बॉलिवूडचे कपल्स नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. तसं पाहायला गेले तर बॉलिवूडमध्ये लग्न झाले कि ते टिकून राहीलच, असं सहसा होत नाही. खूपच कमी अश्या जोड्या आहेत ज्या लग्न झाल्यापासून अजून पर्यंत एकमेकांच्या सोबत आहेत. तर बहुतेकांनी घटस्फोट घेऊन दुसरा साथीदार देखील निवडलेला असतो. त्यांच्या रील लाईफ आणि रिअल लाईफ दोन्हींमध्ये घडलेल्या घटना लोकांपर्यंत सातत्याने येत असतात. ह्रितिक-सुझेन, मलाईका-अरबाज ह्यासारख्या अनेक लोकप्रिय सेलेब्रेटींचा ह्या अगोदर घटस्फोट झाला आहे. परंतु आज ज्या जोडीबद्दल घटस्फोटाची माहिती मिळाली ती म्हणजे आमिर खान आणि किरण राव. तब्बल १५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या चाहत्यांनाही ह्या गोष्टीने धक्का बसला आहे.
आमिर खान आणि किरण राव हे गेली १५ वर्षे एकत्र संसार करत होते. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्यात खटके उडत होते. मीडियामध्ये सुद्धा ह्या बातम्या येत होत्या. परंतु दोघांनीही ह्या बातम्यांचे खंडन करत त्यांच्यात सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले होते. तसेच ते अधून मधून मीडियासमोर एकत्र दिसत होते. मिळालेल्या माहिती नुसार गेले एक-सव्वा एक वर्षांपासून दोघेही वेगळे राहत होते. परंतु आज आमिर खानने पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्याचसोबत ते व्यावसायिकदृष्ट्या एकत्र काम करतील. त्यांचे हे नातं त्यांच्या कामामध्ये येणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केले. दोघांनीही अनेक चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे. आमिर खानच्या बहुतेक चित्रपटामध्ये किरण राव ह्या प्रोड्युसर आहेत. त्यांचे काही प्रोजेक्ट्ससुद्धा पूर्ण व्हायचे बाकी आहेत. सोबत पाणी फाउंडेशनचे काम ते एकत्र करणार, हेही आमिर म्हणाला. दोघांना आझाद नावाचा मुलगा असून दोघेही संयुक्तरित्या मुलाची जबाबदारी घेणार असल्याचे सांगतिले.
किरण राव हि आमिर खानची दुसऱ्या पत्नी आहे. १९८६ मध्ये त्याने रिना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. पहिली पत्नी रीना पासून त्याला इरा नावाची मुलगी झाली. आमिरने २००२ साली आपली पहिली पत्नी रीनाला घटस्फोट दिला होता. परंतु त्या अगोदरच ‘लगान’ चित्रपटादरम्यान आमिर आणि किरण रावची मैत्री झाली होती. किरण राव ‘लगान’ चित्रपटाच्या असिस्टंट डायरेक्टर होत्या. त्यानंतर दोघांमधील मैत्री वाढू लागली. दोघांनीही जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००५ मध्ये लग्न केले. आता १५ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटामागील नेमके कारण समोर आले नाही. परंतु गेल्या काही काळापासून त्यांच्यात खटके उडत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. बॉलिवूडचे हे लोकप्रिय जोडपं दीड दशकं एकत्र संसार केल्यानंतर आज वेगळे झाले. ह्या बातमीने मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.