ट्राफिक पोलीस आणि ते ही डान्स करत ट्राफिकचं नियोजन करताहेत ही कल्पना एखाद्या सिनेमासाठी योग्य आणि मनोरंजक वाटते. तसं एका हॉलिवूड सिनेमातही दाखवलं आहेच. आपल्या पैकी अनेकांनी रश अवर ३ हा जॅकी चॅन आणि ख्रिस टकर यांचा सिनेमा पाहिला असेल. त्याच्या सुरुवातीस क्रिस टकर हा ट्राफिक पोलीस असतो. भर रस्त्यात ट्राफिकचं नियोजन करत असताना हा पठ्ठा चक्क मायकल जॅक्सन च्या गाण्यांवर नाचत नाचत आपलं काम करताना दाखवला आहे. पण असं खऱ्या आयुष्यात होत असेल आणि ते ही बरीच वर्षे, असं कोणी सांगितलं तर ? खोटं वाटेल. सकाळपासून मीच भेटलो का राव अशी प्रतिक्रिया येईल आपली. पण हे खरं आहे. डान्स करत करत ट्राफिकचं नियंत्रण करणाऱ्या एका पोलिसाचा वायरल व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. आजचा लेख त्यावरच आधारित आहे. प्रताप चंद्र खंडवाल असं या ट्राफिक पोलिसाचं नाव आहे. ओडीसा येथील भुवनेश्वर येथे ते कार्यरत होते. होते म्हणण्याचं कारण हा व्हिडियो जुना असल्याने त्यांच्या सद्य परिस्थिती विषयी कल्पना नाही. पण हा व्हिडियो रेकॉर्ड केला गेला तेव्हा या पदावर काम करताना त्यांना काही वर्षे नक्कीच झाली होती. असो.
प्रतापजी ओळखले जातात ते डान्सिंग कॉप या नावाने. रस्त्याच्या माध्यभागी उभे राहत ते ट्राफिकचं नियोजन करताना दिसून येत. मग त्यात कधी हातांनी वळणं घेत समोरच्या ट्राफिकला सोडतात तर कधी वेगवेगळ्या स्टेप्स करत ट्राफिकला थांबवत. अर्थात डान्सच्या अंतर्भावामुळे, थोडीशी करमणूक होत होत, लोकांमध्ये ट्राफिक नियमांविषयी माहिती पसरावी हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे ट्राफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रथम कर्तव्य मानून त्यांचा डान्स चालू असतो. नुसतं ट्राफिक सांभाळणं किती जिकरीचे आणि थकवणार असतं हे आपल्या पोलीस बांधवांना विचारलं तर कळून येतं. त्यात प्रतापजी तर डान्स करून हे सगळं करतात. त्यात ते अजून थकत असणार हे निश्चित आहे. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या व्हिडियोज मध्ये अनेक वेळेस त्यांचा घामेजलेला गणवेश बरंच काही सांगून जातो. त्यात त्यांचा पगार ऐकाल तर थक्क व्हाल. केवळ ९ हजार रुपये त्यांना या कामासाठी मिळत असत. सद्य परिस्थितीत त्यांना पगार किती मिळतो ह्याची कल्पना नाही, पण जास्त नक्कीच नसावा. पण असं असूनही ते इतक्या तन्मयतेने आपलं काम करतात हे बघून थक्क व्हायला होतं. याच एक कारण एक असावं की त्यांचं या कामावर खूप प्रेम असावं. बरं या कामात केवळ ट्राफिक नियंत्रण केलं की झालं असंही नाही.
कोणी हेल्मेट घातलं नसेल तर त्याच्याही पाठी प्रताप यांना पळावं लागतं. एका व्हिडियोत तर रिक्षाबाहेर एकाच पाय लोंबकळत असल्याचं दिसत होतं तर प्रताप यांनी स्वतः तो पाय स्वतःच्या हातांनी आत टाकल्याचे दिसून येते. म्हणजेच काय की काम करत असताना कोणतं आव्हान, समस्या किंवा एखादा प्रश्न समोर उभा राहील हे त्यांना माहिती नसतं. पण तरीही अगदी नेमाने ते या व्हिडियोज मधून त्यांचं काम अगदी चोखपणे करताना दिसून येतात. तेथील नागरिकांना ही त्यांची सवय झाली होती आणि ते करत असलेली जनजागृती आवडत होती हे कळून येतं. ते सध्या कुठे कार्यरत असतील याची कल्पना नाही, पण आमच्या टीमकडून त्यांच्या उज्वल कारकीर्दिसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या कामाला एक कडक सलाम !!!
आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करत आली आहे. आजचा लेखही त्यातलाच एक आहे. तेव्हा आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा. तसेच वाचक म्हणून आपण ज्या सकारात्मक सूचना आम्हाला करत असता, त्या आम्हाला उपयुक्त ठरतात. तेव्हा आपल्या सूचना सुद्धा आम्हाला कळवत राहा. आपल्यातले ऋणानुबंध असेच वृद्धिंगत होत राहू दे आणि दृढ होऊ दे ही सदिच्छा !!!
बघा व्हिडीओ :