहावं आणि त्यात अजून काही सुधारणा करू शकते का याकडे तिचं लक्ष असंत, असं तिने एका मुलाखतीत सागितलं होतं. यावरून तिची या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि प्रामाणिकपणा हे दोन्ही गुण दिसून येतात. तिचा हाच प्रामाणिकपणा तिच्या संजीवनी या भूमिकेतून डोकावतो. कदाचित त्याचमुळे प्रेक्षकांमध्ये हि व्यक्तिरेखा अवघ्या काही दिवसांत लोकप्रिय ठरली आहे. तिचा हाच प्रामाणिकपणा तिच्या येत्या भूमिकांमधून दिसेत राहील आणि उत्तमोत्तम व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पहायला मिळतील हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)