Breaking News
Home / मराठी तडका / खऱ्या आयुष्यात अश्या आहेत आसावरी, चित्रपटाव्यतिरिक्त स्वतःचा आहे लोकप्रिय बिझनेस

खऱ्या आयुष्यात अश्या आहेत आसावरी, चित्रपटाव्यतिरिक्त स्वतःचा आहे लोकप्रिय बिझनेस

आसावरी आणि बबड्या हे सध्या प्रत्येक मराठी कुटुंबामधे चर्चेचा विषय आहेत. त्यांच्यावर कित्येक मिम्स पण बनत आहेत. दोन्ही कलाकारांनी केलेल्या कामाचं हे चीजच म्हणायला हवं. आसवारीचं काम करणाऱ्या निवेदिताजी सराफ यांनी तर आपल्याला कित्येक दशके स्वतःच्या अभिनयाने आनंद दिला आहे. नाटक, सिनेमा, सिरियल्स मध्ये काम करता करता त्यांनी स्वतःचे छंद त्यांनी जोपासले आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी आज जाणून घेऊयात..

निवेदिताजी यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण करण्याअगोदर मोठा पडदा गाजवला आहे, हे आपल्याला माहिती आहेच. अशी हि बनवाबनवी, धूम धडाका, दे दणादण, थरथराट, आमच्या सारखे आम्हीच, आणि अशी कित्येक नावं घेता येतील. त्यांनी अभिनय, नृत्य यात स्वतःच कौशल्य सिद्ध केलं. पण, किती जणांना हे माहिती आहे कि त्यांचा हा प्रवास बालकलाकार म्हणून सुरु झाला होता. अपनापन या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होत. पुढे सिनेसृष्टीत काम करता करता त्यांची ओळख अशोकजी सराफ यांच्याशी झाली. वयात जवळपास १८ वर्षाचं अंतर असतानाही दोघांनी लग्न केलं. खऱ्या प्रेमाला वयाचं बंधन नसतं हेच खरं. आजही या जोडीकडे पाहिलं कि प्रसन्न वाटतं ते याचमुळे.

त्यांना एक मुलगा आहे, ज्याचं नाव अनिकेत. आज तो एक प्रथितयश कुक आणि प्रसिद्ध युट्युबर आहे. आणि त्याच्या या करियर निवडीमागे निवेदिताजी यांची कुकिंगची आवड असल्याचं तो सांगतो. त्यांची कुकिंगविषयीची आवड आपल्याला त्यांच्या सोशल मिडीयावरही पाहायला मिळते. त्या नेहमी स्वतः केलेल्या रेसिपीज शेयर करत असतात. अभिनय करता करता त्या बाकीच्या कामांमध्येहि पुढे असतात याचं हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण म्हणजे त्यांना मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला आवडतं. त्यांनी वसई-विरार मॅरेथॉन मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. आपलं नेहमीचं काम करताना, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं हे केवळ त्या सांगत नाहीत तर त्या ते जगतात असंच म्हणायला हवं आहे. पण म्हणून त्या एवढ्यावरच थांबल्या आहेत असं नाही. त्यांनी स्वतःचा एक बिजनेस सुद्धा सुरु केला आहे. त्याचं नाव हंसगामिनी. विविध प्रकारच्या साड्या त्यांना स्वतःला आवडतात. असच एकदा त्यांना कळलं कि एके ठिकाणी पुरामुळे स्थानिक साडी कलाकारांचं नुकसान झालं आहे.

त्यांच्या मनाने ठरवलं कि या दुर्दैवी कलाकारांना मदत करावी. आणि त्यांनी आपल्या मैत्रिणीबरोबर पुढाकार घेतला आणि न नफा न तोटा या तत्वावर त्या साड्या विकण्यात मदत केली. त्यांना साड्यांमध्ये आवड होतीच पण मग हा व्यवसाय चालतो कसा हे पहायची उत्सुकता सुद्धा निर्माण झाली. त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत यातली तंत्रशुद्ध माहिती घेतली. आणि मग या व्यवसायात त्या उतरल्या आहेत. आज त्या स्वतःच्या या व्यवसायाचं प्रदर्शन सुद्धा भरवतात. त्यांच्याशी बोलताना एक जाणवतं कि, त्यांनी फक्त पैसे कमावण्यासाठी हा व्यवसाय सुरु केलेला नाही. त्यापाठीमागे आहे त्यांची आवड आणि कामात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती.

तर अशा या अष्टपैलू अभिनेत्रीकडून आपण काय शिकतो तर, ज्या विषयात तुम्हाला आवड असेल त्याची तंत्रशुद्ध माहिती घ्या. कलाक्षेत्रा असो वा व्यवसाय, झोकून देऊन काम करा. आणि हे सगळं करताना वयाने साथ द्यायला हवीच, म्हणून फिटनेस कडेही पूर्ण लक्ष असूद्यात. (Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *