बॉलिवूडमध्ये अगोदरपासूनच अभिनेत्यांचा दबदबा राहिला आहे. अनेकदा प्रेक्षकही ठराविक अभिनेता असेल तर आपोआपच चित्रपट पाहायला जातात. मग तो सलमान खान असो कि शाहरुख खान, अक्षय कुमार असो कि रणवीर सिंग किंवा मग आमिर खान. बॉलिवूडमध्ये हिरोंच्या स्टारपावर वर अनेक चित्रपट चालले. परंतु काही अभिनेत्री अश्या सुद्धा आहेत, ज्या स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये राज्य करतात. त्यात आवर्जून नाव घ्यायचे झाले तर हेमा मालिनी, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, काजोल. ह्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आताच्या काळात त्याच यादीत एका अभिनेत्रीचे नाव सहज घेता येईल, ती अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्याने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका आणि वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करून आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे. विद्या बालन हि महिलाप्रधान चित्रपटांसाठी ओळखली जाते. चला तर आजच्या लेखात विद्या बालन विषयी जाणून घेऊया.
विद्याचा जन्म १ जानेवारी १९७९ मध्ये केरळ येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव पी. आर. बालन असून ते डीजीकेबल चे एग्जीक्यूटिव वाइस प्रेसीडेंट आहेत. आईचे नाव सरस्वती असून त्या गृहिणी आहेत. विद्याचे संपूर्ण बालपण मुंबईतच गेले. चेंबूर येथील ऍंथोनी गर्ल्स स्कुल मधून तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमधून आपली समाजशास्त्राची डिग्री मिळवली. त्यानंतर तिने मुंबई युनिव्हर्सिटीत समाजशास्त्र विषय घेऊन आपली मास्टर्स डिग्री पूर्ण केली. तिला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. इतकंच नाही तर एका प्रोड्युसरने तर तिला चक्क ‘अपशकुनी’ सुद्धा म्हटले होते. परंतु विद्याने हार मानली नाही. त्यानंतर विद्याने अनेक जाहिराती आणि मालिकांमध्ये कामे केली. विद्याने लोकप्रिय टीव्ही सीरिअल ‘हम पांच’ मध्येही काम केले आहे. त्यानंतर तिने अनेक म्युजिक व्हिडीओ अल्बम मध्ये कामे केली. तिने सुभा मुदगल आणि पंकज उधास सारख्या गायकांसोबत आणि वेगवेगळ्या बँड्स सोबत काम केले.
विद्याला चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे ‘परिणीता’. तिने ‘परिणीता’ ह्या आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर अपयशी ठरला तरी तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. परंतु तिच्या करिअरचा सर्वात मोठा मैलाचा दगड ठरला तो म्हणजे ‘भूलभुलैया’ चित्रपट. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या देखील खूप चालला आणि तिच्या कामाचेदेखील चीज झाले. ह्या चित्रपटांत तिने अवनी आणि मुंजुलिका ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. तिने मुंजूलीकाचे पात्र उत्कृष्ट पद्धतीने साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने पा, ड र्टी पिक्चर, हे बेबी, लगे राहो मुन्नाभाई, कहाणी, देढ इश्किया, हमारी अधुरी कहाणी, मिशन मंगल, तुम्हारी सुलु सारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आणि त्यात आपल्या अभिनयाची क्षमता सर्वाना दाखवून दिली. तिला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि ६ फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्याचबरोबर २०१४ मध्ये तिला ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात केले गेले.
विद्या बालन हिचे लग्न १४ डिसेंबर २०१२ ला लोकप्रिय चित्रपट प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूर ह्यांच्याशी झाले. दोघांनीही चेंबूर येथील एका मंदिरात विवाह केला. सिद्धार्थ रॉय हे बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर ह्याचे ज्येष्ठ बंधू आहेत. सिद्धार्थ हे निर्माते असण्यासोबतच ते एक वायसायिक सुद्धा आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर हे ‘रॉय कपूर फिल्म्स’ चे संस्थापक आणि मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. त्यांच्या चित्रपट बॅनर अंतर्गत तारे जमीन पर, चेन्नई एक्सप्रेस, पीहू, एबीसीडी, दं गल सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली. विद्या एका चित्रपटासाठी जवळपास १० कोटी रुपये इतके मानधन घेते. आकडेवारीनुसार तिची सर्व प्रॉपर्टी मिळून जवळपास २१० कोटी रुपयांची मालकीण आहे. तिच्या जवळ मर्सडिज इ क्लास, सेडॉन सारख्या आलिशान गाड्या आहेत. अभिनय आणि जाहिराती हे तिच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. इतक्या मोठ्या संपत्तीची मालक असून देखील ती साधी सरळ आयुष्य जगणे पसंत करते. ती आपल्या पतीसोबत जुहु येथील एका अपार्टमेंट मध्ये राहते. विद्या महिलांच्या सशक्तीकरणाला समर्थन करते. ती ‘इंडियन सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ ची सदस्य आहे. त्याचसोबत ती एक रेडिओ शो सुद्धा होस्ट करते. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हेच तिच्या जगण्याचे ब्रीद आहे. अश्या ह्या सध्या सरळ विद्याला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा.