लॉकडाऊन नंतर मराठी मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही जुन्या मालिका बंद झाल्या तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सध्या कारभारी लय भारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात दाखल झाली आहे. तसेच दाखल झाल्यापासून प्रेक्षकांची पसंती या मालिकेस मिळत आहे. लेखक तेजपाल वाघ यांच्या वाघोबा प्रॉडक्शनची ही मालिका. त्यात सगळेच उत्तम कलाकार काम करत आहेत. या मंदियाळीतील एक कलाकार म्हणजे अनुष्का सरकटे. अनुष्काने ह्या मालिकेत प्रियांका पाटील ह्या तरुणीची भूमिका साकारली आहे. चला तर आज या लेखाच्या निमित्ताने अनुष्काच्या कलाप्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न.
अनुष्काचं बालपण आणि शिक्षण झालं औरंगाबाद शहरात. तिचे वडील उत्तम गायक आहेत. त्यांनी अनेक कलाकृतींसाठी गायन केलं आहे. त्यामुळे तिच्यावर लहानपणापासून कलाक्षेत्राचे संस्कार झाले. तसेच तिलाही यात उत्तम गती होतीच. त्यामुळे आपलं इंजिनीअरिंगचं शिक्षण तिने पूर्ण केलंच. सोबत पुण्याच्या ललित कलाकेंद्र या प्रतिष्ठीत संस्थेतून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. या काळात तिने रंगमंचावरून अनेक नाट्यकृतींतुन सहभाग नोंदवला. यामुळे तिच्यातील अभिनेत्री तावून सुलाखून निघाली, असं आपण म्हणू शकतो. तिने केलेली नाट्यकृतींमध्ये चौधराईन, चंद्रलेखा पारेख, धुआं, बेणारे, सुरभी, शेषवतार यांचा समावेश होतो. तसेच तिने एक शॉर्ट फिल्म ही या काळात केली. तिचं नाव, पाखली. हा तिचा प्रवास मुख्यत्वे पुण्यात होत होता. पुढे मालिकांच्या निमित्ताने मुंबईतही येणं झालं. तिने आत्तापर्यंत तीन मालिका केल्या आहेत. कारभारी लय भारी ही तिची तिसरी मालिका.
याआधीच्या दोन म्हणजे ‘मी तुझीच रे’ आणि ‘लक्ष्मीनारायण’. यातील लक्ष्मीनारायण मालिकेतील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. यात तिने लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन भुमिका केल्या होत्या. गेल्या नोव्हेंबर महिन्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. पुढे काही काळाने तिची ‘मी तुझीच रे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि आता कारभारी लय भारी. या तीनही मालिकेतील तिच्या कामाचं कौतुकचं झालं आहे. कारभारी लय भारी ही नुकतीच सुरू झालेली मालिका आहे. पण अनुष्काचा अभिनयाचा तगडा अनुभव पाहता येत्या काळात ती या मालिकेच्या निमित्ताने आघाडीची नायिका म्हणून पूढे येईल, हे नक्की. तिच्या पुढील काळातील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)