माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका जवळजवळ ४ वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. काही महिन्यांपूर्वीच ह्या मालिकेने १२०० एपिसोडचा टप्पा पूर्ण केला. प्रेक्षकांनीही ह्या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना भरभरून प्रेम दिले. ह्या मालिकेचा एक वेगळा असा चाहतावर्ग आहे. ह्या मालिकेतील गुरु, राधिका, शनाया, सौमित्र हि पात्रे खूप लोकप्रिय झाली. आपणा सर्वानाच त्यांच्या खऱ्या आयुष्याविषयीसुद्धा माहिती असेलच. आपल्या मराठी गप्पावर ते लेख उपलब्ध आहेत. परंतु आज आपण ‘माझ्या नवर्याच्या बायको’ सीरिअलमधील अश्या कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत ज्याने मालिकेत ‘केडी’ ह्या व्यक्तिरेखेची विनोदी परंतु एक महत्वाची भूमिका साकारली आहे. केडी फक्त अभिनयच नाही तर अजूनही एका गोष्टीत व्यायसायिकदृष्ट्या लोकप्रिय आहे. त्याचसोबत केडीची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपण त्याबद्दल खाली वाचणारच आहोत. चला तर आपण केडीच्या व्यैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेऊयात.
केडीची विनोदी भूमिका साकारली आहे ती म्हणजे अभिनेता अभिजित गुरु ह्याने. अभिजित गुरु हा एक उत्तम अभिनेता तर आहेच परंतु तो उत्कृष्ट लेखकसुद्धा आहे. अभिजित गेल्या ११ वर्षांपासून मालिकांसाठी लेखन करत आहे. माझ्या नवऱ्याची बायको ह्या लोकप्रिय मालिकेचा लेखक सुद्धा अभिजित गुरु आहे. त्याचसोबत सध्या गाजत असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. ‘रंग माझा वेगळा’ ह्या मालिकांचा पटकथा लेखक सुद्धा अभिजितच आहे. अभिजीतने आपल्या करिअरची सुरुवात लेखक म्हणूनच केली होती. त्याने ‘अवघाची संसार’ ह्या मालिकेपासून संवादलेखनाला सुरुवात केली होती. त्याने अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अभिजितने ‘लक्ष्य’, ‘कशाला उद्याची बात’, ‘अनामिका’, ‘पुढचं पाऊल’, ‘आभास हा’ ह्यासारख्या मालिकांसाठी पटकथा लेखन केले आहे. त्यानंतर पुढे अनेक मालिकांसाठी संवादलेखनही केले. २०१७ साली आलेल्या ‘फुगे’ ह्या चित्रपटासाठी त्याने लेखन केले आहे. लेखक म्हणून यशस्वी ठरत असतानाच अभिजीतला अभिनयात देखील रस होता. त्याने ‘पुढचं पाऊल’ ह्या लोकप्रिय मालिकेत ‘बंटी मिश्रा’ हि भूमिका साकारली होती. त्याचसोबत ‘क्रा ईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ सारखा लोकप्रिय हिंदी मालिकेतसुद्धा अभिनय केलेला आहे. लेखक-अभिनेता म्हणून काम करत असलेला अभिजित दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याने २०१२ साली आलेल्या ‘झालाय दिमाग खरा’ ह्या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच अनेक नाटकांचे दिग्दर्शन अभिजीतने केले आहे.
अभिनेता अभिजित गुरु ह्याचे लग्न त्याच्या बालपणीची मैत्रीण समिधा गुरु हिच्याशी झाले. व्यवसायाने शिक्षिका असणाऱ्या समिधाला स्वतःच्या एका नाटकाप्रसंगी अभिनय करताना पाहून अभिजीतनेच तिला अभिनयात करिअर करण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला मनावर घेत समिधाने आपल्या अभिनयावर जोर देत नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये उत्तम काम करून आपली एक वेगळी ओळख बनवली. ह्याचे संपूर्ण श्रेय ती अभिजीतलाच देते. अभिजीतने वेळोवेळी तिला योग्य मार्गदर्शन आणि वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. लग्नानंतरही समिधा अभिनयक्षेत्रात काम करताना दिसत आहे. समिधा सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ ह्या मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारत आहे. समिधाने ‘अवघाचि संसार’, ‘जिवलगा’, ‘झुंज’, ‘या वेळेवर’, ‘देवयानी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘तुझविन सख्या रे’ ह्यासारख्या मालिकेत काम केलेले आहे. देवयानी मालिकेत समिधाने खलनायिकेची भूमिका उत्तमप्रकारे साकारली होती. त्याचप्रमाणे समिधाने चित्रपटांतसुद्धा काम केलेले आहे. तिने ‘लाल ईश्क’, ‘कापूसकोंड्याची गोष्ट’, ‘कायद्याचं बोला’, ‘पन्हाळा’, ‘भिर भिर’, ‘तुकाराम’ ह्या सारख्या चित्रपटांत काम केलेले आहे. तिला २०१४ साली ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ ह्या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे.
अभिजित आणि समिधा ह्या दोघांनाही एकमेकांच्या कामाप्रती आदर असून दोघेही एकमेकांच्या कामांचे कौतुक करून प्रोत्साहन देतात. मध्यंतरी स्टार प्रवाह हि मालिका टीआरपी नंबर १ वर आली. त्यातील टॉप ५ मालिकांमध्ये ३ मालिकांचे लेखन अभिजीतने केले होते. त्यासंदर्भात पत्नी समिधा हिने अभिजीतसाठी त्याच्या ह्या यशाबद्दल हृदयस्पर्शी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली होती. असं हे जोडपं एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देत असतं. ह्या दोघांना एक गोंडस मुलगी असून तिचे नाव दुर्वा आहे. अभिजित आणि समिधा हे दोघेही आपापल्या क्षेत्रात मेहनत घेत असून आपल्या करिअरची यशस्वी वाटचाल करत आहेत. ह्या दोघांचाही यशाचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत जावो, ह्या मराठी गप्पाकडून शुभेच्छा. वर माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेचा उल्लेख झालेला आहे. ह्या मालिकेतील इतर लोकप्रिय कलाकार म्हणजेच अभिजित खांडकेकर, अनिता दाते, रसिका सुनील, अद्वैत दादरकर ह्यांच्यावरील लेख मराठी गप्पावर उपलब्ध आहे. तुम्ही सर्च ऑप्शनचा वापर करून हे लेख वाचू शकता. तसेच तुम्ही वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्धल मनापासून आभार.
(Author : Rahul Ranjan Arekar)