सध्या नवनवीन टीव्ही कार्यक्रम येण्याचा जणू सपाटा लागला आहे. त्यातील रियालिटी शोजची संख्याही लक्षणीय आहे. या रियालिटी शोजमधून आपल्याला जे उदयोन्मुख कलाकार दिसतात, त्यात अनेक लहान मुलं सुद्धा असतात. खरं तर त्यांच्या कडे पाहून यांना हे झेपेल का असं काही वर्षांपूर्वी वाटायचं. पण आता मात्र खात्री असते की इथपर्यंत हे बाळ आलं आहे म्हणजे यात नक्कीच काही खास बात आहे. अर्थात अशी ही नव्या पिढीतील बाळं प्रत्येक वेळी रियालिटी शोज मधून दिसतील असं नाही. त्यातील अनेक जण आपल्याला युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरूनही दिसून येतात. तिथे त्यांच्या कलेचं सादरीकरण ते करत असतात. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा हा लेख एका नवोदित बाल कलाकाराविषयी असू शकतो ते. बरोबर आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बाल कलाकाराविषयी.
ही बालकलाकार आहे प्रज्ञा मेधा सरकार. ही चिमुरडी आहे केवळ तीन ते चार वर्षांची. पण तिचा गळा इतका गोड आहे की ती गात असलेलं गाणं केवळ ऐकत राहावं असं वाटतं. खरं तर लहान मुलांच्या तोंडून गाणी ऐकणं म्हणजे वेळ छान जातो. मजा येते. त्यात ही लहान मूल जर सुरेल असतील तर दुधात साखर. हाच अनुभव प्रज्ञाला ऐकताना येतो. बरं हे केवळ आम्हीच नाही तर अनेक प्रथितयश वृत्तसंस्था तसेच सोशल मीडिया चॅनेल्स म्हणतात. तिने गायलेलं लता दिदींच ‘लग जा गले’ हे गाणं तर अतिशय लोकप्रिय ठरलं आहे. सोबतच अनेक जुनी नवीन गाणी ही गाजली आहेत. या सगळ्या गाण्यांचा अनुभव आपल्याला तिच्या युट्युब चॅनेल वरून घेता येतो. तिच्या संपूर्ण नावाने हे चॅनेल चालवलं जातं. यात तिच्यासोबत तिची आई अनेक वेळेस दिसून येते. त्या सुद्धा खूप छान गातात. अनेक वेळेस ही मायलेकीची ही जोडी एकत्र गाणी गाताना दिसते. मध्यंतरी त्यांनी एक लाईव्ह सेशन केलं होतं ज्यात दोघींनी एक गाणं एकत्र गायलं होत.
तसेच या लाईव्ह सेशन मधून प्रज्ञाचा नटखट अंदाज ही लक्षात आला होता. तिच्या वयाला अनुसरून तिचं होत असलेलं नटखट वागणं पाहून गंमत वाटली होती. या दरम्यान तिने अनेक गाणी गायली होती. त्यातलं एक तर आमच्या टीमचं फार आवडतं गाणं आहे. अमोल पालेकर आणि टिना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं , ‘चले सब के कदम, तारा रमपमपम, कुछ ऐसे गीत गाया करो’ हे ते गाणं. यातील फिमेल व्हॉइस हा आपल्या लाडक्या लता दिदींचा आहे. प्रज्ञा तशी विविध भाषांतील गाणी गात असते. पण लता दिदींची गाणी विशेषकरून गाते असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपण वर उल्लेख केलेल्या गाण्याचा व्हिडियो जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्यात ही प्रज्ञा बाळ नेहमीप्रमाणे गोड वाटत असते. त्यात तिने मिनी माउस सारखा हेअर बँड घातला असल्याने अजून छान दिसते. वर उल्लेख केलेल्या लाईव्ह सेशन मध्ये हे गाणं गाताना तिने हा हेअर बँड घालावा अशी शिफारस ही आली होती. त्यावरून हा व्हिडियो किती लोकप्रिय ठरला असेल याची कल्पना येते.
त्यात तिचे हावभाव, गाण्यातील विविध जागा सुद्धा छान पद्धतीने घेणं हे सगळं आवडून जातं. या गाण्यात एक ओळ अशी आहे की जिथे सलग खूप शब्द आल्याने गायक चुकू शकतात, लय बिघडू शकते. पण प्रज्ञा ते ही आव्हान छान रित्या पार करते. यामुळे तिचं विशेष कौतुक वाटतं. हे गाणं खरं तर तिने जवळपास दीड वर्षांपूर्वी गायलं आहे. पण आजही त्यातला गोडवा कायम आहे. आपल्याला संधी मिळाल्यास हे गाणं प्रज्ञाच्या आवाजात नक्की ऐका. आमच्या टीमकडून या छोट्या गायिकेला मनःपूर्वक शुभेच्छा आणि भरभरून आशिर्वाद. खूप मोठी हो बाळा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपली टीम सातत्याने आपल्या वाचकांना आवडतील असे विषय घेऊन येत असते. त्यामुळे या लेखांवर आपल्या प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा आम्हाला प्रोत्साहन ही मिळतं आणि नवनवीन गोष्टी शिकायला ही मिळतात. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया या कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि आपल्या सोबत आमचा स्नेहबंध अजून घट्ट होत राहू दे ह्याच शुभेच्छा !!!
बघा व्हिडीओ :