‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही काळ लोटला. या कालावधीत मालिकेने यशस्वीरीत्या स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केलेला आहे. या मालिकेतील विविध व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहेत. काही काळापूर्वी या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना या व्यक्तिरेखा निभावणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख मराठी गप्पावर प्रसिद्ध झाले होते. त्या लेखांना असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. आज आपण या मालिकेतील ईशाची भूमिका करणाऱ्या अपूर्वा गोरे विषयी या लेखातून जाणून घेणार आहोत.
अपूर्वा मूळची पुण्याची. तसेच कालाक्षेत्राविषयी तिला आवड. तिची ही आवड तिने जपली ती रंगभूमीच्या माध्यमांतून. पुण्याला इंजिनीयरिंगचं शिक्षण घेत असताना तिने महाविद्यालयीन एकांकिकांमधून अभिनय करण्यास सुरवात केली. फिरोदिया करंडक स्पर्धेत तिने सतत काही वर्षे भाग घेतला. एकांकिका करताना तिने अभिनेत्री म्हणून जसं काम केलं तसंच, दिग्दर्शिका म्हणूनही तिने काम केलेलं आहे. तिने अभिनित केलेल्या नाट्यकृती म्हणजे रोहिणी, रजईतला हत्ती आणि गुलाबो. तर दिग्दर्शित केलेली नाट्यकृती म्हणजे वोट फॉर सायलेन्स. रंगमंचावर कार्यरत असताना तिने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. या अनुभवाचा तिने फायदा करून घेतला तो तिच्या मालिकांच्या निमित्ताने. तिची पहिली वहिली मालिका म्हणजे ‘ती फुलराणी’. या मालिकेत तिने ‘गुडडी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. ही व्यक्तिरेखा मालिकेत कमी काळ होती पण या व्यक्तिरेखेने मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करण्याचा अनुभव तिच्या गाठीशी आला. तिने तिच्या एका सोशल मिडिया पोस्ट मधून या व्यक्तिरेखेचे आभार मानले होते. नंतर आली ती तीची नवीन मालिका जी सध्या प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.
‘आई कुठे काय करते’ ही ती मालिका. या मालिकेत तिने मुख्य पात्र म्हणजे अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. कॉलेजमध्ये नव्याने दाखल झालेली ही ‘ईशा’ आहे. वयानुसार अल्लड असं हे पात्र अपूर्वाने उत्तमरीतीने साकारलं आहे. हे पात्र साकारत असताना तिचं या मालिकेतील कलाकारांसोबत एक उत्तम ट्युनिंग जमलं आहे. त्यामुळे सेटवर सगळ्यांची ती लाडकी आहे. अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या सोबत गाणे गातानाचा तिचा व्हिडियो वायरल झाला होता. तसेच तिच्या सोलो गाण्यांच्या व्हिडियोजना ही नेटकर्यांनी पसंती दर्शवली आहे. तिच्या खणखणीत आवाजातील गाण्यांची भुरळ पडते. तर अशी ही नवोदित अभिनेत्री मजल दरमजल करत मनोरंजन क्षेत्रात पूढे जाते आहे. रंगभूमी ते मालिका या प्रवासात तिने उत्तम काम करत स्वतःची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. येत्या काळातही ईशा ही व्यक्तिरेखा ती अजून लोकप्रिय करेल, हे जसं नक्की तसेच येणाऱ्या तिच्या कालाकृतींमधील तिच्या व्यक्तीरेखाही ती समर्थपणे साकारेल, हे नक्की. तिच्या पूढील काळातील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)