स्टार किड्स म्हणजे सेलेब्रिटीजची मुलं. त्याचं आयुष्य कसं असतं याविषयी आपल्या सारख्या सामान्यांना अप्रूप असतं. अनेक वेळेस मुलांनी त्यांच्या आई वडिलांसारखा मार्ग चोखाळला तर तेही सेलेब्रिटी होतात. पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. ते अनेक वेळेस प्रसिद्धी पेक्षा वेगळा असा मार्ग निवडतात. असाच एक स्टार किड म्हणजे अनिकेत सराफ. अभिनयसम्राट अशोक सराफ आणि अभिनय सम्राज्ञी निवेदिता सराफ यांचा मुलगा. अशोक सराफ यांना सगळे अशोक मामा म्हणून ओळखतातच. त्यांच्या सहजसुंदर विनोदाने आपल्या पैकी अनेकांना लहानपणी विनोदाची तोंडओळख करून दिली असेल. आजही निवडक नाटकं आणि सिनेमा यांच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचा आस्वाद आपण सगळे घेऊ शकतो.
तसेच सध्या आपण निवेदिताजींना ‘अग्ग बाई सासूबाई’ मधील भूमिकेतून बघतो आहोतच. त्यातल्या काळजीवाहू, प्रामाणिक अशा आसावरी या व्यक्तिरेखेशी प्रत्येक घरातली आई समरस होऊ शकली आहे. खऱ्या आयुष्यातही तेवढ्याच मायाळू असणाऱ्या निवेदिताजी, उत्तम स्वयंपाकही करतात. अगदी अन्नपूर्णा. आपण त्यांचे कुकिंगचे विडीयोज युट्युब वर बघू शकतो. तर अशा या अन्नपूर्णेला पाहता पाहता त्यांच्या मुलामध्ये – अनिकेतमध्ये कुकिंगची आवड निर्माण झाली. त्यांची जेवण बनवण्याची आवड जशी त्याने अंगिकारली तशीच जेवण बनवताना ठेवायची स्वच्छते विषयीची सवय सुद्धा. पण कुकिंग हि केवळ आवड म्हणून न जपता, त्याचं आपल्या पेशामधे रुपांतर करायचा निर्णय त्याने घेतला.
तसं रीतसर प्रशिक्षणसुद्धा त्याने पॅरीस, फ्रांस येथे जाऊन घेतलं. आणि त्याचमुळे कि काय त्याच्या कुकिंगवर युरोपियन रेसिपीज आणि तिथल्या जेवण बनवण्याच्या शैलीचा प्रभाव पडला आहे. तेथून शेफ बनून तो भारतात परतला. इथे त्याने स्वतःच काम सुरु केलं. त्याच्या जवळच्यांमध्ये निक या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला अनिकेत जसा शेफ बनला तसाच तो युट्युबरही आहे. गेट करीड या युट्युब चॅनेलद्वारे तो आपल्या रेसिपीज त्याच्या फोलोवर्स सोबत शेयर करत असतो. त्याने त्याला आवड असलेलं करियर तर निवडलंच पण त्यात तो यशस्वी पण झाला असं दिसतंय. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)