Breaking News
Home / मराठी तडका / आजपासून सुरु होणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील हा कलाकार आहेत तरी कोण, जाणून घ्या

आजपासून सुरु होणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील हा कलाकार आहेत तरी कोण, जाणून घ्या

सणांच्यानिमित्ताने अनेक मालिका, मनोरंजन विश्वात दाखल होत असतात. यावर्षीही, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं परमपूज्य दैवत असलेल्या ज्योतिबाच्या अवतारकार्यावर आधारित एक मालिका स्टार प्रवाहवर दाखल होते आहे. या मालिकेचं नाव, ‘दख्खनचा राजा जोतिबा’ असं आहे. लोकप्रिय दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे विजनची निर्मिती असलेली हि मालिका २३ ऑक्टोबर पासून आपल्याला स्टार प्रवाहवर पहायला मिळेल. याआधी, कोठारे विजन तर्फे, ‘जय मल्हार’ या मालिकेची निर्मिती केली गेली होती. त्यावेळेस या मालिकेने, लोकप्रियतेचा कळस गाठला होता. ‘दख्खनचा राजा जोतिबा’ हि मालिकासुद्धा या मालिकेप्रमाणे लोकप्रिय होईल हे नक्की. ‘जय मल्हार’ या मालिकेतून, ‘देवदत्त नागे’ यांनी खंडोबा देवाची भूमिका साकारली होती. तर जोतिबा देवाची भूमिका साकारण्याचा मान, विशाल निकम या नवोदित अभिनेत्याला मिळालेला आहे. या ऐतिहासिक मालिकेनिमित्त, या तरूण अभिनेत्याच्या कलाप्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न.

विशाल हा मुळचा सांगलीचा. कॉलेजमध्ये शिकत असताना, त्याला अभिनयाविषयी आवड निर्माण झाली. पण हि केवळ आवड असू नये, त्याची इत्यंभूत माहिती असावी या उद्देशाने त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जे काम करायचं त्यातली सगळी माहिती व्यवस्थित घ्यावी असा त्याचा स्वभाव दिसतो. कारण त्याला व्यायामाचीही आवड. या आवडीपाई त्याने केवळ व्यायामचं केला नाही, तर त्याचंही प्रशिक्षण घेतलं. अभिनय क्षेत्रात येताना पहिला ब्रेक मिळण्यासाठी ऑडिशन देणं सुरु होतं. सोबत एके ठिकाणी तो जिम मध्ये व्यायाम प्रशिक्षक म्हणून काम करत होता. त्याची एका चित्रपटासाठीची दिलेली ऑडिशन परीक्षकांना आवडली. लुक टेस्ट होऊन त्याला त्याचा पहिला सिनेमा मिळाला, ‘मिथुन’ या नावाचा. या सिनेमात त्याने, अमृता धोंगडे हिच्या सोबत मुख्य भूमिका बजावली होती. मिथुनने या नवीन अभिनेत्याला ओळख मिळवून दिली. पुढे त्याने ‘धुमस’ या एका सिनेमात काम केलं. त्याचा अभिनय प्रवास उत्तरोत्तर प्रगती करत असताना, स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत काम करण्याची संधी त्याला मिळाली. या मालिकेतील, युवराज हि व्यक्तिरेखा खूप गाजली. त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.

मालिकांमध्ये काम करत असताना, एका शॉर्ट फिल्म सिरीजमध्ये त्याने काम केलं. ऑफबीट्स असं या सिरीजचं नाव. यात त्याने एका स्नायपरची भूमिका बजावली होती. यासोबत त्याने टी.वी.एस. क्रेडीट लोनच्या जाहिरातीतही काम केलं आहे. गेल्या दोन वर्षातील त्याच्या या भरीव कामाची दखल प्रेक्षकांनी जरूर घेतल्याचं दिसलं, जेव्हा महाराष्ट्र टाईम्स आणि टाईम्स ऑफ इंडिया या प्रतिष्ठित दैनिकांनी प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणात, टी.वी.च्या पडद्यावरील मोस्ट डिजायरेबल मॅन २०१९ च्या यादीत तो पहिल्या पाच अभिनेत्यांमध्ये तो दिसून येतो. व्यायाम प्रशिक्षक ते अभिनेता हा त्याचा प्रवास काही वर्षांचा वाटत असला तरीही या घोडदौडीत त्याने अभिनय आणि पिळदार शरीर यांच्यावर खूप मेहनत केली आहे. तसेच केवळ व्यायामापुरतं स्वतःला त्याने मर्यादित ठेवलेलं नाहीये. त्याने जिम्नास्टीक आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतल्याचं त्याच्या सोशल मिडिया पोस्ट मधून दिसतं.

सध्या तो ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत व्यस्त आहे. जोतिबा देवाच्या पौराणिक भूमिकेसाठी त्याने गेल्या काही काळात खूप मेहनत केली आहे. या मालिकेचे प्रोमो आणि संगीत हे सुद्धा प्रेक्षकांना आवडत आहेत. या मालिकेची निर्मिती कोठारे विजनने केली असून त्यासाठी कोल्हापुरातील चित्रनगरीत त्यांनी मोठ्ठा सेट उभारला आहे. जोतिबाच्या अवतारकार्याला साजेशी अशी मालिका असावी आणि त्यात कुठचीहि कसर राहू नये हि त्यामागची भूमिका असावी. महेश कोठारे आणि स्टार प्रवाह यांनीही त्यांच्या नेहमीच्या धडाकेबाज पद्धतीने प्रमोशनहि सुरु केलं आहे. जोतिबाचं देऊळ, रंकाळा तलाव या ठिकाणी गुलाबी रंगाची विद्युत रोषणाई नुकतीच केली होती. महेशजींनी त्याचे विडीयोज सोशल मिडियावरती शेअरहि केले होते. त्यांच्या टीमच्या गाठीशी जय मल्हारच्या यशाचा अनुभवहि आहेच. सोबत मेहनत करणारे कलाकारहि आहेतच. त्यामुळे येत्या काळात, हि मालिका प्रेक्षकांच्या आवडीची, क्रमांक एक ची मालिका नक्की ठरेल यात शंका नाही. या मालिकेनिमित्त विशाल निकम, कोठारे विजन आणि स्टार प्रवाहच्या टीमला, पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.