मार्चपासून ते जून-जुलै पर्यंत लग्नाचा सिझन चांगलाच जोर धरून असतो. दर दिवसाआड लग्नाच्या तिथी असतातच आणि एकेका तिथीला दोन-दोन, तीन-तीन लग्नाच्या पत्रिका आपल्या घरी येतात. जवळचा असो वा नसो लग्नाला हजेरी लावण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळी कारणं असतात, हे मात्र तितकच खरं. आणि ह्या लग्नकार्यात अशा काही गमती जमती घडतात कि त्या काही केल्या विसरता येत नाहीत. त्याचबरोबर आपल्याला कायमचे लक्षात राहणारे नमुने देखील बरेच भेटतात. आणि लग्नाचा महत्वाचा भाग म्हणजे “वरात”. लग्नाला कितीही उशीर होत असला तरी वऱ्हाडी मंडळी बहुतेकदा या वरातीत दंग बघायला मिळतात. आता त्यातले किती शुद्धीत आणि किती धुंद असतात ते काय मोजायला नको. आणि मग सुरू होतो त्यांचा घोड्या पुढचा नागिन डांस. कदाचित घोडा सुद्धा मनातल्या मनात त्यांच्यावर हसत असणार.
पण आता घोडे सुद्धा काही मागे राहिलेले नाही त्यांनीसुद्धा आता ह्या वरातींमध्ये आपली एक वरात सामील केलीये. ह्या व्हिडिओमध्ये काही सजवलेले घोडे एकामागोमाग नाचत उधळत आजूबाजूला असलेल्या बँडच्या तालावर चालताना दिसत आहे. पण त्यांचा हा प्रकार बघून एका हुशार माणसाला चांगलीच हुक्की येते. तोही त्यांना शिट्ट्या मारून मारून साथ द्यायला लागतो. जणू काही तोही त्यांच्यातलाच असावा. घोड्यांनी बिचार्यांनी विचार केला. जाऊदे एवढा म्हणतोच आहे ना तर मग नाचून घेऊ थोडसं याच्या सोबतही. म्हणून पहिला घोडा त्याच्याजवळ येतच होता पण नेमका हा मागे सरकला आणि वाचला. मागच्या घोड्याने हा खेळ बघितला असावा म्हणून तर त्याने पुढचा डाव हुशारीने खेळला. माणूस दुसऱ्या घोड्या पुढे शिट्टी वाजवायला लागला. तसा घोडा लक्ष न देता थोडा पुढे सरकला, पण मागच्या दोन्ही पायांनी त्याने त्या माणसाला चांगलाच प्रसाद दिला. या व्हिडिओतून एवढं नक्कीच कळतय की माणसाच्या वरातीत घोडा सामील होतो पण एखादा माणूस घोड्यांच्या वराती मध्ये तग धरु शकत नाही. त्यामुळे त्यापुढे कोणत्याही जनावराशी खेळ करताना जरा सांभाळूनच!
बघा व्हिडीओ :