समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून आपण सगळेच समाजभान ठेऊन वागत असतो. आपापल्या परीने समाजाला आपण देणं लागतो, हे समजून काही ना काही हातभार लावत असतो. पण काही मंडळी आपल्या आयुष्यात हे समाजभान जपण्याचा आणि समाजात सकारात्मक बदल करण्याचा जणू विडा उचलतात. ते ही अगदी त्यांचा पेशा सांभाळून. तेव्हा त्यांच्याविषयी कौतुक वाटत राहतं. आपल्या सगळ्यांच्या एक आवडत्या अभिनेत्री ही समाजकार्यात झोकून देऊन काम करताना आपल्याला दिसतात. दुर्दैवाने नुकतंच त्यांच्या वडिलांचं क’रोनामुळे नि’धन झालं. पण तरीही त्या खचलेल्या नाहीत. आम्ही तर ‘जिजाऊंच्या लेकी’ म्हणत पुन्हा नवीन जबाबदारी घेण्यास त्या पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या या नेतृत्वगुणांचं आमच्या टीमला कौतुक वाटलं. आजचा हा लेख याच अभिनेत्रीची थोडक्यात ओळख करून देणारा लेख असेल.
या लोकप्रिय अभिनेत्री यांचं नाव आहे अश्विनी महांगडे. होय, स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत ‘शिवकन्या राणूअक्का’ ही ऐतिहासिक भूमिका साकार करणाऱ्या या अभिनेत्री. अश्विनी या मूळच्या साताऱ्यातील पसरणी गावातल्या. महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या या गावात अश्विनी यांचं बालपण गेलं. येथेच त्यांचं शिक्षण ही झालं. लहानपणापासून त्यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या विचारांचा प्रभाव होताच. त्यांच्या वडिलांना त्या नाना म्हणत. नानांच्या समाजाभिमुख वृत्तीचा आणि कला क्षेत्राच्या आवडीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यांच्यातही अभिनयासाठी पोषक असे गुण होतेच. त्यामुळे अगदी शालेय वयापासूनच अश्विनी यांनी नाट्यकृतींमधून सहभाग घेणं सुरू केलं. तसेच या काळात नृत्यकलेशी ही त्यांचा अगदी जवळून सहवास आला. पुढे महाविद्यालयीन जीवनातही कलाकृतींमधला त्यांचा वावर वाढला आणि या कला क्षेत्रात कारकीर्द घडवावी हे त्यांनी पक्कं केलं. मग त्यासाठी काही काळाने त्या मुंबईत आल्या. इथे नोकरी करत, स्वतःला आर्थिक पाठबळ देत देत त्यांनी ऑडिशन्स देणं सुरू केलं. त्यांची ही मेहनत फळाला आली.
त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘आधी बसू, मग बोलू’ या प्रसिद्ध नाटकात काम केलं. या नाटकांत त्यांनी आपल्या व्यक्तिरेखेवर खूप मेहनत घेतली. त्याची परिणीती अशी झाली की उत्तम अभिनेत्री म्हणून काही काळातच त्यांची ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली. पुढे झी मराठीच्या गाजलेल्या ‘अस्मिता’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेने त्यांना प्रत्येक मराठी घरात ओळख करून दिली. पुढे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने त्यांना उत्तम अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचा या व्यक्तिरेखेशी त्या स्वतः आणि प्रेक्षक एवढे एकरूप झाले आहेत की आजही त्यांना शिवकन्या राणूअक्का म्हणून संबोधलं जातं. अर्थात त्यांच्या या भूमिकेसोबतच त्यांनी केलेलं सामाजिक कार्यही यासाठी कारणीभूत आहे. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून आणि सामाजिक संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम हातात घेतले आहेत. त्यांनी काही काळापूर्वी एक वेबसिरीज सुरू केली होती. ज्याचं नाव होतं, माहवारी. मासिक पाळी या विषयाला केंद्रस्थानी धरून त्याविषयी जनजागृती करण्याचा या वेबसिरीजचा उद्देश होता. यात त्यांच्या अगदी जवळच्या मैत्रीण असणाऱ्या भाग्यशाली राऊत यांनी सिद्धहस्तलेखिका म्हणून उत्तम काम केलं आहे. या वेबसिरीजचं दिग्दर्शन अश्विनी यांनी केलं आहे.
यासोबतच अश्विनीजींनी ‘रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फतही त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतलेले दिसून येतात. मग अगदी ते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठीचे विविध उपक्रम असोत वा महिला सबलीकरण हा विषय घेऊन हाती घेतलेले विविध उपक्रम. तसेच करोना काळात अनेक गरजूंना वेळेवर जेवण मिळावं म्हणून त्या आणि त्यांची संस्था कायम कार्यरत राहिल्याचे जाणवते. त्या उत्तम अभिनेत्री आहेत हे त्यांच्या कलाकृतींतून नेहमीच दिसत असतं. पण सोबतच त्यांना असलेलं उत्तम समाजभान हे त्यांनी केलेल्या उपक्रमांतून ही दिसून येतं. त्यांच्या या कामाची दखल अनेक उत्तम वृत्तसंस्थांनी घेतली आहेच. आपल्या टीमनेही त्यांच्या कारकिर्दीचा आणि सामाजिक कामांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अश्विनीजींचे आजोबा कै. पैलवान नामदेव बयाजी महांगडे हे उत्तम कुस्तीपटू होते. त्यांनी १९४४ – १९५६ या काळात सातत्याने बॉम्बे चॅम्पियन आणि खानदेश चॅम्पियन हे मान सातत्याने मिळवले होते आणि टिकवले होते. त्यांचा हा वारसा अश्विनीजींच्या वडिलांनी समर्थपणे पुढे नेला. तसेच सोबत अभिनयाची आवडही जोपासली. आज त्यांचा कलेचा आणि समाजाभिमुख असण्याचा वारसा अश्विनी या पुढे नेत आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने वारसा नेताना प्रत्येक पिढीने स्वतःची अशी ओळखही निर्माण केलेली दिसते. अश्विनीजी सुद्धा यात यशस्वी झालेल्या दिसतात. यापुढेही त्या समाजभान राखणाऱ्या उत्तम अभिनेत्री म्हणून यशस्वी वाटचाल करत राहतील हे नक्की. त्या सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अनघा च्या भूमिकेतून आपल्यापुढे येत आहेत. त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणेच त्यांनी या व्यक्तिरेखेलाही न्याय दिलेला दिसून येतो. येत्या काळातही त्या विविध भूमिकांतून आपल्या समोर येत राहतील हे नक्की. त्यांच्या या वाटचालीसाठी आमच्या टिमकडून त्यांना मनापासून शुभेच्छा ! तसेच अल्पावधीत त्यांनी केलेल्या उत्तमोत्तम सामाजिक उपक्रमांना आपल्या टीमचा मानाचा मुजरा !
आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असता. आपल्या सकारात्मक कमेंट्स आणि लेख शेअर करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत राहतं. त्यातून नवनवीन लेख लिहिण्याची ऊर्जा मिळते. तेव्हा आपले हे लेख शेअर करत राहा आणि आपला स्नेह वाढता राहु द्या. लोभ असावा. धन्यवाद !!