मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही काळात अनेक मालिकांची नव्याने भर पडली आहे. मराठी गप्पावर तुम्हाला या मालिकेतल्या कलाकारांविषयी माहिती आणि मालिकांविषयीच्या नवनवीन बातम्या मिळत असतातच. आज अशाच एक गुणी अभिनेत्रीची ओळख आपण करून घेणार आहोत. तिचं नाव आहे, सायली साळुंखे. सध्या गाजत असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील तिची महत्वपूर्ण भूमिका आहे. याआधी आपण मराठी गप्पावर, मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू यांच्याविषयीचे लेख वाचले आहेत आणि त्यांना उदंड प्रतिसादही दिला आहे. या उदंड प्रतिसादाबद्दल मराठी गप्पाच्या वाचकांना आमच्या संपूर्ण टीमकडून मनापासून धन्यवाद!
या लोकप्रिय मालिकेत सायली हिने ज्योतिका हि व्यक्तिरेखा निभावली आहे. मालिकेतील नायक आणि नायिका म्हणजेच गौरी आणि जयदीप यांच्या जोडीला जशी प्रेक्षकांची पसंती मिळते आहे तशीच, ज्योतिकाच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षक दाद देत आहेत. या भूमिकेसाठी सायली हिने आपला सगळा अनुभव पणाला लावला आहे हे नक्की. सायली हि मुळची कल्याणची. तिला अभिनयाची पहिल्यापासून आवड. तिने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच एस.आर.एम. फिल्म स्कूल मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. अभिनयासोबतच तिला नृत्याचीही आवड आहे. तसेच तीला मॉडेलींग करण्यातही रस होता. म्हणूनच तिने २०१७ साली म.टा. श्रावण क्वीन या मानाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. यात तिने गश्मीर महाजनी या लोकप्रिय अभिनेत्यासोबत नृत्यही केलं होतं. श्रावण क्वीन सोबत अनेक नवतारकांनी आपला प्रवास सुरु केला आहे आणि त्या यशस्वीसुद्धा झाल्या आहेत. सायली त्यातलीच एक आघाडीची अभिनेत्री.
श्रावण क्वीन सोबतच तिने २०१७ मध्ये ‘रायटर’ हि एक शॉर्ट फिल्म केली होती. पुढे ‘ईघन’ या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित सिनेमातही तिने अभिनय केला होता. सिनेमांसोबातच तिने पुढे स्टार प्रवाहच्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतील मधुराच्या बहिणीची व्यक्तिरेखा बजावली होती. मधुराच्या व्यक्तिरेखेत नम्रता प्रधान हिने अभिनय केला होता. तिच्याविषयी नुकताच एक लेख मराठी गप्पावर प्रसिद्ध झाला आहे तो नक्की वाचा. या मालिकेदरम्यान या दोघींची घट्ट मैत्री झाली होती. या दोघींनीही इतर कलाकारांसोबतहि मस्त ट्युनिंग जमवलं होतं. अनेक मजेशीर विडीयोज शुटींगच्या मोकळ्या वेळेत बनवले होते. त्यांची हीच मस्त केमिस्ट्री त्या मालिकेतही दिसली होती. या मालिकेनंतर सायली आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या स्टार प्रवाहच्या मालिकेत काम करते आहे. जयदीप, गौरी आणि ज्योतिका यांच्या प्रेम त्रिकोणाची हि कहाणी एका उत्कंठावर्धक वळणावर आलेली आहे. आधीच्या मालिकेप्रमाणेच या मालिकेतही तिने आपल्या सहकलाकारांसोबत उत्तम गट्टी जमवली आहे.
मालिका आणि सिनेमा प्रमाणेच तिने वेबसिरीज या दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चाललेल्या माध्यमातूनही अभिनय केला आहे. फुल टाइट या वेब सिरीजमध्ये तिने बिनधास्त मुलीची भूमिका निभावली होती. तसेच सागरिका म्युझिकच्या ‘सुवासिनी’ या गाण्यातही तिने अभिनय केलेला आहे. कलाकार हे नेहमी जास्त संवेदनशील असतात असं म्हंटलं जातं. सायली यांस अपवाद नाही. तिने तिच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृती करण्यासाठी वेळोवेळी हातभार लावला आहे. सायली हिचा कलाप्रवास हा गेल्या काही वर्षांचा असला तरीही त्यात तिने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. तिने अभिनय केलेल्या प्रत्येक कलाकृतींचे विषयही वेगवेगळे होते. तसेच माध्यमंही वेगवेगळी आहेत. त्यामुळे तिच्याकडे कमी काळात अभिनयाचा चांगला अनुभव जमा झाला आहे, असं आपण म्हणू शकतो. येत्या काळात याच अनुभवाच्या जोरावर ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकेतून आणि वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या भेटीस येईल हे नक्की. तिच्या ज्योतिका या व्यक्तिरेखेसाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)