मराठी मालिका विश्वात गेल्या काही काळात नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेत. या नवनवीन मालिकांमध्ये काही काळ जुन्या मालिकासुद्धा, स्वतःचं स्थान टिकवून आहेत. यातील एक आघाडीची मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला असून या मालिकेतील विविध व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रसिद्ध होत असलेल्या व्यक्तिरेखांच्या मांदियाळीत अजून एका व्यक्तिरेखेची भर पडली आहे. रजनी कारखानीस ही ती व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेमुळे येत्या काळात मालिकेत येणारी नवनवीन वळणं कोणती असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आजच्या या लेखातून आपण ही व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत.
रजनी कारखानीस ही व्यक्तिरेखा साकार केली आहे सुषमा मुरुडकर यांनी. सुषमा या मूळच्या मुंबईच्या. कलेविषयीची आवड आणि आसक्ती त्यांना होतीच. त्यांनी कलाक्षेत्रातील विषयांत स्वतःचं उच्चशिक्षण पूर्ण केलेलं आहे. अभिनय करणं त्यांना आवडतंच. जागो ग्राहक जागो या जनहितार्थ प्रसिद्ध केलेल्या काही जाहिरातीत त्यांनी मध्यवर्ती भूमिका केलेली होती. जाहिरातींसोबत त्यांचा मुख्यतः वावर राहिला तो हिंदी मालिकांमध्ये. ‘कुंडली भाग्य’ या सुप्रसिद्ध मालिकेत त्यांनी डॉ. रेणुका शर्मा ही व्यक्तिरेखा साकार केलेली होती. तसेच ‘पवित्र भाग्य’ या अजून एका प्रसिद्ध मालिकेतील मुख्याध्यापिकेची भूमिका त्यांनी साकार केली होती. या मालिकांसोबतच सुषमा या ‘संजीवनी २’ आणि ‘इश्क में मर जांवा २’ या मालिकांचाही महत्वपूर्ण भाग होत्या. या दोन्ही मालिकांतील अनुक्रमे नंदिनी आणि मिस डिसूझा या त्यांच्या व्यक्तिरेखा गाजल्या. सध्या त्या आई कुठे काय करते या मालिकेत व्यस्त आहेत.
मालिका, जाहिराती यांच्यासोबतीने गेल्या काही काळात झपाट्याने फोफावलेल्या सोशल मिडियावरती ही त्यांचा वावर लक्षात घेण्याजोगा आहे. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने छोट्या छोट्या व्हिडियोज मधून अभिनय करत असतात. हे व्हिडियोज त्यांच्या सोशल मिडियासोबतच त्यांच्या स्वतःच्या युट्युब चॅनेल वरती ही पाहता येतात. अभिनयासोबतच सुषमा जी ह्या स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असतात. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्या योगा करण्यासही वेळ देताना दिसतात. हिंदी मालिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केलेला आहे. आता आई कुठे काय करते या मालिकेमुळे या चाहत्यांच्या संख्येत भरच पडेल हे नक्की. तसेच येत्या काळात विविध मराठी मालिकांमधून सुषमा आपल्याला अभिनय करताना दिसाव्यात अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. त्यांच्या नवीन मालिकेसाठी आणि पूढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !