Breaking News
Home / मराठी तडका / आस्ताद काळे ह्याने शेअर केली पोस्ट…मी सध्या काम शोधतोय, माझ्यायोग्य भूमिका असेल तर

आस्ताद काळे ह्याने शेअर केली पोस्ट…मी सध्या काम शोधतोय, माझ्यायोग्य भूमिका असेल तर

सिंगिंग स्टार हा संगीत रियालिटी शो नुकताच संपन्न झाला. लॉक डाऊन च्या काळात एक नवीन कलाकृती पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक खुश झाले होते. या कार्यक्रमातील सहभागी कलाकारांनीही प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे गाणी उत्तमरीत्या सादर केली. त्यामुळे प्रेक्षक आनंदी झाले असले तरीही हा कार्यक्रम लवकर संपला असं वाटत राहिलं. एक प्रकारे या कार्यक्रमासाठी ही पोचपावतीच.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका कलाकाराने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं, ते म्हणजे आस्ताद काळे. याआधी बिग बॉस मराठी च्या पर्वात त्याचं गाणं ऐकण्याची संधी काही वेळेस मिळाली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला सातत्याने ऐकता आलं. तो या संपूर्ण प्रवासात तन्मयतेने गायला, पण एका भागात तर त्याला अश्रू अनावर झाले होते. या कार्यक्रमामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाची एक हळवी बाजूही यानिमित्ताने पाहता आली. एरवी तो सडेतोड बोलणारा, मनात असेल ते ओठात ठेवणारा आहेच. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तो वेळोवेळी विविध विषयांवर व्यक्त होत आला आहे. त्यात कलाक्षेत्र, क्रिकेट हे नित्याचे विषय असतात. पण सध्या तो अजून एका सोशल मीडिया पोस्ट मुळे चर्चेत आला आहे.

त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून, तो सध्या अभिनय वा सूत्रसंचालन क्षेत्रात एखादं काम शोधतो आहे. त्याच्या योग्य भूमिका असल्यास सांगावं असं म्हंटलं आहे. गेले कित्येक महिने लॉक डाऊन मुळे कामं मिळण्याची परिस्थिती काय आहे, हे आपण पाहतो आहोतच. त्यामुळे अनेकांनी फेसबुक, लिंक्डीन सारख्या सोशल मीडियाचा वापर गेल्या काही महिन्यांत केल्याचं आठवत असेल. आपणही स्वतः अनेकांच्या अशा पोस्ट एक मदत म्हणून शेअर केल्या असतीलच. पण एखाद्या कलाकाराकडून अशी पोस्ट येणं हे दुर्मिळ. पण विषयाला थेट भिडणाऱ्या आस्तादने इथे थेटपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. या पोस्टवर सर्वप्रथम सुप्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आस्ताद यांस पाठिंबाही दर्शवला आहे. तर अजिंक्य खांबेटे हे व्हॉइस ओवर कलाकार आहेत, त्यांनीही आस्ताद याला इच्छा असल्यास आपल्या रेकॉर्डिंग स्टुडिओत काम करण्याचं आमंत्रण दिलं आहे. कलाकारांसोबतच प्रेक्षकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहुतांशी प्रेक्षकांनी आस्ताद याने थेटपणे स्वतःचं म्हणणं मांडल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोरंजन क्षेत्रात काम मिळणं आणि ते टीकणं ही तारेवरची कसरत असते. अशावेळी अनेक कलाकार प्रॉडक्शन हाऊसेस आणि निर्माते तसेच दिग्दर्शक यांच्याकडे जाऊन भेटत असतात. ऑडिशन्स देत असतात. पण याच सोबत सोशल मीडियाचा असाही वापर करणारा आस्ताद सारखा कलाकार हा विरळाच. आस्ताद याने याआधी अनेक मालिका, नाटके, सिनेमे यांतून कामे केलेली आहेत. ‘आनंदी हे जग सारे’ ही त्याची नजीकच्या काळातील मालिका. तर सिंगिंग स्टार हा रियालिटी शो. तसेच त्याने फत्तेशिकस्त या ऐतिहासिक सिनेमातही काम केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘जंगजौहर’ या बहुप्रतिक्षित सिनेमातही तो दिसेल. तरुण आहे रात्र अजुनी, तिला काही सांगायचंय ही त्याची गाजलेली नाटके. एकूणच काय, तर आस्ताद काळे म्हणजे उत्तम अभिनय हे एक अतूट समीकरण आहे. असा हा आपला लाडका आणि लोकप्रिय कलाकार लवकरचं आपल्याला विविध कलाकृतींतुन पुन्हा एकदा भेटीस येईलच. त्यासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवात तर केली आहेच. यात त्याला संपूर्ण यश मिळो, ह्या मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *