मराठी गप्पाच्या माध्यमांतून आमची टीम अनेक लोकप्रिय कलाकारांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. या दोघांमधला समान दुवा म्हणजे विनोदी कार्यक्रम, मग ते फु बाई फु असू दे किंवा चला हवा येऊ द्या. या दोन्ही कार्यक्रमांतून या विनोदवीरांनी आपल्याला हसवलं आहे. तसंच अनेक वाचकांना कल्पना असेलंच, पहिल्यांदा फु बाई फु हा कार्यक्रम होता. मग ‘चला हवा येऊ द्या’ ची संकल्पना पुढे आली आणि आजतागायत हा कार्यक्रम महाराष्ट्रात हास्य धुमाकूळ घालतो आहे. या कार्यक्रमाची पहिली संहिता लिहिताना भाऊ कदम आणि कुशल बद्रिके एकत्र होते. पहिल्या भागापासूनचं त्यांनी चला हवा येऊ द्या ला आत्तापर्यंत मोठं होताना पाहिलं आहे. या काळात या दोघांसोबतच एक नाव या कार्यक्रमाची संहिता लिहित होत. लेखन, दिग्दर्शन, संकलन, अभिनय, सूत्रसंचालन या सगळ्या पातळ्यांवर आघाडीवर राहुन काम करत होतं. अशा या हरहुन्नरी कलाकाराचं नाव म्हणजे डॉ. निलेश साबळे. आज या लेखाच्या निमित्ताने डॉक्टरांच्या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
निलेश साबळे म्हणजे लहानपासून थोरांपर्यंत सगळ्यांना परिचित असलेले नाव. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमापासून त्यांना टेलीविजनवरून कलाकार म्हणून सर्वत्र ओळख मिळाली. पण त्याआधीच त्यांनी आपल्या कलाप्रवासास सुरुवात केलेली होती. त्यांनी काही मुलाखतींमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी लहान असल्यापासून त्यांना कलाक्षेत्राची आवड. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांतून ते भाग घेत असत. त्यांना लक्षात आलं होतं कि कलाक्षेत्राविषयी त्यांना विशेष ओढ असून येत्या काळात याच क्षेत्रात ते उत्तम कारकीर्द घडवू शकतील. पण सोबत आपलं शिक्षण पूर्ण करणंही त्यांना उचित वाटलं. त्यांचे वडील शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्याने, त्यांच्या प्रगतीशील विचारांचा पगडा होताच. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी मेडिकलला प्रवेश घेतला. पण त्या वेळेस त्यांना असं आढळलं कि, मेडिकल कॉलेजेस मध्ये नाटकांचे ग्रुप्स कमी आहेत. पण अभिनय तर करायचा आहे. यावर उपाय म्हणून मग त्यांनी एकपात्री प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे या एकपात्री प्रयोगांचे त्यांनी ५०० पेक्षाही अनेक प्रयोग केलेले होते.
इच्छा असेल तिथे मार्ग कसा तयार केला जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण. तसचं, कोणतही केलेलं काम हे उपयोगी पडतच. तसच झालं. या एकपात्री प्रयोगांमुळे तसेच युथ फेस्टिवलमधील कामांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळायला लागली. यातून झालेल्या ओळखीतून त्यांनी हास्यसम्राट या गाजलेल्या कार्यक्रमात एका भागात पाहुणा कलाकार म्हणून सहभाग नोंदवला होता. तसेच एका मालिकेसाठी त्यांची निवड झाली होती. पण काही कारणांमुळे हि मालिका बंद पडली होती. याच काळात त्यांच्याकडे रहायाला जागा नव्हती. बस स्थानकावर काही काळ घालवावा लागला. या पडत्या आणि संयमाची परीक्षा बघण्याच्या काळात त्यांच्या कुटुंबियांची मनापसून त्यांना साथ लाभली असे ते आवर्जून नमूद करतात. पण काही काळाने एक अशी संधी त्यांच्याकडे चालून आली ज्या संधीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. हि संधी म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेण्याची. त्या कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या एपिसोडपर्यंत निलेश यांनी आपली कधीही न पुसून येणारी छाप सोडली होती. आपल्या असंख्य किश्श्यांनी त्यांनी प्रेक्षकांची, परीक्षकांची आणि सहकलाकरांचीही मने जिंकली होती. या कार्यक्रमाचे ते यथावकाश विजेतेही झाले.
थोड्याच कालावधीत फु बाई फु हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि त्यात सूत्रसंचालक म्हणून निलेशजी होते. पुढे अनेक स्कीट्सचे लेखन दिग्दर्शन त्यांनी केले. या त्यांच्या हरहुन्नरी स्वभावामुळे ते प्रेक्षकांच्या जसे स्मरणात राहिले तसेच, परीक्षकांच्या कौतुकासहि पात्र ठरले. पुढे ‘चला हवा येऊ द्या’ ची निर्मिती करण्यात आली ती मराठी सिनेमे प्रसिद्धीस हातभार लागावा या हेतूने. सुरुवातीला केवळ एका भागासाठी या कार्यक्रमाला वेळ दिली गेली होती. पण संहिता एवढी उत्तम झाली कि एका भागाचे दोन भाग केले गेले. या कार्यक्रमाच्या या दोन भागांनी इतिहास घडवला असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. कारण तसं नसतं तर हा कार्यक्रम आजपर्यंत चालला नसता. पुढे या कार्यक्रमाचे ‘होऊ दे वायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’ आणि सध्याचं ‘लेडीज जिंदाबाद’ अशी अनेक पर्व गाजली. या कार्यक्रमामुळे भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि अर्थातच श्रेया बुगडे या कंपूसोबत प्रेक्षकांची जी नाळ जोडली गेली ती आजतागायत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने जवळपास दशकभराहून अधिक काळ निलेश हे टेलीविजन क्षेत्राशी निगडीत आहेत. या कार्यक्रमांप्रमाणेच निलेश यांनी ‘लाव रे तो विडीयो’ या कार्याक्रमात त्यांनी चटपटीत सूत्रसंचालन केलं आहे. तसेच त्यात डबल रोलही केला आहे.
लेखन, दिग्दर्शन यांच्यात व्यस्त असतानाही अभिनयाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाहीये हे त्यांचं वैशिष्ठ्य. अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या नकला ते उत्तम रीतीने ते करतात. अशा या हरहुन्नरी कलावंताने टेलिव्हिजनच्या पडद्यावर आपलं अधिराज्य गाजवत असताना, काही सिनेमेही केले आहेत. तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सूत्रसंचालन करताना एवढ्या वर्षात आपल्या शैलीत कधी कंटाळवाणेपणा येऊ दिलेला नाही. त्यांच्यातील प्रयोगशीलता आणि सातत्य यांच्यामुळे त्यांना हे साध्य होत असावं. त्यांच्या या यशामुळे त्यांनी अनेक मानसन्मान मिळवले. पण एक गोष्ट त्यांनी काही काळापूर्वी केली ज्यामुळे त्यांना नक्कीच आपल्या कष्टांचं चीज झालं असं वाटत असणार. जिथे त्यांना एकेकाळी थोड्या कालावधीसाठी का होईना पण राहायला घर नव्हतं, बस स्थानकावर ज्यांना काही काळ रात्र काढावी लागली त्याच शहरात त्यांनी काही काळापूर्वी स्वतःचं घर घेतलं. त्यांच्या या क्षणांत त्यांचे सहकलाकारहि साक्षीदार राहिले. त्यांनी सोशल मिडियावर या क्षणांचे फोटोज शेअर करून निलेश यांना शुभेच्छा दिल्या आणि आपला आनंदहि व्यक्त केला.
निलेश साबळे ह्यांच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. दोघांचा विवाह २०१३ मध्ये झाला. गौरी ह्या सुद्धा व्यवसायाने डॉक्टर आहेत. दोघांचे कौटुंबिक जीवन खूप सुंदर चालू आहे. आज या लेखाचा समारोप करताना दोन गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात ज्या निलेशजींच्याकडून आपल्याला शिकता येतील. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या क्षेत्रात काम करताना अडथळे येत असतातच. पण त्यातून हरून न जाता, आपलं ध्येय न बदलता, युक्तीने आलेल्या अडथळ्यांवर मात करत वाटचाल करत राहिली पाहिजे. जसे कि त्यांनी एकपात्री प्रयोग करण्याचा मार्ग अवलंबला जेव्हा नाटकाचे ग्रुप्स कमी संख्येने असत. दुसरी एक गोष्ट म्हणजे एखादं काम करताना त्यात सतत प्रयोगशील राहणं आणि काम करताना सातत्य राखणं. निलेशजींनी एकपात्री प्रयोग असू देत, फु बाई फु, चला हवा येऊ द्या सारखे कार्यक्रम असू देत, ज्या ज्या कलाकृती केल्या, त्या दीर्घकाळ केल्या. त्याचमुळे दशकभर काम करूनही प्रयोगशीलतेमुळे ते कंटाळवाणे वाटत नाहीत आणि सातत्यामुळे सदैव स्मरणात राहतात. कोणत्याही उभरत्या कलाकारांसाठी आदर्श म्हणावं असं व्यक्तिमत्व. अशा या व्यक्तिमत्वाला मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. त्यांच्या येत्या वाटचालीसाठी त्यांना मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)