Breaking News
Home / मराठी तडका / अश्याप्रकारे तयार झाला ‘हा माझा बायको‘ डायलॉग, अशोक सराफ ह्यांनी सांगितले ह्यामागचे खरे का रण

अश्याप्रकारे तयार झाला ‘हा माझा बायको‘ डायलॉग, अशोक सराफ ह्यांनी सांगितले ह्यामागचे खरे का रण

‘अशी हि बनवाबनवी’ या चित्रपटाने नुकतीच ३२ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिनजी पिळगावकर, अभिनेत्री प्रिया अरुण आणि अश्विनी भावे यांनी आपल्या सोशल मिडिया पेजेसवरून आठवणींना उजाळा दिला होता. अनेक नेटकर्यांनीही यात उत्साह दाखवला. एरवीही या चित्रपटाचे मिम्स सोशल मिडियावरती फिरत असतातच. एकदा खुद्द सचिन तेंडूलकर यांनीही आपल्या एका मुलाखतीत हा आपला आवडता चित्रपट असल्याचं सांगितलं होतं. एखाद्या चित्रपटाची तीन दशकांनंतरही एवढी प्रसिद्धी रहावी हि या सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या आणि संपूर्ण टीमच्या कामची पोचपावतीच आहे.

या चित्रपटाने आपल्याला एवढा आनंद दिलाय कि यातील किस्से कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळणं हि पर्वणीच. एका प्रसिद्ध दैनिकाला आणि एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतींनिमित्त अभिनयसम्राट अशोकजी सराफ यांनी काही आठवणी सांगितल्या होत्या, त्यांची यानिमित्ताने आठवण होते. यात ते म्हणतात त्याप्रमाणे धनंजय माने हि व्यक्तिरेखा चित्रपटांचा केंद्रबिंदू आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमांतून चित्रपटातील घटना वळणं घेत जातात. त्यामुळे हि व्यक्तिरेखा अगदी छोट्या छोट्या संवादातून, आवाजातील चढ उतरांतून, देहबोलीतून परिणामकारक वाटेल असं त्यांनी नेहमीच कटाक्षाने पाहिलं. किंबहुना, अशोकजींच्या प्रत्येक भूमिकेतून त्या भूमिकेतल्या बारकाव्यांवर घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळतेच. ‘धनंजय माने’ हि व्यक्तिरेखा याचं उत्तम उदाहरण. त्यांनी या व्यक्तिरेखेवर केलेल्या मेहनतीमुळे बेरकी पण सहृदयी वर्तन असणारे असे धनंजय माने सत्तर रुपये वा रले असं म्हणत हसवतात, तर चित्रपटाच्या शेवटाकडे घर मालकीणबाईंची माफी मागताना प्रेक्षकांना हळवं करतात. भूमिकेतल्या या कंगोऱ्यांमुळे तीन दशकानंतरही लक्षात राहतात.

या मुलाखतींच्या निमित्ताने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही आठवणींना त्यांनी नेहमीच आवर्जून उजाळा दिला आहे. अशोकजींना लक्ष्मीकांतजी यांच्या अभिनयाबद्दल आणि विनोदाच्या टायमिंगबद्दल खूप आदर. आपल्या सगळ्यांना ‘धनजंय माने इथेच राहतात’ का हा चित्रपटातला अफलातून प्रसंग आठवत असेलच. अशोकजींच्या म्हणण्यानुसार या प्रसंगातील त्यांचं आणि लक्ष्मीकांतजी यांचं टायमिंग एवढं पक्कं बसलं होतं, कि प्रेक्षकांना हा प्रसंग खासकरून आवडला आणि आजही स्मरणात आहे. हा प्रसंग लिहिला गेला होता ते वसंत सबनीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून. पण या चित्रपटात असाही एक प्रसंग असा आहे जो लिहिलेला नव्हता. तो म्हणजे जेव्हा धनंजय माने पहिल्यांदा आपल्या बायकोची म्हणजे पार्वती झालेलेल्या परशुराम या व्यक्तिरेखेची ओळख करून देतात आणि म्हणतात ‘हा माझा बायको पार्वती’.

त्या व्यक्तिरेखा एकमेकांना अरे तुरे करत असल्यामुळे हा संवाद अचानक पुढे आला आणि लोकांना खळखळवून हसवून गेला. उत्स्फूर्तता म्हणजे काय हे या प्रसंगातून कळून येतं. कारण इतर प्रसिद्ध संवादांप्रमाणेच या संवादाचं टायमिंग जबरदस्त जुळून आलंय आणि त्याचमुळे आजही तो प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. त्यावेळी घडलं असं होतं कि, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं असल्यामुळे दोघांमध्ये फार उत्तम ट्युनिंग जमलं होतं. त्यामुळे अशोकजी लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना अशी हि बनवाबनवी च्या सेटवर अनेकदा ‘हि’ च्या ऐवजी ‘हा’ म्हणून उच्चार करत. साहजिकच मित्र आहे म्हणून ते करत. परंतु गंमत अशी कि लक्ष्मीकांतजींच्या पार्वती ह्या पात्राची ओळख करून देण्यासाठी सिनची तयारी सुरु होती, त्यावेळी अशोकजींच्या तोंडातून पटकन वाक्य निघून गेले कि ‘हा माझा बायको पार्वती’. आणि अचानक निघालेले हे वाक्य सर्वांना आवडले. मग काय चित्रपटांसाठी हे वाक्य लिहिलेले नसतानाही ते मग जोडले गेले. ह्या सिनमधील सर्व गोष्टी छान जमून आल्यामुळे प्रेक्षकांनाही हे वाक्य खूप आवडले आणि लोकप्रिय झाले. त्यामुळे ह्या वाक्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा अशोकजी नेहमी म्हणतात कि हे आमच्या ट्युनिंगची कमाल आहे.

उत्स्फूर्ततेचं उदाहरण जसं लक्ष्मीकांतजी आणि अशोकजी यांच्या संवादातून दिसतं, त्याचप्रमाणे अशोकजींनी सचिनजींच्या उत्स्फुर्ततेबद्दल आठवण एका मुलाखती दरम्यान सांगितली होती. सचिनजी सुधा हि भूमिका करताना प्रसंगानुरूप काही गाण्यांचे शब्द बदलत असतं जे मूळ संवादांचा भाग नव्हते. वाटाणे सोलताना ‘मी सोलकर सोलकर’ हे वापरलेले शब्द असोत वा एका सुप्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीचे शब्द अगदी खुबीने रोजच्या कामानिमित्त वापरणं असो. हि सचिनजींच्या उत्स्फुर्ततेची अशोकजींच्या मुलाखतींतून कळलेली थोडी उदाहरणं आहेत. अशी हि बनवाबनवी या आणि अशाच अवलिया कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने आणि उत्स्फूर्ततेने लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन ठेवला आहे. या चित्रपटानंतर अनेक विनोदी चित्रपट आले, काही काळ टिकले आणि गेले. पण ‘अशी हि बनवाबनवी’ सारखा चित्रपट पुन्हा होणे नाही. या चित्रपटाचे हे तेह्तीसावे वर्ष. अवघ्या दोन वर्षांत हा चित्रपट पस्तीशी गाठेल आणि त्यापुढच्या दीड दशकांत पन्नाशी. पण तेव्हाही या चित्रपटाची जादू आपणा सर्वांवर कायम असेल हे नक्की. या कलाकृतीच्या निमित्ताने यातील सगळ्या कलाकारांना त्यांच्या अतुलनीय कामगिरी बद्दल मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *