Breaking News
Home / मराठी तडका / खऱ्या आयुष्यात अश्या आहेत गोपिकाबाई, पती आहेत प्रसिद्ध मराठी अभिनेते

खऱ्या आयुष्यात अश्या आहेत गोपिकाबाई, पती आहेत प्रसिद्ध मराठी अभिनेते

गोपिकाबाई. एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा. सध्या चालू असलेल्या स्वामिनी मालिकेतील मध्यवर्ती पात्रांमधील एक. गुंतागुंतीची व्यक्तिरेखा. पण ऐश्वर्या नारकर यांनी ज्या कुशलतेने हि व्यक्तिरेखा उभी केली आहे त्याचं कौतुक वाटतं. गेली कित्येक वर्ष त्यांच्या अशाच विविध भूमिकांबद्दल प्रेक्षकांना सदैव कौतुक वाटत आलं आहे. त्यांनी साकारलेली महाश्वेता मधील भूमिका असो, लेक माझी लाडकी मधली आई असो, किंवा सोयरे सकळ या लोकप्रिय नाटकातील दोन्ही भूमिका. महाश्वेता या मालिकेस जरी खूप काळ लोटला असला तरीही ऐश्वर्याजी यांच्या अभिनय करियरमधला तो महत्वाचा टप्पा होता हे नक्की. महाश्वेता नंतर त्यांनी मालिका, नाटक, सिनेमा या तीनही माध्यमांतून विवध भूमिका साकारल्या आणि त्यांच्या लौकिकाला साजेसा असा अभिनय करून तीनही माध्यमं गाजवली. त्यांच्या अभिनय असलेल्या लोकप्रिय कलाकृती म्हणजे या सुखांनो या, समांतर, तिघी, ओळख, झुळूक, घे भरारी, सून लाडकी सासरची, गंध निशिगंधाचा. त्यांनी हिंदीतही काम केलं आहे. घर कि लक्ष्मी बेटीयां या मालिकेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.

यातील गंध निशिगंधाचा या नाटकाच्या निमित्ताने त्यांची प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्याशी ओळख झाली. दोघांनी पुढे लग्न केलं. त्या आठवणी जाग्या करताना, अविनाशजी नेहमी म्हणतात कि ऐश्वर्याजींना त्यांनी पाहिलं आणि त्याचवेळी ठरवलं होतं कि त्यांच्याशी लग्न करायचं. नाटकाच्या तालमी, प्रयोग आणि मग दौरे सुरु झाले. या काळात, ऐश्वर्याजींना कळत होतं कि अविनाशजी त्यांना पसंत करतात. पण आधी त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती घेतली, मग पुढाकार घेतला. त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं नाही पण एकमेकांना आपण आवडतो या भावना एकमेकांना सांगितल्या गेल्या. पहिल्यांदा ओळख झाल्यापासून ते भावना व्यक्त करेपर्यंतचा प्रवास दोन ते अडीच वर्षांचा होता, एव्हाना त्या नाटकाचा शेवटचा दौरा चालू होता. पुढे अविनाश यांनी ऐश्वर्याजींच्या घरी जाऊन रीतसर मागणी घातली. घरून विरोधाचा प्रश्नच नव्हता. अशा प्रकारे त्यांचं लग्न झालं.

हि लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा श्रीमंता घरची सून या मालिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. मालिकेच्या जाहिरातींवरून ऐश्वर्याजींची भूमिका सकारात्मक आणि प्रेमळ सासूची दिसते आहे. या निमित्ताने या कसलेल्या जोडीचा अभिनय पुन्हा एकत्र पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. तशी ती संधी आपल्याला सोयरे सकळ या नाटकातूनही आली होतीच. या नाटकाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ऐश्वर्याजींना हि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषदेमार्फत मिळाला होता. २०१८ साली आलेल्या या नाटकाने अत्यंत आनंद दिला असल्याचं ऐश्वर्याजींनी अनेक ठिकाणी नमूद केलं आहे. नाटकांप्रमाणेच त्यांना त्यांच्या तिघी, ओळख, झुळूक या सिनेमांसाठीहि पुरस्कार मिळाले आहेत.

अभिनयाव्यतिरिक्त स्वतःच्या फिटनेसलाही त्या महत्व देतात. आधी जरी वाचनाची खूप आवड नसली तरीही त्यांनी लॉकडाऊनमध्ये खूप वाचन केल्याचं एका मुलाखतीत नमूद केलं होतं. तसेच त्यांना विविध ठिकाणांना भेटी द्यायलाही आवडतं आणि शॉपिंग करायलाही आवडतं. नुकतंच त्यांनी आणि अविनाशजींनी, कविता मयेकर आणि विमोल मयेकर यांच्या सोबत एक कॅफे सुरु केला आहे. हा कॅफे बोरीवलीला असून, त्याचं नाव आहे ‘द वडापाव कॅफे’. हा कॅफे सुरु झाल्यानंतर या जोडीने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यातून अस्मिता संस्थेच्या दिव्यांग-अस्थिव्यंग असणाऱ्या मुलामुलींना मदत होणार होती. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. सुनील बर्वे, अश्विनी कासार यांनीही याउपक्रमाअंतर्गत प्रेक्षकांनी कॅफेला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. अभिनय, व्यवसाय सांभाळता सांभाळता, सामाजिक बांधिलकी कशी जपायची याचं हे एक उदाहरण.

आयुष्य आनंदाने जगणं महत्वाचं तसेच कुटुंब, काम यांच्यासोबत स्वतःला सुद्धा थोडा वेळ देत ते जगायला हवं असं ऐश्वर्याजींनी एका मुलाखतीत नमूद केलं होतं. त्या स्वतः सुद्धा आनंदी आयुष्य जगताना दिसतात. त्यांच्या सोशल मिडिया अकाउंट वरून नेहमी सकारात्मक वाटेल अशाच पोस्ट्स असतात. तसेच आपल्याला मिळालेलं प्रत्येक काम झोकून देऊनच करायला हवं असं त्याचं म्हणणं असतं. त्याचमुळे आजच्या घडीला त्या नायिका-खलनायिका, ऐतिहासिक ते नवीन काळातील अशा विविध भूमिकांतून तेवढाच आनंद प्रेक्षकांना देतात. अशा या गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्रीला त्यांच्या नवीन मालिकेसाठी आणि येत्या इतर कलाकृतींसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *