Breaking News
Home / मराठी तडका / कारभारी लय भारी या मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत, जाणून घ्या

कारभारी लय भारी या मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत, जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून एक मालिका आपल्या मालिकाविश्वात नव्याने दाखल झाली आहे. त्या मालिकेचं नाव, कारभारी लय भारी. राजकारण, समाजकारण आणि त्यात आपले नायक नायिका येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जातात अशी याची कथा. हि मालिका निर्माण केली आहे वाघोबा प्रोडक्शन्सने. या निर्मिती संस्थेचे प्रमुख आहेत तेजपाल वाघ. तेजपाल वाघ यांना आपण ओळखतो ते त्यांच्या सिद्धहस्त लेखणीसाठी. तसेच ते उत्तम अभिनयही करतात. त्यांच्या लेखणीतून अनेक मालिका आणि सिनेमे आकारास आले आहेत. नजीकच्या काळातील ‘लागिरं झालं जी’ हि मालिका त्यांनीच लिहिली होती. कारभारी लय भारी हि मालिकासुद्धा त्यांनीच लिहिली आहे. याचे संवाद लेखन विशाल कदम यांनी केलेले आहे. तसेच या मालिकेत अनेक गुणी कलाकार काम करताहेत. आज या लेखाच्या निमित्ताने आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत.

निखिल चव्हाण (राजवीर सूर्यवंशी)

या मालिकेतील कारभारी म्हणजे नायकाची भूमिका केली आहे निखील चव्हाण याने. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे राजवीर सूर्यवंशी. निखील याला आपण लागिरं झालं जी या मालिकेतील विक्रम या व्यक्तिरेखेसाठी ओळखतो. हि व्यक्तिरेखा खूप गाजली. याच काळात निखील ने अनेक वेब सिरीजही केल्या. त्यात गालीमार, स्त्रील्लिंग पुल्लिंग, वीरगती या वेब सिरीज चा समावेश आहे. तसेच त्याने काही सिनेमेही केले. अट्रोसिटी, धोंडी चंप्या, डार्लिंग या सिनेमात त्याने कामं केली आहेत. त्यातील डार्लिंग हा सिनेमा या वर्षी प्रदर्शित होणार होता पण क रोना संकटामुळे येत्या वर्षी तो प्रदर्शित होईल. सिनेमा, वेब सिरीज यांसारख्या माध्यमांसोबत त्याने रंगमंचावरही काम केलं आहे. याच काळात त्याची मैत्री सध्याचा आघाडीचा अभिनेता किरण गायकवाडशी झाली. त्या दोघांनी ‘लागिरं झालं जी’ मध्ये एकत्र काम केलं होतं. तसेच पहिल्या वहिल्या नाट्यकृतीतही त्यांनी एकत्र काम केलं होतं. अभिनयासोबतच निखील ने निवेदक म्हणूनही काम केलं आहे. जल्लोष गणरायाच या गाजलेल्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्याने समर्थपणे पेलली होती. कलाक्षेत्रात काम करत असताना निखीलने स्वतःचं सामाजिक भानही जपलंय. पाणी फाउंडेशनच्या मार्फत त्याने श्रमदानातही सहभाग नोंदवलेला होता.

अनुष्का सरकटे (प्रियांका पाटील)

अनुष्का सरकटे हिची या मालिकेत प्रियांका पाटील हि नायिकेची भूमिका आहे. अनुष्काला लहानपणापासून रंगमंचावर काम करण्याची आवड होती. तिने महाविद्यालयातील अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतलेला आहे. पुण्यातील मानाची समजली जाणारी फिरोदिया करंडक स्पर्धेत तिने काही वर्षे सहभाग घेतला होता. रंगमंचावर काम करता करता तिने मालिकांतहि उत्तम काम केलेलं आहे. काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्री लक्ष्मी नारायण या मालिकेत तिने मुख्य अशी लक्ष्मी देवीची भूमिका केलेली होती. या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुकही झालं होतं. हि मालिका एवढी गाजली कि काही काळापूर्वी ती ओरिया भाषेतून डब होऊन दाखवली गेली. तसेच मी तुझीच रे या मालिकेतही तिने अभिनय केलेला आहे. ती स्वतः जशी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे तसेच तिचे वडीलही संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी गायक म्हणून सिनेमांतून गायन केलेले आहे. नजीकच्या काळातील तू.का.पाटील या सिनेमात त्यांनी गायन केलेलं होतं.

अजय तपकिरे (अंकुशराव पाटील)

अजय तपकिरे यांना प्रथमदर्शनी पाहिल्यावर चटकन लक्षात येते ती एक ऐतिहासिक भूमिका. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतील बहिर्जी नाईक हि महत्वपूर्ण भूमिका त्यांनी अतिशय समर्थपणे साकारली होती. त्यांची हि भूमिका एवढी गाजली कि अनेक ठिकाणी बहिर्जी नाईक यांच्याविषयी लेख वाचताताना वा विडीयोज बघताना अजयजींचा बहिर्जी नाईक यांच्या वेशभूषेतला एक तरी फोटो हा दिसतोच. अश्या या ताकदीच्या कलाकाराने या मालिकेत तेवढीच ताकदीची अंकुशराव पाटील हि भूमिका साकार केलेली आहे. अजय तपकिरे यांनी शाळेतून अभिनयाच्या क्षेत्रात काम सुरु केलं. सुरुवातीला एकांकिका आणि नाटकातून रंगमंचावर काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी सिनेमा आणि मालिका या माध्यमातूनही अभिनय करायला सुरुवात केली. त्यांच्या गाजलेल्या कालाकृतींपैकी एक म्हणजे अण्णा हजारे यांच्या आयुष्यावरील सिनेमा. या सिनेमात त्यांनी अण्णा हजारेंच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच परेड हा सिनेमाही केला होता. या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. मालिका आणि सिनेमबरोबर, त्यांनी ‘सोबत’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलेले आहे.

कृष्णा जन्नू (नाग्या)

राजवीर सूर्यवंशी याचा मित्र म्हणजे नाग्या. हि व्यक्तिरेखा साकारली आहे कृष्णा जन्नू याने. कृष्णा हा पेशाने छायाचित्रकार आहे. त्याने अनेक उत्तमोत्तम छायाचित्रे त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत. अनेक इवेंट्समध्येही त्याचा लक्षणीय सहभाग असतो. तसेच त्याच्या सोशल मिडिया पेज नुसार तो एक डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातही कार्यरत आहे असं दिसतं.

महेश जाधव (जगदीश पाटील)

लागिरं झालं जी मधला भैय्यासाहेब यांचा ‘Talent’ आठवतो का? त्याचं नाव महेश जाधव. त्याने केलेली ‘लागिरं..’ मधली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेच. आता तो ‘कारभारी..’ मध्ये जगदीश पाटील हि काहीशी गंभीर भूमिका बजावतो आहे. त्यामुळे नुकतंच त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे तेजपाल वाघ यांचे आभार मानले. कारण अनेक वेळेस कमी उंचीमुळे मर्यादित भूमिकांसाठी विचार केला जातो पण तेजपाल वाघ यांनी वेगळा विचार केला यासाठी धन्यवाद देणारं ते पत्र होतं. या दोन मालीकांसोबत त्याने हुबलाक या मालिकेत काम केलेलं होत. मालिकांसोबतच प्लँचेट हे नाटक, क्वार्टर हा लघुपटया माध्यमांतूनही त्याने आपली अभिनय कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. क्वार्टर या लघुपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यासाठी फिल्म फेस्टिवल्स मधून त्याचं आणि या लघुपटाचं कौतुकही झालं होतं.

प्रणित हाटे (गंगा)

गंगा म्हणजे युवा डान्सिंग क्वीन या स्पर्धेतील पहिली तृतीय पंथी सूत्रसंचालक. गंगाला अभिनय आणि नृत्याची आवड पहिल्यापासून. गंगाने नृत्य, अभिनय, सूत्रसंचालन या क्षेत्रात केलेल्या उत्तम कामासाठी अनेक प्रथितयश वृत्तपत्रांकडून तिची दखल घेतली गेलेली आहे. तिची विग हि शॉर्ट फिल्मही गाजली आहे. या माध्यमांसोबतच तिने रॅम्प वॉकहि केलेला आहे.

श्रीराम लोखंडे (पृथ्वी)

श्रीराम लोखंडे याने या मालिकेत पृथ्वी हि भूमिका साकारली आहे. पृथ्वीला आपण याआधीहि लागिरं झालं जी मध्ये अभय या भूमिकेतून पाहिलेलं आहे. तसेच त्याने काही जाहिरातीतूनही काम केलेलं आहे. अभिनयासोबत तो लेखनही करतो. मरीजे ख्वाब हे त्याचं पेन नेम आहे.

रश्मी पाटील (शोना)

रश्मी पाटील या गुणी अभिनेत्रीने या मालिकेत शोना हि व्यक्तिरेखा साकार केली आहे. याआधी तिने इंद्रभवन या सिनेमात अभिनय केला आहे. अभिनयासोबत तिला नृत्याची प्रचंड आवड आहे. ती सातत्याने विविध लोकप्रिय इवेंट्सच्या माध्यमांतून स्वतःची नृत्यकला पेश करत असते. अभिनय, नृत्य यांसोबतच तिने मॉडेल म्हणूनही काम केले आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रथितयश चॅनेलसाठी रँम्प वॉकहि केला होता.

राधिका पिसाळ (राजवीर यांच्या आई)

राधिका पिसाळ यांनी आईची भूमिका यात केलेली आहे. याआधी त्यांनी बॅलंस होतंय ना आणि तऱ्हा एका गावाची या कलाकृतींतून अभिनय केलेला आहे.

पूजा पवार साळुंखे (काकी)
पूजा पवार साळुंखे यांनी या मालिकेत काकीची भूमिका साकारली आहे. आपण याआधी त्यांना आई कुठे काय करते मधील रेवती आणि बापमाणूस मधील भूमिकेतून मालिकेत पाहिलेलं आहे. तसेच अशी हि आशिकी या सिनेमातही त्या होत्या. यात त्यांनी अभिनय बेर्डेसोबत काम केलेलं होतं. या सिनेमा अगोदरही त्यांनी सर्जा, झपाटलेला, माझा छकुला, एक होता विदुषक या सिनेमांतून भूमिका केलेल्या आहेत.

श्रीकांत के.टी. (काका)
या मालिकेतील काका हि व्यक्तिरेखा साकारली आहे श्रीकांत के.टी. यांनी. त्यांना याआधी आपण मिर्सेस मुख्यमंत्री या मालिकेतून पाहिलेलं आहेच. याव्यतिरिक्तहि त्यांनी अनेक भूमिका केलेल्या आहेत.

तृप्ती शेडगे (दिपा)
गावाकडच्या गोष्टी हि वेब सिरीज अल्पावधीत प्रेक्षकांची आवडती वेब सिरीज ठरली आहे. यातील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच माधुरी हि साकारली आहे तृप्ती शेडगे हिने. तृप्ती या मालिकेत दिपा हि व्यक्तिरेखा साकारते आहे. गावाकडच्या गोष्टी यांच्यासोबत तिने ‘संतुर्की : गोष्ट संत्या आणि सुरकीची’ या मराठीतील वेब सिनेमातही काम केलेलं आहे. तसेच पोक्त हि तिची शॉर्ट फिल्म गाजली आहे. या तिच्या कलाप्रवासात तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

धनंजय जामदार (लव्हाळे मामा)
धनंजय जामदार हे उत्तम छायाचित्रकार आहेत. या मालिकेत त्यांनी लव्हाळे मामा हि भूमिका साकारली आहे.

अनिल जाधव (आमदार साहेब)
अनिल जाधव हे फार आधीपासून रंगमंचावर कार्यरत आहेत. सध्या या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी आमदार साहेबांची भूमिका बजावली आहे.

श्रुतकिर्ती रणजित सावंत (निशा सूर्यवंशी)
श्रुतकिर्ती रणजित सावंत या अभिनेत्रीने या मालिकेत निशा सूर्यवंशी हि भूमिका साकारली आहे. तिने या आधी कस्तुरा या कलाकृतीत काम केलेलं आहे. त्यासाठी तिला अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला होता. मालिकांसोबतच तिने जाहिरातीतही काम केलेले आहे. रंगमंचावरही तिने अभिनय केलेला आहे.

सुप्रिया पवार (वैशाली)
वैशाली हि भूमिका सुप्रिया पवार या अभिनेत्रीने साकारली आहे. तिने याआधी बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत इनामदार या व्यक्तिरेखेच्या पत्नीचे काम केलेले होते.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *