मनोरंजन क्षेत्रातील कलाकृतींकडून सहसा केवळ मनोरंजन आणि काही घटका विश्रांती अशी अपेक्षा ठेवली जाते. पण हे क्षेत्र एवढं विस्तारलेलं आणि सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला स्पर्श करणारं क्षेत्र आहे कि, त्यामुळे यातील काही कलाकार केवळ मनोरंजन या उद्दिष्टापलीकडे जाऊन काम करतात. समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतात. इतरवेळी दुर्लक्षित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष वेधतात. हे करत असताना, त्यांच्या कलाकृती सर्वदूर पोहोचल्या आणि आर्थिक दृष्ट्या उत्तम कमाई करू लागल्या, तर अजूनच उत्तम. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत एका कलाकाराने या आघाडीवर दैदिप्यमान असं यश मिळवलंय. त्या कलाकाराचं नाव म्हणजे नागराज मंजुळे.
दिग्दर्शक, कवी, लेखक, अभिनेता अशा विविध कलांमध्ये वावरणारा आणि आपल्या मनातील विचार ठामपणे आणि लक्ष वेधून घेईल, या पद्धतीने मांडणारा, पण त्यात शोबाजी पेक्षा सामाजिक व्यवस्थेवर बोट ठेवणारा हा कलाकार. काही दिवसांपूर्वी, त्यांची एक नवीन शॉर्ट फिल्म आपल्या भेटीस येते आहे अशी बातमी वाचली. यात ते अभिनेते म्हणून पुन्हा आपल्या समोर येत आहेत. पिस्तुल्या या शॉर्ट फिल्म चे दिग्दर्शक ते ‘तार’ या नवीन शॉर्ट फिल्म मधील पोस्टमन ची भूमिका. या प्रवासाच्या आधी, मधल्या काळात बरंच काही दडलंय. या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने हा लेख लिहिला जातोय. यात नागराज यांच्या आयुष्याचा आढावा घेण्याचा मराठी गप्पाच्या टीमचा हा छोटासा प्रयत्न. नागराज यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथला. लहानपणी अभ्यासाची आवड कमी पण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी कुतूहल फार. या कुतुहलापोटी, दहावी पर्यंत त्यांचा अभ्यास जेमतेम झाला. पण समाजात वावर खूप विविध स्थरांमधून झाला. त्यात कुटुंबामुळे अध्यात्मिक सहवास होता. तर लहान वयातील कुतूहल आणि संगत यापोटी काही व्यस नं आली होती. टोकाचे अनुभव.
यादरम्यान सातवीत असताना ते दुसऱ्या गावात रहायला गेले. इथे मात्र त्यांना जे मित्र भेटले त्यांची वागणूक वेगळी होती. तसेच या उमलत्या वयात त्यांना एक मुलगी आवडूही लागली होती. प्रेम हि भावना एवढी ताकदीची असू शकते कि माणसाचा कायापालट करू शकते. नागराज यांच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. अवघ्या वर्षभरात त्यांच्या वागण्यात बदल झाला. निर्व्यसनी स्वभाव झाला. पण अभ्यासात गती नव्हती. दहावीला ते नापास झाले. पण जे होतं ते चांगलं होतं म्हणतात त्याप्रमाणे झालं. या काळात त्यांचे बाकीचे मित्र पुढील शिक्षणासाठी पुढे निघून गेले. पण त्यांनी पुस्तकांना आपले मित्र बनवलं. पुस्तकं हि अशी मित्र असतात ज्यांच्यामुळे आपलं नेहमीच भलं होतं. नागराज यांना या पुस्तकांच्या निमित्ताने जगातील महान व्यक्तिमत्वांची ओळख झाली. स्वपरीक्षण केलं गेलं. आपण का आणि कुठे चुकलो हे त्यांना उमगत गेलं. त्यांच्या मुलाखती ऐकताना नेहमी जाणवतं कि अकरावी व बारावीचा त्यांचा काळ त्यांच्या आयुष्यात महत्वाचे बदल घडवून गेला. विचारांची बैठक पक्की होण्यासाठी या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर विचारांनी, नागराज यांच्या मनाची मशागत केली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायला कवितांचं माध्यम स्वीकारलं.
एका प्रथितयश वृत्तपत्राच्या स्पर्धेला सहज म्हणून पाठवलेली कविता त्या स्पर्धेत नागराज यांना विजेता करून गेली. पुढेही कविता लिहिणं सुरूच होतं आणि आजही आहे. पण एकंदर आयुष्यात आलेले खडतर अनुभव, त्यानिमित्ताने मनात उठणारे प्रश्न आणि विचार मांडण्यासाठी सिनेमा हे माध्यम होऊ शकेल, असं त्यांना वाटलं. सिनेमा दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी पहिल्यांदा पिस्तुल्या हि शॉर्ट फिल्म केली. पदार्पणातच, राष्ट्रीय पुरस्काराने या शॉर्ट फिल्मला सन्मानित करण्यात आलं. पुढे, फॅन्ड्री हा व्यावसायिक सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला. दोन्हींमध्ये काही वर्षांचं अंतर असेल. पण या सिनेमानेही पुरस्कार मिळवले. त्यांना आलेले अनुभव आणि लहानपणापासून केलेलं अवलोकन, यांमुळे हे सिनेमे प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. किंबहुना, फॅन्ड्रीमध्यल्या शेवटच्या सिनमधला फेकलेला दगड, हा आजहि या सिनेमाने मांडलेला सामाजिक प्रश्न अधोरेखित करतो. दिग्दर्शक म्हणून काम करताना, पुढे त्यांनी अभिनेता म्हणूनही काही सिनेमे केले. या काळात दिग्दर्शक म्हणून त्यांचा एक महत्वाकांशी सिनेमा तयार होत होता.
आधीच्या सिनेमांपेक्षा याची मांडणी थोडी वेगळी होती. यात गाणीहि होती. जुळवा जुळव चालू होती. कलाकारांची निवड झाली. शुटींग सुरु झालं. सिनेमा प्रदर्शित झाला आणि पुढे काही महिने या सिनेमाच्या कलाकारांना श्वास घ्यायला उसंत नव्हती. होय, सैराट हा तो सिनेमा. या निमित्ताने एक आठवण जागी होते ती आकाश ठोसर याची. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं, कि प्रदर्शनाआधी, अण्णांनी म्हणजे नागराज यांनी त्यांना सांगितलं होतं, आत्ता कुठे फिरायचं ते फिरून घ्या. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर वेळ मिळणार नाही. हि आठवण ग्राह्य धरता, दिग्दर्शक म्हणून नागराज यांच्या आत्मविश्वासाची दादच द्यायला हवी. अभिनय, दिग्दर्शन यांच्या नंतर त्यांनी ‘नाळ’ या सिनेमातील निर्मितीचा काही भागही आपल्या खांद्यावर घेतला. या सिनेमानेही पुरस्कार आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सिनेमात काम करता करता त्यांनी ‘कोण होईल मराठी करोडपती’ या रियालिटी शोचं सूत्रसंचालनही केलं. अमिताभ बच्चन हे हिंदीतील या संकल्पनेवर आधारित शोचं सूत्रसंचालन करतात हे आपल्याला माहिती आहेच. पुढे या दोघांनी मिळून एक सिनेमाही केला आहे. ‘झुंड’ असं त्याचं नाव.
नागराज यांच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिल्यास अपरिमित संघर्ष आणि त्यातून एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेणारे नागराज दिसतात. वाचन, अनुभवातून आलेलं शहाणपण, आपल्या मनात ज्या भावना आहेत त्या प्रामाणिकपणे मांडण्याची इच्छा यांमुळे त्यांची प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. लहानपणी सिनेमा, रामायण सारख्या मालिकेची केवळ आवड, मग व्यक्त होण्यासाठी कविता करणं ते नावाजलेले दिग्दर्शक यां प्रवासातून नागराज यांचं आयुष्य उलगडताना खूप काही शिकता आलं. त्यांच्या पुढील काळातील कलाकृतीही आपल्याला आधीच्या कलाकृतींप्रमाणे आनंद देतील आणि महत्वाचं म्हणजे अंतर्मुखहि करतील हे नक्की. त्यांच्या पुढील वाटचालीस मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा ! नागराज यांच्या सैराटचा या लेखात उल्लेख झाला. या सिनेमातील आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, तानाजी गळगुंडे, अरबाझ शेख, अनुजा मुळे यांच्या अभिनय प्रवासाचा आढावा आमच्या टीमने या आधीच्या प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये घेतलेला आहे. या लेखाप्रमाणेच हे लेखही तुम्हाला आवडतील हे नक्की. वर उपलब्ध असलेल्या सर्च मध्ये जाऊन आपण या कलाकारांची नावे सर्च केल्यास आपल्याला ते लेख मिळू शकतील. मराठी गप्पाच्या लेखांचे सातत्याने वाचन करण्यासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनापासून धन्यवाद.