Breaking News
Home / मराठी तडका / अशोक सराफा ह्यांना ह्या एका चित्रपटाने तीन तासात स्टारडम मिळवून दिले, बघा अशोक सराफ ह्यांची जीवनकहाणी

अशोक सराफा ह्यांना ह्या एका चित्रपटाने तीन तासात स्टारडम मिळवून दिले, बघा अशोक सराफ ह्यांची जीवनकहाणी

‘वॅख्ख्या विख्खी वूख्खू’ अशी आणि अशा अनेक आगळ्यावेगळ्या लकबींनी, प्रेक्षकांना त्यांनी भरभरून हसवलं. त्याच ताकदीने, संवेदनशील अभिनय आणि भावनिक संवादफेकीतून प्रेक्षकांना शेंटीमेंटलहि केलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्यांनी गेली पाचहून अधिक दशकं मनोरंजनसृष्टी गाजवली असे अभिनेते म्हणजे अशोकजी सराफ. अशी ही बनवाबनवी ला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका लेखाच्या माध्यमातून आपण या सिनेमाच्या आठवणी जागवल्या होत्या. त्या लेखाला अशोकजींनी, या सिनेमाच्या वेळोवेळी सांगितलेल्या आठवणींचा पाया होता. या सिनेमाप्रमाणेच अनेक लोकप्रिय सिनेमे अशोकजींनी केलेत ज्यांना प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. त्यांच्या या अभिनय कारकिर्दीला यंदा ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने, अशोकजी सराफ यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा टीम मराठी गप्पाचा हा प्रयत्न.

अशोक सराफ यांनी सिनेमा, नाटक, मालिका अशा प्रत्येक माध्यमांतून काम केलेलं आहे. त्यापैकी त्यांच्या अनेक सिने भूमिका विशेषकरून आपल्याला लक्षात राहिल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं वैशिष्ठ म्हणजे, व्यक्तिरेखेचा केलेलं सखोल विश्लेषण आणि त्यामुळे ती व्यक्तिरेखा सादर करताना साधलेलं देहबोली आणि संवाद यांचं अफलातून मिश्रण. अशी ही बनवाबनवीचं उदाहरण घ्यायचं तर, यातल्या धनंजय माने या व्यक्तिरेखेची फोड करून सांगताना, त्यातील अनेक बारकावे आपल्या मुलाखतींतून उलगडले आहेतच. तसच, वॅख्ख्या विख्खी वूख्खू करणारी उद्योगभूषण यदुनाथ जवळकर हि व्यक्तिरेखा असो, वा नाकात बोलणारे गोवन प्रोफेसर धोंड असो. प्रत्येक व्यक्तिरेखा इतरांपेक्षा वेगळी आणि उठावदार वाटते. या अतरंगी व्यक्तिरेखांमध्ये, अजून एका व्यक्तिरेखेची आठवण येते ती म्हणजे भु ताचा भाऊ या सिनेमातली. त्यात मुख्य व्यक्तिरेखेचे बदलत जाणारे कंगोरे त्यांनी अगदी सहजतेने मांडले आहेत. या आणि अशा कित्येक भूमिकांची उदाहरणं सांगता येतील, पण लेख अपूर्ण पडेल.

पण एका भूमिकेचा उल्लेख इथे महत्वाचा ठरतो. तो म्हणजे, पांडू हवालदार या सिनेमातील भूमिकेचा. कारण अशोकजींना व्यावसायिक सिनेमातलं पहिलं काम आणि यश, हे या सिनेमाच्या माध्यमांतून मिळालेलं. पुढे जो घडला तो इतिहास आहे. या सिनेमाने आपल्याला केवळ तीन तासांत स्टारडम मिळवून दिलं, असं त्यांनी त्यांच्या काही लोकप्रिय मुलाखतींतून नमूद केलेलं आहे. ह्या चित्रपटात दादा कोंडके, अशोक सराफ आणि उषा चव्हाण ह्यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अशोक सराफ ह्यांनी हवालदार सखाराम नावाची भूमिका साकारली होती. त्यांचा हा चित्रपट खूप चालला. आणि केवळ तीन तासांतच त्यांना स्टारडम मिळाले. या संपूर्ण कालखंडात त्यांनी हिंदी सिनेमातही काम केलं. प्यार किया तो डरना क्या, येस बॉस, सिंघम, करण अर्जुन हि यातली काही सुप्रसिद्ध उदाहरणं. पण याच सोबत हिंदीती मालिकेतील त्यांचं एक काम खूप गाजलं. ते म्हणजे हम पांच या मालिकेतील केविलवाण्या वडिलांची भूमिका. मालिका टेलीविजनवर रुळू लागण्याचा तो काळ. ही मालिका कित्येक वर्षे यशस्वीरीत्या चालली. निखळ मनोरंजन कसं असू शकतं याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका. सिनेमा आणि मालिका, या सोबत अशोकजींनी नाटकातही अभिनय केला आहे.

त्यांची संगीत संशय कल्लोळ, हसत खेळत, मनोमिलन, व्हॅक्युम क्लीनर हि काही गाजलेली नाटकं. यातील हसत खेळत या नाटकांत, त्यांच्या पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री निवेदिताजींसोबत त्यांनी एकत्र काम केलं होतं. प्रत्येक भूमिका मन लाऊन, विचार करून, त्यासाठी आवश्यक विश्लेषण करून उभी करण्यात अशोकजींचा हातखंडा आहे. याचमुळे, अनेक भूमिका, सिनेमे करूनही त्यांच्या भूमिका आजच्या काळातही लक्षात राहतात. नवीन पिढीलाही आवडतात. त्याचमुळे धनंजय माने यांच्यावर मिम्स असोत, वा सेल्फीचा पहिला शोध लावणारे अशोकजी आहेत या आशयाचे मिम्स आजच्या काळात प्रसिद्ध होतात. अशोकजी सुद्धा यातील अनेक मिम्सना दाद देतात. एका प्रथितयश वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं होतं. त्यांचा हाच दिलखुलासपणा त्यांच्या भूमिकांना आजही तरुण ठेवत असावा. आजही ते विविध भूमिकांतून आपल्या भेटीस येत असतातच. ‘प्रवास’ हा त्यांचा फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध झालेला सिनेमा. कारकिर्दीला ५२ वर्षे होऊनही त्यांचा नवनवीन भूमिका करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असा. अशा या सतत कार्यरत असणाऱ्या चिरतरुण कलाकाराला मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा !

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची जोडी म्हणजे मराठी चित्रपट रसिकांसाठी मेजवानीच. ह्या दोघांनी जवळ जवळ २ दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाच्या एका वेगळ्या शैलीने गाजवली. अशोकजींच्या अभिनयप्रवासाप्रमाणे, टीम मराठी गप्पाने अशोकजींच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिताजी सराफ आणि या दोघांचा मुलगा अनिकेत सराफ यांच्या कारकीर्दीविषयी सुद्धा लेख लिहिले आहेत. आपण ते वाचले असल्यास धन्यवाद. वाचले नसल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च मध्ये जाऊन आपण निवेदिता सराफ किंवा अनिकेत सराफ असं टाईप केलं असता त्यांच्या वरील लेख आपल्याला उपलब्ध होतील. या लेखाप्रमाणेच, त्या लेखांचाही आपण आनंद जरूर घ्यावा. धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.