शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. यातील सगळ्यांत महत्वाचा भाग म्हणजे शिकवला जाणारा अभ्यासक्रम. यासोबतच अजून एक महत्वाची बाब असते जी तेवढीच महत्वाची असते. ही बाब म्हणजे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिक्षकांची शैली. ही शैली प्रत्येक शिक्षकांच्या स्वभाव, अनुभव आणि कल्पकता यांनुसार बदलत जाते. या सगळ्यांत काही शैली विद्यार्थीप्रिय सुद्धा असतात तर काही शैली मात्र त्यांना आवडत नाहीत. त्यात विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना आवडेल आणि थोडीशी करमणूक होईल या अंगाने शिक्षण देण्याकडे काही शिक्षकांचा कल असतो. यात मग गाणी, नृत्य यांचा समावेश करण्याकडे त्यांचा कल असलेला दिसून येतो. आज या सगळ्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. हा व्हिडियो आहे एका शिक्षकांचा आणि त्यांच्या छोट्या विद्यार्थ्यांचा. हा व्हिडियो लक्षात राहतो तो यातील शिक्षकांनी अजमावलेल्या नवीन शिक्षण पद्धतीमुळे.
व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही सगळी मंडळी मोकळ्या पटांगणात बसलेली असतात. त्यात एका जागी वर उल्लेख केलेले शिक्षक बसलेले असतात. त्यांच्या एका हाताला काही विद्यार्थी बसलेले असतात तर दुसऱ्या बाजूस तीन विद्यार्थिनी उभ्या असतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा या तिघी जणी काही ठिकाणांची नावे घेत असतात. पण त्यात वेगळेपण असं दिसून येतं की त्या काहीशा नाचत असतात. त्या स्वतः भोवती फिरत असताना ही नावं घेतात आणि मग थांबतात. मग शिक्षक त्यांना महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांची नावे घ्यायला सांगतात. यावेळी ही त्या काहीशा वेगळ्या स्टेप्स करत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे सांगतात. या जिल्ह्यांचे त्यांनी गट केलेले असतात. प्रत्येक गटाच्या वेळी त्यांच्या वेगवेगळ्या स्टेप्स करण्यामुळे त्यांची ही पद्धत लक्षात राहते. मग शिक्षक त्यांना केंद्रशासित प्रदेशांची नावे विचारतात. त्याही मग सगळी नावे सांगतात. यंदाही नवीन स्टेप. एकंदर हा सगळा प्रकार त्यांच्या अंगवळणी पडलेला दिसत असतो. मग वेळ येते ती भारतातील सगळ्या राज्यांच्या नावाची.
आत्तापर्यंत आपण विचार करत असतो, की या मुलींनी नावं म्हणायच्या लयीवर नावं लक्षात ठेवली असतील. ते योग्यही असेल. पण सोबतच जेव्हा राज्यांची नावे घेतात तेव्हा त्यांनी ती नावे A-Z या अनुक्रमे लक्षात ठेवल्याचे जाणवतं. त्यामुळे आधीच्या नावांसाठी त्यांनी वेगळी काही पद्धत अवलंबली असावी. असो. इतकी नावं घेऊन आणि स्टेप्स करून या विद्यार्थीनी थकलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्याकडून आता केवळ खंडांची नावे विचारण्याचा निर्णय शिक्षक घेतात. त्या विद्यार्थिनी ही मग सगळ्या खंडांची नावे घेतात आणि त्यांची ही उजळणी आणि सादरीकरण संपते. शिक्षक त्यांना धन्यवाद म्हणायला सांगतात आणि इतरांना त्यांचं कौतुक करायला सांगतात आणि हा व्हिडियो संपतो. व्हिडियो तसा तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेचा आहे त्यामुळे चट्कन बघून होतो.
हा व्हिडियो आपण कदाचित बघितला असेल. त्यावर आधारित असलेला हा लेख आपणांस कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून कळवायला विसरू नका. तसेच आपल्या सकारात्मक सूचना आणि प्रतिक्रिया याबद्दल धन्यवाद. या दोहोंतून आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची उर्मी मिळते आणि उत्साह ही टिकून राहतो. तेव्हा येत्या काळात ही आपला हा स्नेह वाढीस लागू दे ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :