कारभारी लय भारी म्हणत एक नवीन मालिका काही दिवसांपूर्वी आपल्या टीव्हीच्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच मालिका लय भारी असल्याचं प्रेक्षकांचं मत बनत आहे. मालिकेत येणारी वळणं, कलाकारांनी खुलवलेल्या व्यक्तिरेखा यांमुळे प्रेक्षकांची नवीन भागांविषयीची उत्सुकता नेहमी वाढवून ठेवत असते. यातील अनेक व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय होत आहेत. मराठी गप्पाच्या टीमने या मालिकेतील बहुतांश कलाकारांची थोडक्यात ओळख करून देणारा एक लेख काही काळापूर्वी लिहिला होता. तसेच यातील नायक आणि नायिका असलेल्या निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेखही प्रसिद्ध झाले होतेच. आजच्या लेखातून आपण, या मालिकेत शोना ही भूमिका साकारणाऱ्या रश्मी पाटील हिच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू.
रश्मी ही पुण्यात वाढली. बालपण आणि शालेय शिक्षण पुण्यात झालं. लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची तिला आवड होती.घरातून कलाक्षेत्रात कोणीही नसलं तरीही घरच्यांनी तिच्या आवडीला प्रोत्साहन दिलं. तिने एका सोशल मीडिया लाईव्ह मध्ये सांगितल्या प्रमाणे तिने शालेय वयापासूनच नृत्य स्पर्धांमधून सहभाग नोंदवला होता. तसेच जी कला सादर करायची ती उत्तम करायची हा तिचा स्वभाव दिसतो. कारण तिच्या बोलण्यात तिने कमावलेल्या पारितोषिकांचं उल्लेख येतो. त्यांच्याबद्दल तिला अभिमान आहे, परंतू त्याबद्दलची हवा डोक्यात गेलेली नाहीये. त्यामुळे शालेय स्पर्धा ते वेगवेगळे इव्हेंट्स हा तिचा प्रवास कमी वयात झाला असला तरीही तिचं बोलणं ऐकताना तिच्या प्रेक्षकांना तिचा साधेपणा भावतो. लोककला हा तिचा जिव्हाळ्याचा विषय. लावणी हा तिचा आवडता नृत्यप्रकार. तिच्या अनेक इव्हेंट्स मध्ये तिने लावणी सादर केलेली आहे. किंबहुना ही तिची एक ओळख बनलेली आहे. तिच्या युट्युब चॅनेल वरून तिचे लावणीतले नृत्याविष्कार पाहता येतात. लोककला प्रकारापासून आपण काहीसे दूर चाललो आहोत का, असं वाटत असताना, रश्मीचं लोककलेला वाहून घेणं हे कौतुकास्पद वाटतं. रंगमंचावरून नृत्य सादर करत असताना तिने चित्रपटातही काम केलं आहे.
इंद्रभुवन हा तिची भूमिका असलेला चित्रपट. तसेच एक गाव बारा भानगडी ही वेब सिरीजही तिने केलेली आहे. सध्या ती कारभारी लय भारी मालिकेत व्यस्त आहे. अभिनय, नृत्य यांशिवाय ती मॉडेलिंग करते. यात जॅग्वार या जगप्रसिद्ध कार ब्रँड साठीही तिने मॉडेलिंग केलेलं आहे. कला क्षेत्राशिवाय तिने स्वतःचं इंटिरियर डेकोरेटर म्हणून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसेच त्या क्षेत्रातही ती आपली कलाकारकिर्द सांभाळून कार्यरत असते. काही कलाकार हे केवळ कलाक्षेत्रात विहार करण्यासाठी जन्माला आले आहेत असं प्रेक्षक म्हणून आपल्याला काही मोजक्या कलाकारांविषयी वाटत असतं. त्या मोजक्या कलाकारांमध्ये रश्मीचं नाव नक्की घेता येईल. पुढील काळातही अभिनय, नृत्य या कलाप्रकारांतून आणि विविध माध्यमांतून ती आपलं उत्तम मनोरंजन करत राहील हे नक्की. कलाक्षेत्राला आणि खासकरून लोककला प्रकारांना प्रसिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या या नवतारकेला मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा.
वर आपण कारभारी लय भारी या मालिकेतील उत्तर कालाकारांविषयी उल्लेख वाचला असेल. त्यांच्याविषयीचे लेख वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च मध्ये जाऊन कारभारी लय भारी असं टाईप केल्यास, आपल्याला ते लेख सहज मिळतील. मराठी गप्पाचे लेख हे आपल्या सारख्या नियमित वाचकांकडून सातत्याने वाचले जातात. आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)