Breaking News
Home / मराठी तडका / एकेकाळी बहीण भावाची भूमिका साकारणारे हे मराठी कलाकार आता खऱ्या आयुष्यात आहेत पती पत्नी

एकेकाळी बहीण भावाची भूमिका साकारणारे हे मराठी कलाकार आता खऱ्या आयुष्यात आहेत पती पत्नी

अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून कार्यरत असताना, कलाकार विविध भूमिका साकार करतात. अनेक वेळेस खऱ्या आयुष्यातील जोड्या ऑन स्क्रीनही एकत्र अभिनय करताना दिसतात. काही वेळेस खऱ्या आयुष्यातले नवरा बायको हे एखाद्या कलाकृतीतुन नवरा बायको किंवा एकमेकांचे जोडीदार म्हणून अभिनय करतात. पण खऱ्या आयुष्यातील जोडप्याला ऑन स्क्रीन भाऊ बहीण सकारावे लागले तर. असंच काहीसं झालं आहे दोन जोड्यांच्या बाबतीत. चला तर जाणून घेऊयात त्या दोन जोड्या कोण आहेत ते.

पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे :
मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील एक प्रयोगशील आणि नामवंत जोडी म्हणजे पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे. दोघेही पुणेकर. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातून पूर्ण केलेले. या काळात त्या दोघांनाही नाटकांतून कामे करण्यास सुरवात केली होती. या नाटकांच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं. पुढे नाट्यक्षेत्रात त्यांनी अनेक प्रयोग एकत्रपणे केले. नाटक कंपनी या नाट्यसंस्थेचे ते दोघेही सहसंस्थापक होय. तसेच आसक्त कलामंच या संस्थेतून त्यांनी रंगमंचावर एकत्र काम केलं. या काळात त्यांच्या एका नाटकात त्यांनी भाऊ बहिणीच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. नाटकांसोबतच त्या दोघांनीही शॉर्ट फिल्म्स, सिनेमे यांतून अभिनय केलेला आहे.

रमा माधव या सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा या दोघांनी रंगवल्या होत्या. पुढे विहीर या सिनेमाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा भाऊ बहीण म्हणून समोर आले. त्यांच्या स्वतंत्र कलाकृतीही गाजल्या आहेत. पर्णने बघतोस काय मुजरा कर, फास्टर फेणे, फोटोकॉपी असे प्रसिद्ध सिनेमे केले आहेत. तर अलोकनेही चिंटू, राजवाडे अँड सन्स, फॅमिली कट्टा, डिअर मॉलि असे मराठी, हिंदी-इंग्लिश सिनेमे केले आहेत. डिअर मॉलि या हिंदी इंग्लिश सिनेमाची वर्णी अकादमी अवॉर्डसाठी लागली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून पर्णची एक नवीन शॉर्ट फिल्म आपल्या भेटीस आली आहे. मनकी आँखे असं या शॉर्ट फिल्मचं नाव. या शॉर्ट फिल्मला तिच्या अन्य कलाकृतींप्रमाणेच प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे.

सुव्रत जोशी आणि सखी गोखले :
लॉक डाऊन सुरू असताना, एक मालिका काही काळ चालू होती आणि प्रेक्षकप्रिय झाली होती. आठशे खिडक्या, नऊशे दारं हे या मालिकेचं नाव. या मालिकेत खऱ्या आयुष्यातील एक जोडी रुममेट्स म्हणून पात्र साकारत होते. सुव्रत आणि सखी यांनी या भूमिका एवढ्या उत्तम रीतीने साकारल्या की त्यांच्यातली केमिस्ट्री, तो खेळकरपणा, लटका राग रुसवा हा सगळ्यांनाच आवडून गेला. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेची या निमित्ताने आठवण झाली. या मालिकेत त्यांनी प्रथमतः एकत्र काम केलं होतं. किंबहुना त्यांची पहिली भेटही याच मालिकेच्या निमित्ताने झाली होती. या मालिकेतील दोघांच्याही व्यक्तिरेखा, एकमेकांना भाऊ बहीण मानतात असं दाखवलं गेलं होतं. त्यांची केमिस्ट्री त्या मालिकेतही अफलातून होतीच. पण ही केमिस्ट्री अफलातून होण्याआधी त्यांचं एकदा खूप मोठा वाद झाल्याचं सांगितलं जातं. काम करण्याची पद्धत यांमुळे हा वाद झाला. पण नंतर मात्र तो वाद मावळला आणि उलट त्यांची घट्ट मैत्री निर्माण झाली. हळू हळू याचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही काळापूर्वी या दोघांनी विवाह बंधानात एकमेकांना गुंफून घेण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात दोघांचेही नवनवीन सिनेमे आपल्या भेटीस येतील.

सखीने गोदावरी हा सिनेमा केला असून त्यात नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि अशाच अन्य मान्यवर कलाकारांचा भरणा आहे. तसेच सुव्रतनेही छुमंतर हा सिनेमा केला असून, सदर सिनेमा हा लॉक डाऊन काळात परदेशात शूटिंग झालेला मराठी सिनेमा आहे. लंडन मध्ये शूटिंग झालेल्या या मराठमोळ्या सिनेमासाठी संपूर्ण टीम महाराष्ट्राच्या विविध भागातून लंडन येथे एकत्र जमली होती आणि ठरल्या वेळेत त्यांनी हा सिनेमा पूर्णही केला. सुव्रतनेही त्याच्या सोशल मीडिया पोस्ट वरून या गोष्टीचं विशेष कौतुक केलं होतं, त्यामुळे या नव्या सिनेमाविषयी विशेष उत्सुकता लागून राहिलेली आहे.

कलाकार म्हणून अभिनेते आणि अभिनेत्री विविध भूमिका साकारत असतात. वर उल्लेखलेल्या दोन्ही जोड्या आपल्या कालाकृतींतून प्रेक्षकांचं सदैव मनोरंजन करत आल्या आहेत आणि या पुढेही मनोरंजन करत राहतील हे नक्की. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून दोन्ही जोड्यांना मनापासून शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *