मराठी गप्पावर अशी ही बनवा बनवी च्या ३२ वर्षपूर्ती निमित्त एक लेख प्रसिद्ध झाला होता. अशोकजी सराफ यांनी आपल्या विविध मुलाखतींतून सांगितलेले किस्से आम्ही आपल्या वाचकांसाठी सादर केले होते. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादाबद्दल टीम मराठी गप्पाकडून मनापासून धन्यवाद. या चित्रपटातील परशुराम म्हणजेच परश्याची भूमिका अजरामर केली ती लक्ष्मीकांतजी बेर्डे यांनी. त्यांनी दोनशेच्या आसपास सिनेमे आणि कित्येक नाट्यकृती साकार केल्या. त्यांच्या यांतील जवळपास प्रत्येक भूमिका गाजली. त्यांनी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. २६ ऑक्टोबर हा लक्ष्मीकांतजींचा वाढदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेण्याचा टीम मराठी गप्पाचा हा प्रयत्न.
लक्ष्मीकांतजी यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ सालचा. लहानपणापासून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडावी. त्यांना अगदी लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण काळात अनेक गणेशोत्सवातील कार्यक्रम, एकांकिका आणि नाटकांतून काम केलं. तसेच साहित्य संघात काही काळ कामंही केलं. त्यांच्या व्यावसायिक नाट्यप्रवासाची सुरुवात झाली ती टूरटूर या नाटकाच्या निमित्ताने. या नाटकाने त्यांना जनमानसात प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी या व्यतिरिक्त अनेक नाटकांतून कामे केली. शांतेचं कार्ट चालू आहे, घरात हसरे तारे, बिघडले स्वर्गाचे दार, लेले विरुद्ध लेले अशी अनेक नाव देता येतील. या निमित्ताने एक किस्सा जो महेश कोठारेजींनी आपल्या अनेक मुलाखतीतुन सांगितला आहे तो नमूद करावासा वाटतो.
लक्ष्मीकांत जी यांचं काम नाट्यवर्तुळात गाजत होतं. नुकतच बबन प्रभू यांचं दुः खद नि धन झालं होतं. त्यांना श्र द्धांजली द्यावी म्हणून त्यांचं नाटक पुनरुज्जीवित करायचं असं ठरवून काही जेष्ठ नाट्यकर्मी एकत्र आले. त्यात महेश कोठारे यांचे आई-वडील ही होते. त्यांनी ज्या नाटकाचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं ते नाटक म्हणजे ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि त्यातील बबन प्रभू साकारत असलेली भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांना मिळाली. महेशजी एकदा या नाटकाची तालीम बघायला म्हणून गेले. तालमीतील लक्ष्मीकांत बेर्डे यांचं काम बघून महेशजींनी तात्काळ त्यांना आपल्या नवीन सिनेमासाठी साइन केलं ते केवळ एक रुपया देऊन. त्याआधी महेशजी हे अभिनेता म्हणून कार्यरत होते. पण आत्ता ते दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर त्यांचा पहिला चित्रपट घेऊन येणार होते. एका लोकप्रिय हिंदी सिनेमावर आधारित हा सिनेमा होता आणि या चित्रपटातील मेहमूद यांच्या भूमिकेसाठी त्यांना नट मिळत नव्हता. लक्ष्मीकांतजींच्या रूपाने हा शोध थांबला. त्यावेळी ज्या सिनेमासाठी त्यांना साइन केलं गेलं तो सिनेमा होता, धुमधडाका. पुढे या सिनेमाने इतिहास रचला तो सर्वज्ञात आहे. महेशजींना पदार्पणातच उत्तम दिग्दर्शक असा मान मिळवून दिला, लक्ष्मीकांतजी यांनाही मानसन्मान आणि लोकप्रियता मिळाली.
या चित्रपटाप्रमाणे, लक्ष्मीकांत यांनी पुढे अनेक लोकप्रिय चित्रपट आपल्याला दिले. सचिनजी आणि महेशजी यांच्या सोबत त्यांचे अनेक चित्रपट गाजले. अशी ही बनवाबनवी, शेम टू शेम, झपाटलेला, थरथराट, दे दणादण, भुताचा भाऊ ही त्यातली काही लोकप्रिय उदाहरणे. त्यांनी अनेक चित्रपटात अशोक सराफ यांच्या सोबतही काम केले. या विनोदी जोडगोळीच्या एकत्र येण्याने अनेक लोकप्रिय आणि कालातीत व्यक्तिरेखा आणि संवाद जन्माला आले. मराठी सिनेमातील हा प्रवास चालू असताना, त्यांनी अनेक हिंदी सिनेमेही केले. त्यातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. मैने प्यार किया, हम आपके है कौन हि त्यातली काही सुप्रसिद्ध चित्रपटांची नावं.
आपल्या कारकिर्दीत, अखेर पर्यंत हा कलावंत आपल्याला हसवत राहिला. पण त्यांनी विनोदी भूमिकांसोबतच, उत्तम अशा गंभीर भूमिकाही केल्या. ‘एक होता विदूषक’ ही त्यातलीच एक अजरामर कालाकृती. यातील एका अभिनेत्याचा प्रवास त्यांनी मांडला होता. शोकांतिका म्हणावी अशी हि एक उत्तम भूमिका त्यांनी साकारली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या कलाकृती पर्यंत हा मनस्वी कलाकार आपल्याला केवळ आणि केवळ आनंदच देऊन गेला. १६ डिसेंबर २००४ ह्या दिवशी त्यांचं नि धन झालं. अकाली म्हणावं असं हे जाणं होतं कारण ते गेले त्यावेळी अवघ्या ५० वर्षांचे होते. मराठी, हिंदी सिने आणि नाट्य सृष्टी हळहळली. प्रेक्षकांचं दुःख्ख त्याहून निराळं नव्हतं. त्यांना आपल्यातला वाटणारा त्यांचा आवडता कलाकार लक्ष्या हे जग सोडून गेला होता.
आपल्या आयुष्यात लक्ष्मीकांतजी यांनी यशाचा खूप मोठा प्रवास अगदी कमी काळात केला. त्यांच्यातल्या अभिनय क्षमतेला विनोदी, गंभीर भूमिका, मराठी आणि हिंदी भाषेतील कलाकृती, नाटक, सिनेमा, मालिका यातून त्यांनी पुरेपूर वाव दिला. सोबत वक्तशीर असणं, कामातील शिस्त हे गुण सुद्धा त्यांनी पाळले. एकदा एका अनुभवी अभिनेत्याने आपली आठवण सांगताना एक किस्सा सांगितलं होता. ज्यात, दिलेल्या वेळेपेक्षा तो अभिनेता उशिरा आला. तेव्हा लक्ष्मीकांत जी त्यांना ओरडले होते. वेळेचं महत्व पटवून दिलं होतं. कलाकार मोठे का होतात, याचं हे चालतं बोलतं उदाहरण. आपल्या अभिनयाच्या ताकदीची कल्पना असतानाही, वेळेबाबत हयगय न करण्याचा हा गुण घेण्यासारखा. वक्तशीरपणा त्यांनी कधी सोडला नाही. असे हे आपल्या सगळ्यांना आवडणारे लक्ष्मीकांतजी बेर्डे. त्यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. पण त्यांच्या सिनेमा आणि नाटकांच्या चित्रफितीतून ते आपल्याला आजही आनंद देतात, त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयात ते अजूनही आठवणींच्या स्वरूपात जीवंत आहेत आणि सदैव राहतील हे नक्की. या लेखाच्या निमित्ताने, मराठी गप्पाच्या टीमचा या अवलिया कलाकाराला मानाचा मुजरा !
वर महेशजी कोठारे यांच्या एक किश्शाचा उल्लेख झाला होता. आपल्या पैकी अनेकांनी त्यावरील माहितीपूर्ण लेख वाचला असेल. पण जर वाचला नसेल तर वर उपलब्ध असलेल्या सर्चचा वापर करून, आपण महेश कोठारे असं सर्च केलंत तर तो लेख मिळू शकेल. आपण देत असलेल्या वेळेबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)