कोणत्याही शहराची, स्वतःची म्हणून काही वैशिष्ट्ये असतात. यात मग काही नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे असतात तर काही मानवनिर्मित प्रेक्षणीय स्थळे असतात. काही वेळा यात मानवनिर्मित प्रकल्पांचा ही समावेश असतो. खासकरून एखादा प्रकल्प आकाराने मोठा असेल तर त्याविषयीची उत्सुकता सगळ्यांनाच असते. आपल्या कडे गेल्या काही दशकांत अशी अनेक उदाहरणे देता येतील.
अगदी मुंबईच उदाहरण द्यायचे झाले तर सी लिंक तसेच मोनो आणि मेट्रो प्रकल्प असतील यांचा उल्लेख करता येईल. यातील काहिंचे पुढील टप्पे अजूनही कार्यान्वित व्हायचे आहेत. तर काही टप्पे आज आपण वापरतो आहोत. आज आपल्याकडून वापरले जाणारे हे टप्पे म्हणजे दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहेत. पण त्यामुळे त्यांच्याविषयी आता फारसे असे कौतुक राहिलेले नाही. पण जेव्हा हे प्रकल्प पूर्ण झाले आणि त्यांचे लोकार्पण झाले तेव्हाचे दिवस आठवा. सी लिंक वरून जातानाची पहिली आठवण आजही लक्षात असते. तसेच मुंबईतील मेट्रो वा मोनो मधून केलेला पहिला प्रवास आजही स्मरणात असतो. इतकंच काय तर काहींना अगदी पहिल्या दिवशी या मेट्रो आणि मोनोमधून प्रवास ही करता आला नव्हता. काहींनी तर लांबून लांबून गाड्या मेट्रो स्टेशन खाली आणल्या होत्या आणि मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि मग परतीचा असा प्रवास केला होता.
आजही त्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात ताज्या आहेत. अर्थात गेल्या काही दिवसांपर्यंत या आठवणी विस्मृतीत गेल्या सारख्या वाटत होत्या. पण पुण्याची मेट्रो अंशतः का होईना पण सुरू झाली आणि या आठवणी अगदी मनःपटलावर पुन्हा आल्या. बरं या प्रकल्पाचे उद्घाटन झाले म्हणून या आठवणी तरळल्या. पण नंतर या मेट्रो मधील काही व्हिडियोज आणि फोटोज असे काही वायरल झाले की या आठवणी अजून गडद झाल्या. यातील पहिला फोटो होता तो म्हणजे गर्दीचा !आपल्या शहरात मेट्रो आली म्हणून कौतुक वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे पुणेकरांनी अगदी आवडीने या प्रवासाचा आनंद घेतलेला दिसला. त्यातील काहींनी, अगदी पुणेरी थाटात सोशल मीडियावर ‘पुण्याची मेट्रो मुंबई लोकल झाली’ अशा आशयाचे कॅप्शन असलेल्या टिपण्या केल्या आणि हसूच आलं. मग आला एक व्हिडियो ज्यात आपल्याला दोन काकू भांडताना दिसल्या. त्यांच्या वादाच कारण आणि त्या वादाचा परिणाम नंतर काय झाला कळला नाही. पण त्या भांडणाचे अंश सोशल मीडियावर असे काही वायरल झाले की विचारू नका. त्यातही मग काहींनी पुन्हा एकदा, पुणेरी पद्धतीने कॉमेंट्री केलीच. पण या सगळ्यांच्या वरचढ असा एक व्हिडियो बघण्यात आला. हा व्हिडियो एका आजोबांचा आहे.
अर्थात आजोबा अस म्हणत असलो तरी त्यांचा उत्साह आणि पुणेरी टोकदारपणा त्यांच्या वागण्यातून दिसून आलाच. कारण ते एका स्थानकातून नुकतेच मेट्रोच्या डब्यात चढले होते. तेवढ्यात एका वार्ताहराने त्यांना मेट्रोचा अनुभव कसा आहे असं विचारलं. आता दुसरं तिसरं कोणी असतं, तर खूप छान, किती गारेगार वाटतंय वगैरे प्रतिक्रिया दिली असती. पण काकांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, ‘मी आताच बसलोय, जरा जाऊन या मग अभिप्राय सांगतो’. त्या प्रश्नकर्त्याचं काय झालं असेल याचा केवळ विचारच केलेला बरा. अर्थात या सरळसोट उत्तराने आजोबांनी सोशल मीडियावरील सगळ्यांची मनं जिंकली हे मात्र नक्की ! या आणि अशा एकेक गंमती जंमती घडतच असतात. अजूनही अनेक किस्से घडले असतीलच आणि येत्या काळात ते प्रसिद्ध होतीलच. सध्या मात्र त्यातील काही वायरल होताना दिसले आहेत त्यांचा उल्लेख केला आहेच. असो. पण पुण्यासारख्या आपल्या महाराष्ट्रीय शहरात अजून एक प्रकल्प लोकांसाठी चालू झाला याचा आनंद आहेच. या प्रकल्पाचा लाभ पुणेकर आणि तेथे आलेले प्रवासी ही अगदी आनंदाने घेत राहतील एवढं नक्की.
या लेखाचा शेवट करण्याआधी एक सूचना. आपल्या टीमने वर उल्लेख केलेल्यापैकी आजोबांच्या प्रतिक्रियेचा व्हिडियो आम्ही लेखाच्या खाली देत आहोत. आमच्या टीमला तर हा व्हिडियो आवडलाच आणि आपल्याला ही आवडेल अस वाटलं म्हणून हा व्हिडियो शेअर करतो आहोत. बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :