काही काळापूर्वी अनलॉक सुरु झालं आणि त्यातून गेले काही महिने मरगळ आलेलं मनोरंजन क्षेत्र उभारी घेऊ लागलं. यात आव्हानं होतीच पण या क्षेत्रात म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार ती आव्हानं पेलली गेली. यातील एक आव्हान होतं ते म्हणजे काही कलाकरांची अनुपस्थिती असल्यामुळे नवीन कलाकार जुन्या भूमिकांमधून आणणे. पण यानिमित्ताने काही नावाजलेले कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यातील एक लोकप्रिय नाव म्हणजे रुपाली भोसले. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना या खलभूमिकेसाठी त्यांची निवड झाली आणि या महत्वाच्या भूमिकेत रुपाली या दिसू लागल्या. मालिका हि उत्तम वळणावर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने रुपाली यांच्या अभिनय प्रवासाचा हा धांडोळा घेण्याचा प्रयत्न.
रुपाली यांना अभिनय करण्याचा खूप उत्तम अनुभव आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यातही खासकरून मालिकेत. कारण त्यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेसोबतच ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘एक झोका नियतीचा’ या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका बजावली होती. त्यांना त्यांच्या करियर मध्ये सहसा मुख्य भूमिका मिळत आल्या आहेत. पण त्याचमुळे त्यांना एखादी खल भूमिका करण्याची इच्छा होती. ती ‘आई कुठे काय करते’ च्या निमित्ताने पूर्ण झाली आहे, असं म्हणू शकतो. रुपाली यांनी मराठी सोबतच हिंदी मालिकांतही काम केलं आहे. ‘बडे दूर से आए है’, ‘तेनाली रामन’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. यातील ‘बडे दूर से आए है’ या मालिकेत त्यांनी वर्षा घोटाला हि भूमिका निभवली होती. या मालिकेत सुमित राघवन हे मुख्य भूमिकेत होते. या दोघांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची फारच उत्तम पसंती मिळाली होती.
मालिकांसोबतच त्यांनी ‘बिग बॉस’ मराठी च्या दुसऱ्या सीजनमध्ये भाग घेतला होता. प्रत्येक रियालिटी शो गाजण्यामागे काही कलाकारांचा त्यातला सहभाग फार महत्वाचा असतो. रुपाली या अशाच एक महत्वाच्या स्पर्धकांपैकी एक होत्या. रुपाली यांनी जवळपास १० हून अधिक नाटकांतून कामे केली आहेत. ‘जागो मोहन प्यारे’ हे त्यांचं व्यावसायिक असं पहिलं नाटक. त्याआधी त्यांनी एकांकिका केल्या होत्या. त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना अभिनयासोबत एक नोकरी करून नाटकांत काम करावं लागे. पण रुपाली यांनी हे सगळं संभाळलं. कारण त्यांची स्वप्ने नेहमीच मोठी होती. तसेच काम करत रहाणं त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी अभ्यासासोबत आई वडिलांना कामात मदत करणं सुरु केलं होतं. त्यामुळे आलेला अनुभव, माणसांची पारख या सगळ्यांमुळे आयुष्यात नंतर आलेल्या प्रत्येक वादळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिलं.
त्यांनी केलेल्या अनेक नाटकांपैकी ‘गां-धी ह-त्या आणि मी’ हे अजून एक गाजलेलं नाटक. यात त्यांनी सिंधू हि महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. नाटकांसोबत त्यांनी रंगमंचावर नृत्यांगना म्हणूनही स्वतःचा ठसा उमटवला आहे. ‘एका पेक्षा एक’ या रियालिटी शो मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मालिका, नाटक यांच्या सोबत त्यांनी सिनेमातही काम केलं आहे. सुमित राघवन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘संदुक’ या सिनेमात त्या होत्या. तसेच ‘रिस्क’ या हिंदी सिनेमातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. रुपालीच्या प्रियकराचे नाव अंकित मगरे असून दोघांची पहिली भेट एक कॉफी शॉप मध्ये झाली होती. त्यावेळी रुपालीने सफेद रंगाचे टी शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. तिला पाहताच अंकित तिच्या प्रेमात पडला होता. रुपालीलाही अंकितचे बोलणे, त्याचे कामाप्रती असलेले प्रेम आणि त्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप भावला. अंकित हा चित्रपट निर्माता असून त्याने ‘गडद जांभळ’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचसोबत ‘मराठी बॉक्स क्रिकेट’ संघाचा तो मालकही आहे.
या सगळ्या कामाच्या धावपळीत त्यांनी स्वतःची कुकिंगची आवड जपली आहे. त्यांना भारतीय तसेच पाश्चिमात्य रेसिपीज करायलाही खुप आवडतात. त्याच आवडीचा परिपाक कि काय पण रुपाली यांनी नुकतच स्वतःच युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. त्यात त्या विविध चविष्ठ रेसिपीज त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन येत असतात. त्यांनी ‘सुगरण’ या कुकिंग शोचं सूत्रसंचालनहि केलं होतं. जवळपास दोन दशकांच्या या वाटचालीत रुपाली यांनी एक मोठ्ठा ब्रेक घेतला होता. पुन्हा त्या ब्रेक नंतर पदार्पण करणं तसं कठीण. पण नेहमीच सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहणाऱ्या रुपाली यांनी त्यावरही मात केली. नेहमी सकारात्मक रहाणं आणि स्वतःचं निश्चित ध्येय असणं याचा रुपाली यांना नक्कीच फायदा झाला असणार. त्यांच्या मुलाखातीत्तून त्यांच्या खंबीर आणि निश्चयी स्वभावाची छाप प्रेक्षकांवर पडल्याखेरीज राहत नाही. अशा या बिनधास्त आणि कणखर अभिनेत्रीच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)