उदयोन्मुख कलाकार आणि त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणं आमच्या मराठी गप्पाच्या टीमला विशेष आवडतं. याचं कारण या उदयोन्मुख कलाकारांची ओळख आमच्या वाचकांना करून देण्यात आम्हाला आनंद होतोच आणि आम्हालाही नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आज याच उदयोन्मुख कलाकारांच्या मांदियाळीतील एका अभिनेत्री विषयी आपण जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री सध्या एका प्रसिद्ध मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसते आहे. तिची मालिकेतील भूमिका हि खल भूमिका असली तरीही तिने सकारात्मक भूमिकाही केलेल्या आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत ते जान्हवी किल्लेकर हिच्या बाबतीत. होय, आई माझी काळूबाई या मालिकेतील खलनायिका.
खलनायिकेला शोभतील असा तिचा अभिनय मालिकेत असतोच. तिच्या अभिनयामुळे तिच्या व्यक्तिरेखेस एक प्रकारची धारही येते. रागही येतो. पण या व्यक्तीरेखेव्यक्तिरिक्त एक कलाकार म्हणून तिचं व्यक्तिमत्व हे सहज छाप पाडून जातं. तिच्या घाऱ्या डोळ्यांची भुरळ तिच्या चाहत्यांना पडल्यावाचून राहत नाही. अभिनयासोबतच तिला नृत्याची देखील खूप आवड आहे. जान्हवी हि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून खूप लोकप्रिय आहे. युट्युबवर तिच्या डान्स अल्बम्सना खूपच लोकप्रियता मिळालेली आहे. अनेक कोळी गीतांमधून तिने नृत्य सादर केलेलं आहे. एका कोळी गीतात म्हणजे ‘गोल्डीची हळद’ यात तिने भाऊ कदम यांच्या सोबत नृत्य केलेलं आहे. तसेच ‘वाजले बारा’, ‘कोळीवाडा झिंगला’ हे तिचे म्युझिक व्हिडिओ ही खूप प्रसिद्ध झाले आहेत. किंबहुना ‘कोळीवाडा झिंगला’ या तिच्या म्युझिक व्हिडीओ ला अडीच करोडहुन अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे. आई माझी काळूबाई या मालिकेसोबतच तिने ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेतही अभिनय केलेला आहे. या मालिकेत तिने ‘श्री लक्ष्मी देवी’ची व्यक्तिरेखा साकार केलेली आहे. सध्या जान्हवी ही आई माझी काळूबाई या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या मालिकेतील नायिका म्हणजे वीणा जगताप आणि जान्हवी या मालिकेत एकमेकांच्या विरुद्ध असल्या तरीही खऱ्या आयुष्यात त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्याचप्रमाणे मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता संग्राम साळवीसोबत सुद्धा चांगली केमिस्ट्री आहे. अभिनया सोबतच ती एक फुडी व्यक्ती आहे. तिला अनेक वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात. फुडी असली तरीही तिने स्वतःच्या फिटनेस कडे दुर्लक्ष केलेलं नाही. अभिनय, नृत्य, फिटनेस यांचा उत्तम ताळमेळ साधणाऱ्या या उदयोन्मुख अभिनेत्रीच्या प्रत्येक कलाकृतीतून तिने तिच्या चाहत्यांना आनंद दिला आहे. तसेच तिच्या चाहत्यांची संख्याही सातत्याने वाढते आहे. तिने केलेल्या अनेक शोजमधूनही हे दिसून येतं. तिची ही प्रगती अशीच पुढेही सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर होत राहील, हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !