मराठी गप्पाच्या टीमने नेहमीच विविध विषयांवर लेखन केलेलं आहे. यात प्रामुख्याने अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या कारकिर्दीचा आढावा आमची टीम घेत असते. आज याच मांदियाळीत एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका लेखात या अभिनेत्रीचा उल्लेख आला होता, ज्यात लोकप्रिय असलेल्या पण बराच काळ मनोरंजन क्षेत्रात कार्यरत नसलेल्या अभिनेत्रींविषयी माहिती दिली होती. तसेच या अभिनेत्रीचा नुकताच १२ जानेवारी रोजी वाढदिवस ही झाला. हि अभिनेत्री मालिकांमधून लोकप्रियता मिळवत मराठी मालिका विश्वात एकेकाळी आघाडीची अभिनेत्री झाली होती. परंतु लग्नानंतर ह्या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून लांब राहणंच पसंत केले आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या लेखात नक्की कोण आहे हि अभिनेत्री.
सुज्ञ वाचकांनी बरोबर ओळखलं आहे. नेहा गद्रे असं या गुणी अभिनेत्रीचं नाव. नेहा मूळची पुण्याची. लहानपणा पासून चुणचुणीत स्वभावाची. वाचन, नृत्य, अभिनय यांची तिला आवड. याच आवडीतून तिने मिनी सुपरस्टार या टीव्ही वरील कार्यक्रमातून सहभाग घेतला होता. पुढे महाविद्यालयीन जीवनात तिने मॉडेलिंगही केलं. पण तो पर्यंत कलाक्षेत्र हे तिच्यासाठी केवळ एक आवड असावी. पुढे मात्र ही केवळ एक आवड न राहता, तिने गांभीर्याने या क्षेत्रात काम सुरू केलं. तिची पहिली मालिका म्हणजे ‘मनं उधाण वाऱ्याचे’. या मालिकेतील तिच्या नायिकेने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर केलं. पुढे तिने ‘अजूनही चांदरात आहे’ ही मालिकाही केली. तिच्या आधीच्या मालिकेप्रमाणेच या मालिकेलाही प्रेक्षकपसंती मिळाली. या दोहोंच्या सोबतच टीव्ही च्या पडद्यावर हिट ठरलेल्या ‘अप्सरा आली’ या डान्स रियालिटी कार्यक्रमात भाग घेतला होता. उत्तम अभिनयासोबत आपण एक उत्तम नृत्यांगना आहोत हे तिने या कार्यक्रमातून सिद्ध केलं. टीव्हीवर जम बसत असताना तिने चित्रपटातूनही अभिनय केलेला आहे. यात काही वर्षांपूर्वी आलेला ‘गडबड झाली’ हा तिचा तिने अभिनित केलेला शेवटचा चित्रपट.
यात तिच्या सोबत राजेश शृंगारपूरे हे सुद्धा होते. या दोघांवरती चित्रित झालेली पिरतीचं पाखरू आणि इश्काचा खेळूया डाव रे ही गीते प्रसिद्ध झाली होती. या आधी चित्रपटांच्या दुनियेत तिने ‘मोकळा श्वास’ या चित्रपटाद्वारे आगमन केलं होतं. यात तिच्या सोबत मृण्मयी देशपांडे, प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे यांच्यासारखे अनुभवी कलाकार होते. त्यांच्या सोबतीने नेहाच्या अभिनयाचं ही कौतुक झालं. कलाक्षेत्रातील कारकीर्द बहरत असताना नेहाने आपली जर्मन भाषेतली पदविका ही संपादन केली होती. एका मुलाखतीत तिने असंही सांगितलं होतं, की जर्मन भाषेवरील पुस्तके तिने जमवली असून तिला ती अतिशय प्रिय आहेत. यावरून तिच्या भाषा प्रेमाची कल्पना यावी. भाषा, कला यांची आवड असणारी नेहा ही सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक असते. काही वर्षांपूर्वी जेव्हा ती भारतात वास्तव्यास होती तेव्हा तिच्या कलाकार मित्र मैत्रिणींसोबत ती ‘रोटी डे’ पाळत असे. या उपक्रमा अन्वये ग’रीब उपेक्षित जनांच्या दुर्दैवी आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधणं हा या मागचा एक उद्देश. पण हे केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून न करत राहता, नेहा स्वतः जाऊन त्या दिवशी गरिबांना जेवण देत असे. तसेच तिला मिळत असलेल्या प्रसिद्धीचा ती अशा प्रकारे एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उपयोग करत असे.
सध्या नेहा ही ऑस्ट्रेलिया इथे आपल्या नवऱ्यासोबत वास्तव्यास असते. तिच्या नवऱ्याचं नाव ईशान बापट असं आहे. मूळचा पुणेकर असणारा ईशान कामानिमित्त ऑस्ट्रेलिया इथे असतो. नेहा आणि ईशान यांची काही वर्षांपूर्वी एका सामायिक मित्रा तर्फे ओळख झाली. या ओळखीचं पुढे मैत्रीत रूपांतर झालं. काही काळाने मग या त्यांनी एकमेकांविषयीच्या प्रेमाची कबुली दिली आणि काही काळाने विवाहबद्ध झाले. नेहा प्रमाणेच ईशान हा सुद्धा सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक असतो आणि अगदी ऑस्ट्रेलियातही अशा प्रश्नांसाठी कार्यरत असतो. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नेहाचा वाढदिवस साजरा केला. सध्या नेहा कोणत्याही कालाकृतींमधून दिसत नसली तरीही सोशल मीडिया वरती ऍक्टिव्ह असते. अशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना तिच्या कालाकृतींसोबतच एक संवेदनशील व्यक्ती म्हणूनही आपल्या लक्षात राहते. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा !