Breaking News
Home / बॉलीवुड / एकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार

एकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार

नाना. आपल्या सगळ्यांचे नाना पाटेकर. एक अवलिया कलाकार. संवेदनशील माणूस. पण तरीही गोष्टी जशा आहेत तशा सांगणारं एक दमदार आणि उमदं व्यक्तिमत्व.

आजकालच्या पिढीला त्यांची ओळख त्यांच्या गेल्या काही वर्षातल्या भूमिकांमुळे आणि “नाम” तर्फे त्यांनी केलेल्या कामामुळे जास्त असेल. पण नाटक आणि सिनेमा यांचे चाहते असणाऱ्यांना, नानांनी कित्येक दशके आपल्या अभिनयाने आनंद दिला आहे. विजया मेहता ज्यांना ते आदराने विजया बाई अस म्हणतात, यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे त्यांनी गिरवले. नानांनी त्यांच्या नाटकात काम करायला सुरुवात केली. मग ते सिनेमा क्षेत्राकडेही वळले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक भूमिका रंगवल्या आहेत. पण त्यांच्या अभिनयाच्या शैली मधला थेट आणि सच्चेपणा रसिक प्रेक्षकांना भावून जातो. या थेटपणामुळेच कि काय पण, तिरंगा (१९९३) आणि क्रांतिवीर (१९९४) मधल्या त्यांच्या व्यक्तिरेखा एवढ्या वर्षानंतर सुद्धा लक्षात राहतात.

जसा त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाने या भूमिकांना पुरेपूर न्याय मिळवून दिला तसाच त्यांच्या संवाद फेकीने प्रेक्षकांना लुब्ध तर केलेच पण प्रसंगी जागच्या जागी खिळवून ठेवले. वजूद (१९९८) मधला माधुरी दीक्षित यांच्या सोबतचा प्रसिद्ध संवाद आठवा. पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो, एवढा तो दोघांनी जिवंत केला. तसेच, नटसम्राट मधले हि आर्त आणि हृदय पिळवटून टाकणारे संवाद. नानांनी आपल्या अंगभूत क्षमतेने त्यांना न्याय दिला. आधीच थोर असणारे ते संवाद अजरामर केले. कोणतीही गोष्ट ताकदवान हवी, हे खरं असलं तरीही कलाकार हा ताकदीचा असेल तर ती भूमिका फुलते.

नाना आपल्या कारकिर्दीत केवळ त्याच त्याच भूमिकांमध्ये अडकून राहिले नाहीत. ‘टॅक्सी नं. ९२११’ मधली ड्रायवरची भूमिका आठवा. नकळत, आपल्याला एवढं थेट वागता यायला हवं अस वाटून जातं. आणि लक्षात येतं, त्यांच्या सहज अभिनयाने हे शक्य होतं. प्रेक्षक नकळत स्वतःला त्या भूमिकेत पहातो. आणि “वेलकम” मधला उदय शेट्टी. आजही त्यांच्या कांदे विकणाऱ्या मजेशीर सीनचा विडीओ हसवून जातो.

त्यांनी २०१६ साली आलेल्या डिस्नेच्या जंगल बुक या हॉलीवूड चित्रपटाच्या हिंदी डबिंग साठी पण काम केले. त्यात त्यांनी शेर खानला आपला दमदार आवाज पुरवला होता. या झाल्या नजीकच्या काळातील भूमिका. अनेकांना या निमित्त, अग्नी साक्षी, खामोशी (१९९६), युगपुरुष (१९९८), कोहराम (१९९९), अब तक छप्पन (२००४) यांचीही आठवण आली असेल. त्यांनी १९९१ साली प्रहार हा चित्रपट दिग्दर्शित केला. आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जवानांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेतले. देशा विषयी प्रेम दाखवणारं जसं हे वागणं आहे तसच, त्यांच्या भूमिकांसाठी किती कष्ट त्यांनी घेतले असतील हे हि दिसून येतं.

तर एवढ्या नानाविविध भूमिका करणारे नाना सुरुवातीला चित्र काढण्याचे काम करीत. त्यांनी त्यातले शिक्षणही घेतले होते. आपल्या आयुष्यात नानांनी कष्टाचे दिवस बघितले. सुरुवातीचा काळही बिकट म्हणावा असा. आयुष्यभर वादळे झेलली. आरोप सहन केले. पण ते झुंझले. त्यांना सोबत मिळाली ती त्यांच्या पत्नी नीलकांती यांची. नीलकांती यांनीही अभिनय क्षेत्रात काम केले आहे. दोघांच्या मुलाचं नाव मल्हार. त्याचं व्यक्तिमत्व सर्वसमावेशक राहिल,हे दोघांनीहि पाहिलं.

नाना पाटेकर हे खूप बिकट परिस्थितीतून वर आलेले अभिनेते आहेत. ते चित्रपटात येण्यापूर्वी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करत असे. त्यांनी अप्लाइड आर्टस्मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे. ते एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत. ते मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी आरोपींचे स्केच बनवण्याचे काम करत असे. ह्याशिवाय त्यांनी ‘प्रहार’ चित्रपटातील भूमिकेसाठी ३ वर्षे लष्करी प्रशिक्षण सुद्धा घेतलेले आहे.

आपल्या सुरुवातीच्या दिवसात परिस्थितीने शिकवलेले धडे ते कधी विसरले नाहीत. म्हणूनच आज सगळं काही कमावून सुद्धा, त्याचा अहंकार त्यांना नाही. समाजासाठी म्हणून काही करता यावं म्हणून “नाम” सारखी संस्था श्री. मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवू शकले. त्याच बरोबर राज कपूर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचे मानधन त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला दिले. केवळ बोलून प्रश्न सुटत नसतात तर कृती करावी लागते हे त्यांच्या या वागण्यातून दिसून आलं. आणि म्हणूनच २०१३ साली पद्मश्री त्यांना मिळाली, हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाचं चीजच आणि आपल्या सारख्या त्यांच्या चाहत्यांसाठी अभिमानाच क्षण. त्यांच्या या कामामुळे आपण सगळे प्रेरित आहोतच, पण तसेच नतमस्तक सुद्धा. अशा या आपल्या लाडक्या अभिनेत्याला सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या कारकिर्दीला आणि सामाजोपयोगी कामांना मानाचा मुजरा.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *