Breaking News
Home / मराठी तडका / ‘काय घडलं त्या रात्री’ मालिकेतील ह्या अभिनेत्याला ओळखलं का, बायको आहे प्रसिद्द मराठी अभिनेत्री

‘काय घडलं त्या रात्री’ मालिकेतील ह्या अभिनेत्याला ओळखलं का, बायको आहे प्रसिद्द मराठी अभिनेत्री

झी नेटवर्कच्या विविध चॅनेल्स वर वैविध्यपूर्ण मालिकांचा ओघ हा येत असतोच. यात झी मराठी आणि झी युवा यांवर नजीकच्या काळात नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेतच. त्यातील अगदी नवीन म्हणजे, ‘काय घडलं त्या रात्री’. मालिकेच्या प्रोमोजवरून तर हा एक थ्रिलर असेल हे कळत होतंच. पण आता जसजसे त्यातील कथानक उलगडत जाईल, तसतशी त्यातील उत्सुकता आणि मनोरंजन अजून वाढेल यात शंका नाही. या मालिकेतून एक नावाजलेला चेहरा पुन्हा आपल्या भेटीस मराठी मालिकांतून आला आहे. त्याच्या व्यक्तिरेखेभोवती ही मालिका फिरते. तो उत्तम कलाकार असून याआधीही त्याने विविध माध्यमातून काम केलेले आहे, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीची ओळख मराठी गप्पाच्या वाचकांना व्हावी, ही आमच्या टीमची इच्छा.

हा अभिनेता आहे, गौरव घाटणेकर. गौरव हा व्हीसलिंग वुडस या प्रसिद्ध अभिनय शिक्षण संस्थेत शिकला. तिथे त्याला लोकप्रिय आणि अनुभवी कलाकार नसुरुद्दीन शाह यांच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवता आले. दोन ते अडीच वर्षे त्याचे हे प्रशिक्षण चालले. या काळात त्याने स्वतःतील अभिनेत्याला पैलू पाडले, असं म्हंटल्यास योग्यच ठरेल. कारण, त्याने रंगमंचावरून अभिनय करत करत अनुभव घेतला. त्याचा अभिनय पाहून, त्याला एका मराठी मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, मालिका करण्यापेक्षा सिनेमावर लक्ष केंद्रित करावं, असं त्याचं त्याकाळी मत होतं. पण नसुरुद्दीन शाह यांनी त्याला जी योग्य संधी मिळते आहे तिचा फायदा घेण्याचा आणि अभिनय करत राहण्याचा सल्ला दिला. आपल्या गुरूंचा सल्ला ऐकणं, गौरवला फायदेशीर ठरलं. कारण यानिमित्ताने त्याने त्याची पहिली वहिली मालिका केली, जींचं नाव, ‘तुजविण सख्या रे’. ही मालिका लोकप्रिय झाली आणि गौरव सारखा कसलेला कलाकार पुढे आला.

या मालिकेनंतर त्याने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्येही अभिनय केला. त्यातील धर्मक्षेत्र या ऐतिहासिक मालिकेत त्याने श्रीकृष्ण भगवानांची व्यक्तिरेखा साकार केली होती आणि त्यासाठी असंख्य चाहत्यांकडून त्याचं कौतुकही झालं. मालिकांसोबतच त्याने सिनेमे, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स या माध्यमांतूनही मुशाफिरी केली आहे. तुझी माझी लव स्टोरी, काय रे रास्काला, वजनदार, राधेमुरारी हे त्याचे गाजलेले सिनेमे. तसेच ‘सच मैं’ ही त्याची शॉर्ट फिल्मही गाजली आहे. या सगळ्यांसोबत त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक वेळेस मिलिटरी फोर्सेस वर आधारीत कलाकृतीत काम केलेलं दिसून येतं. मग ती शौर्य ही मालिका असो, वा वीरगती ही झी5 ओरिजिनल सिरीज. अर्थात त्याच्या व्यक्तिरेखा मात्र वेगवेगळ्या राहिलेल्या आहेत. त्याच्या या प्रवासात त्याला खंबीरपणे साथ लाभली आहे ती त्याच्या पत्नीची, श्रुती मराठे हिची. श्रुती ही गौरव प्रमाणेच लोकप्रिय कलाकार आहे. तिचे अनेक सिनेमे, मालिका या प्रेक्षक पसंती मिळवलेल्या आहेत. एकाच क्षेत्रातले असल्यामुळे दोघांनाही या क्षेत्रातील अनिश्चितता नक्कीच माहिती आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना उत्तमरीतीने सांभाळून घेतात.

त्यांच्यातील हीच केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना भावते. कारण, त्यांची जोडी ही समंजस आणि आपलीशी वाटते. त्यांची ही केमिस्ट्री आपल्याला ‘तुझी माझी लव स्टोरी’ या कलाकृतीतुन दिसून येतेच. सोबत दोघांनीही एकत्र येऊन ‘ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स’ नावाची निर्मिती संस्था सुरू केली आहे. ही निर्मिती संस्था जाहिराती, तसेच समाजप्रबोधनपर व्हिडियोज बनवते. कलाक्षेत्राव्यक्तिरिक्त गौरव याचं फिटनेसकडे लक्ष असतं. त्यासाठी व्यायाम करण्यासोबत स्क्वॉश हा खेळ खेळण्याकडे त्याचा कल दिसून येतो. सध्या गौरव ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेमुळे पुन्हा मराठी मालिकेतून आपल्या समोर आला आहे. येत्या काळातही त्याचे विविध प्रोजेक्ट्स आपल्या भेटीस येत राहतील हे नक्की. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.