आय.पी.एस. वा आय.ए. एस. अधिकारी असं वाचनात जरी आलं तरी करडी शिस्त, जबरदस्त बुद्धिमत्ता, प्रशासनावरची घट्ट पकड आणि या सगळ्यांमुळे आपल्याला त्यांच्याविषयी वाटणारी आदरयुक्त भीती या गोष्टी मनात येऊ लागतात. एकप्रकारे त्यांची आपल्याला जरब वाटते हे नक्की. पण अस असलं तरी ही मंडळी, प्रत्येकवेळी काही कठोर नसतात. अनेकवेळा तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला असणारे अनेक पैलू कालानुरूप उलगडत जातात. खासकरून त्यांच्यात असलेले कलात्मक पैलू पाहून त्यांच्यातील सुंदर कलाकार वृत्तीचा परिचय होतो.
आता डॉ. दिव्या एस. अय्यर यांचं उदाहरण घेऊ. दिव्याजी या मूळ पेशाने डॉक्टर आहेत. पण असं असूनही त्यांना आय.ए.एस. सेवा खुणावत होती, म्हणून त्यांनी या सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. तो सार्थ ही ठरवला आणि सदर परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. तसेच आज जवळपास दशकभराच्या आतच, त्या दक्षिण भारतात, पथानमथीत्ता येथील जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अर्थात ही केवळ त्यांच्या कार्याची ओळख झाली. पेशाने डॉक्टर आणि आय.ए.एस. असल्या तरी मनाने त्या कलाकार आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्या कलासक्त होत्याच. त्यांना अनेक कलांमध्ये गती होती. खासकरून नृत्य कलेत त्यांना विशेष रुची होती व आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो नुकताच वायरल झाला होता.
जवळपास दोन आठवड्यांपूर्वी वायरल झालेल्या या व्हिडियोने दिव्याजींमधील नृत्य कलाकाराची ओळख सगळ्यांना झाली. झालं असं की दिव्याजी या एम.जी. युनिव्हर्सिटी येथील एका वार्षिक स्नेह संमेलनाला गेल्या होत्या. तेव्हा येथील विद्यार्थ्यांनी एक फ्लॅश मॉब हा डान्स प्रकार आयोजित केला होता. तो सादर की केला जाणार होता आणि तेव्हढ्यात एक आक्रीत घडलं. दिव्याजी या मुलांसमावेत थेट मैदानात डान्स करायला उतरल्या. आक्रीत अस म्हणायचं कारण कोणत्याही समारंभात बोलावलेले पाहुणे हे सहसा शिष्ट बनून वावरतात. अर्थात अनेकांना हे आवडत नाही. विद्यार्थ्यांना तर नाहीच नाही. पण याउलट विद्यार्थ्यांमध्ये मिसळणारे शिक्षक वा पाहुणे हे कधीही लोकप्रिय ठरतात. त्यामुळे येथे दिव्याजी एवढ्या मोठ्या अधिकारी असूनही, फ्लॅश मॉब डान्स मध्ये मोकळेपणाने सहभागी होणं हे या विद्यार्थ्यांना आनंद देणारं होतं हे काही वेगळं सांगायला नको. पण हा आनंद केवळ एवढ्या पुरता थांबत नाही. कारण जेव्हा गाणं वाजू लागतं तेव्हापासून दिव्याजी आणि ही तरुणाई त्या मैदानाचा ताबा घेतात. ‘नगाडे संग ढोल बाजे’ आणि ‘इंडस्ट्री बेबी’ या गाण्याचा फ्युजन वर मस्त डान्स करतात.
मग गिरक्या घेणं असो, वा अगदी हातांची लयदार हालचाल असो वा अगदी सहज वावर असो या सगळ्या आघाड्यांवर दिव्याजी एकदम जबरदस्त कामगिरी करतात. त्यांचा तो उत्साह आणि डान्सची आवड, उपस्थित विद्यार्थ्यांना ही ऊर्जा देऊन जाते हे नक्की. कारण ते सुद्धा अगदी मनापासून दिव्याजींना डान्समध्ये साथ देत असतात. या व्हिडियोतुन दिव्याजींचं नृत्यकौशल्य जसं अधोरेखित होतं तसेच त्यांची लोकांप्रति असणारी आपलेपणाची भावना ही अधोरेखित होते. अर्थात त्यांना लोकांविषयी वाटणारी आपुलकी ही काही पहिल्यांदाच दिसून येत नाहीये. या आधीही त्यांनी जे जे उपक्रम हाती घेतले आहेत त्यातून त्यांची ही बांधिलकी अधोरेखित होत होतीच. एके वर्षी तर त्यांनी एका स्वरचित गीताच्या माध्यमातून सामान्य जनांमध्ये मतदानाविषयी जागरूकता पसरावी यासाठी प्रयत्न केले होते. अर्थात त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचं हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्यांच्या याच कार्याचा गौरव ही अनेकवेळा झालेला दिसून येतो. टेड टॉक्स मध्ये ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं. त्यांचा वर उल्लेख केलेला वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या बघण्यात आला. तेव्हा त्यांच्याविषयी माहिती घेताना वर उल्लेख केलेली जुजबी माहिती मिळाली. म्हंटलं जुजबी का असेना पण , आपल्या वाचकांना दिव्याजींविषयी कळायला हवं. त्यातूनच आजच्या या लेखाचा घाट घातला गेला आहे.
आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :