आई कुठे काय करते या मालिकेने गेल्या काही काळात प्रेक्षकमनावर स्वतःची अशी एक छाप सोडली आहे. यात कथानकातून येणारी स्थित्यंतरं जशी कारणीभूत आहेत तशीच अभिनयातील तगडी मंडळी या मालिकेतून उत्तम अभिनय करताहेत हे ही एक कारण आहे. मिलिंद गवळी, मधुराणी गोखले प्रभुलकर, रुपाली भोसले हे अनुभवी कलाकार मालिकेतील मुख्य भुनिकांमधून आपल्या भेटीस येत असतात. यावरून अभिनयाच्या उत्तम दर्जाची खात्री पटते. या मुख्य कलाकारांसोबतच अन्य कलाकारही अनुभवी अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. या कलाकारांच्या मांदियाळीतील एका अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत. या मालिकेत त्यांनी विमल ही भूमिका साकारली आहे. विमल ही अरुंधती आणि अनिरुद्ध च्या घरी काम करणारी व्यक्ती आहे. पण अरुंधतीसोबत राहणारी आणि तिला सदैव साथ करणारी अशी व्यक्तिरेखा आहे.
विमल ही व्यक्तिरेखा साकारली आहे सीमा घोगळे यांनी. सीमा यांना आपण याआधी गोठ या प्रसिद्ध मालिकेतून पाहिलं आहे. तसेच एक होती राजकन्या या मालिकेतही त्या होत्या. या मालिकेत त्यांनी एका पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारली होती. त्यांच्या अन्य मालिकाही गाजल्या. पण त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांना अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली ती रंगभूमीवरील कामाने. सीमा यांच्या घरी नाटकाची प्रचंड आवड. त्यांचे वडील अनंत घोगळे हे मराठी नाट्यसृष्टीशी कित्येक वर्षे निगडित होते. ते स्वतः नाटकात काम करत तसेच अन्य नाट्यकर्मींना ही ते साहाय्य करत असत. अनेक जेष्ठ नटांना त्यांच्याविषयी आदर होता आणि आजही तसाच अबाधित आहे. ते सुप्रसिद्ध नाट्यसमीक्षक आणि पत्रकार होते. त्यांचे नाट्यप्रेम सीमा यांच्या मध्ये आपसूक रुजले. त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले ते महाविद्यालयीन काळात. एकांकिका स्पर्धांमधून त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. या स्पर्धांमधून अभिनेत्री म्हणून तावून सुलाखून निघत असताना त्यांनी राज्य नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांनी ‘गोलपीठा’ या नाट्यकृतीत अभिनय केला होता.
ही नाट्यकृती एवढी गाजली की पूढे व्यवसायिक नाटक म्हणून सगळ्यांसमोर आली. सीमाजी अर्थातच त्यात होत्या. शेकड्याने प्रयोग झाले. अभिनेत्री म्हणून त्यांच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड म्हणून हे नाटक ठरलं असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. या काळात आणि पुढेही त्यांच्या वडिलांनी त्यांना भक्कम साथ दिली. अगदी एखादी परीक्षा तोंडावर आली असतानाही, नाटक चुकू नये म्हणून त्यांनी सीमाजींना खंबीर पाठिंबा दिला. या सुरुवातीच्या काळापासून ते आजतागायत जवळपास दोन दशके त्या रंगभूमीवर विविध भूमिकांतून कार्यरत आहेत. अर्थात अभिनेत्री म्हणून तर आहेतच. त्यांची ‘कुमारी गंगुबाई मॅट्रिक’, ‘सुरक्षित अंतर ठेवा’, ‘शेवग्याच्या शेंगा’ ही नाटके विशेष गाजली. अभिनयासोबतच त्यांनी अभिनय शिक्षिका आणि परीक्षिका म्हणूनही अनेक मान्यवर संस्थांत काम पाहिलेलं आहे. पण एक मात्र खरं की इतकी वर्षे या क्षेत्रात असूनही त्यांना प्रत्येक नवीन नाट्यकृतीविषयी अजूनही तितकीच उत्सुकता, आत्मियता वाटते. आजही अनेक नवीन एकांकिका, एकपात्री यांचे पोस्टर्स त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून त्या सतत शेअर करत असतात.
तर अशा या सीमाजी. ज्यांनी आपल्या कलाक्षेत्रातील कारकिर्दीला वाहून घेतलं आहे. त्या सतत विविध कलाकृतीतून आपल्या भेटीस येत असतात. त्यांनी अनेक सिनेमेही केले आहेत. सिनेमे, मालिका यांतून अभिनय करताना त्यांनी नाटकांची नाळ तुटू दिली नाही ही कौतुकाची गोष्ट. अशा या गुणी आणि अनुभवी अभिनेत्रीस मराठी गप्पाच्या टीमकडून येत्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा ! आपण हा लेख वाचला याबद्दल धन्यवाद. आपण मराठी गप्पावर उपलब्ध असलेले अनेक लेख वाचले असतील. त्यात ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कलाकारांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना असंख्य वाचक लाभले आहेत. आपण ते लेख वाचले नसतील किंवा पुन्हा वाचायचे असल्यास एक करा. वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनमध्ये जा. तिथे ‘आई कुठे काय करते’ असं टाईप करून सर्च करा. उपलब्ध लेख आपल्याला सहज मिळतील. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)