Breaking News
Home / मराठी तडका / कार्तिकचे वडील आहेत प्रसिद्ध अभिनेते, खऱ्या आयुष्यात असा आहे कार्तिक

कार्तिकचे वडील आहेत प्रसिद्ध अभिनेते, खऱ्या आयुष्यात असा आहे कार्तिक

रंग माझा वेगळा हि मालिका सुरु होऊन आज या मालिकेचे २०० हून अधिक भाग लोटले आहेत. या मालिकेतील कार्तिक-दीपा यांची जोडी, हर्षदा खानविलकर यांची सौंदर्या हि व्यक्तिरेखा आणि मालिकेत, नव्याने दाखल झालेली ‘डॉ. तनुजा’ अशा प्रत्येक व्यक्तिरेखेने, प्रेक्षकांना मालिकेशी अगदी खिळवून ठेवलेलं आहे. या मालिकेतील नायिका, म्हणजे दीपा साकारणाऱ्या रेश्मा शिंदे हिच्या अभिनय प्रवासावरील लेख काही दिवसांपूर्वी, मराठी गप्पावर प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाला आपण जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आज, मालिकेतील नायकाची भूमिका बजावणारा अभिनेता, आशुतोष गोखले याच्या अभिनय प्रवासाचा आपण थोडक्यात धांडोळा घेऊ.

आशुतोष हा मुळचा मुंबईचा. मुंबईत बालपण आणि सगळं शिक्षण झालं. आधी बालमोहन विद्यामंदिर हि शाळा आणि मग डी. जी. रुपारेल कॉलेज. या दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासाबरोबर, नाटक आणि खेळ या दोन्हींना प्रोत्साहन दिलं जातं. त्यात आशुतोष याच्या घरची पार्श्वभूमी, अभिनय आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची. त्याचे वडील, विजय गोखले हे सुप्रसिद्ध अभिनेते. त्यांच्या नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांमधील अनेक भूमिका गाजल्या आहेत. तसेच आशुतोष याचा मामे भाऊ म्हणजे अद्वैत दादरकर. होय, आजचा आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक. त्यामुळे अभिनय क्षेत्राकडे त्याचा आपसूक ओढा होता. काही बालनाट्यहि केली त्याने. पण त्याला क्रिकेटचीही आवड. त्यामुळे शाळेत असताना त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रुपारेल मध्ये दाखल झाल्यावरही तो खेळत होता. पण एक दुखापत झाली आणि क्रिकेट मागे पडलं. तोपर्यंत कॉलेजचं शेवटचं वर्ष आलं होतं. त्याने एक नोटीस वाचली, ज्यात एक एकांकिका बसवली जात होती. त्याच्या आयुष्याचा हाच टर्निंग पॉइंट ठरला. त्याने एका प्रथितयश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या आठवणी जागवल्या होत्या.

नंतर त्याने अनेक एकांकिका केल्या. संगीत कोणे एके काळी, बत्ताशी, सवाई या त्याच्या एकांकिका. अभिनयाचं कौतुक होतं होतं आणि एकांकिकांना पारितोषिकं मिळत होती. याच दरम्यान अभिनयात करियर करायचं हे त्याचं पक्क झालं होतं. मग त्याने काही व्यावसायिक नाटकांमध्ये भाग घेतला. या नाटकांतील अभिनयामुळे ओळख मिळालीच, सोबत अनुभवही. ओ वूमनिया हे त्याचं असंच एक नाटक. या नाटकात सुहास जोशी, जयंत सावरकर, स्वाती चिटणीस, सतीश पुळेकर, कादंबरी कदम या सगळ्याच मोठ्या कालाकारांचा भरणा होता. या दिग्गजांसोबत त्याने जसं काम केलं, तसच त्याने मोरूची मावशी या नाटकात भरत जाधव यांच्यासमवेत तर सोयरे सकळ या नाटकात अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या समवेत काम केलंय. या सगळ्या अनुभवी कलाकारांबरोबर काम केल्याने त्याचाही अभिनय दिवसेंदिवस प्रगल्भ होत गेलाय आणि लोकप्रियताही मिळत गेलीय. डोंट वरी बी हॅप्पी हे त्याचं अजून एक गाजलेलं नाटक. या नाटकात स्पृहा जोशी, उमेश कामत यांच्यासोबत त्याने रंगमंच गाजवलाय.

नाटकांसोबत त्याने मालिकांमध्येही काम सुरु केलं. ‘रंग माझा वेगळा’ हि त्याची काही काळापासून प्रदर्शित होणारी मालिका. यातील कार्तिक हि व्यक्तिरेखा विचारी, स्थळकाळ बघून वागणारी अशी आहे. दीपा हि त्यालाच साजेल अशी व्यक्तिरेखा. त्यामुळे या जोडीला प्रेक्षक पसंती मिळाली आहेच. पण, या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट व्यक्तिरेखा त्याने साकारली, तुला पाहते रे मधील, जयदीप सरंजामे याची. मनाला येईल तसं वागणारा आणि अविचारी असा हा जयदीप सरंजामे आशुतोषने खुबीने रंगवला. या दोन्ही विरुद्ध टोकाच्या भूमिका आशुतोषने अगदी मेहनतीने जिवंत केल्या आहेत. हीच त्याच्या अभिनयाची ताकद आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्याने नाटक आणि मालिकांसकट काही काळापूर्वी, वेबसिरीज या माध्यमात प्रवेश केला. हाय टाईम हि ती वेब सिरीज. तसेच चला हवा येऊ द्या या सुप्रसिद्ध शोमध्ये त्याने काही स्कीट्समध्येही भाग घेतला होता.

अभिनयाव्यतिरिक्त, त्याला फिरण्याची आवड आहे. तसेच सामाजिक कामांमध्येही त्याचा पुढाकार असतो. पाणी फाऊंडेशनच्या वतीने त्याने श्रमदान केलं होतं. तसेच, सध्या ओसरत चाललेल्या लॉकडाऊनच्या काळात, त्याने समाजोपयोगी कामात हातभार लावला होता. तसेच एका प्रथितयश वृत्तपत्रात त्याने या विषयी लेखनही केलं होतं. कलाकार हा संवेदनशील असावा असं म्हंटलं जातं. आशुतोष हा याचं, एक उदयाला येत असलेलं उदाहरण ठरू शकतो. अशा या संवेदनशील अभिनेत्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात त्या बद्दल धन्यवाद. वर सोयरे सकळ नाटकाचा उल्लेख झाला, म्हणून आठवण करावीशी वाटते ती एका लेखाची. या नाटकात दोन भूमिका करणाऱ्या आणि त्यासाठी सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या, ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनय प्रवासावरील लेख काही दिवसांपूर्वी मराठी गप्पावर प्रसिद्ध झाला होता. त्यांचा दीर्घ अभिनय प्रवास मराठी गप्पाच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, आमच्या टीमने केला आहे. आपण तो लेख वाचला नसल्यास, जरूर वाचवा हि विनंती ! धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.