Breaking News
Home / मराठी तडका / खऱ्या जीवनात कसे आहेत भाऊ कदम, बघा भाऊंचा जीवनप्रवास

खऱ्या जीवनात कसे आहेत भाऊ कदम, बघा भाऊंचा जीवनप्रवास

भालचंद्र कदम. आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ कदम. नुकताच त्यांना ‘सतीश तारे आनंद पुरस्कार’ जाहीर झाला. त्यांच्या ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकातील भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला. या पुरस्काराचं वैशिष्ठ्य म्हणजे मराठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी एकत्र येऊन सतीश तारे यांच्या स्मृतीपिर्त्यर्थ हा पुरस्कार, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांतील सर्वोत्तम कामासाठी देण्याचं ठरवलं आहे. भाऊंना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी गप्पाच्या वाचकांच्या वतीने आणि मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांचं अभिनंदन. या पुरस्कारानिमित्त भाऊंच्या अभिनय प्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा, मराठी गप्पाचा हा प्रयत्न आहे.

भाऊंचा जन्म मुंबईचा. भाऊंची लहानपणापासून निरीक्षण शक्ती एकदम उत्तम. आजही त्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या अनेक भूमिका या विविध लकबींमुळे गाजतात ते याचमुळे. उत्तम निरीक्षण शक्तीचा वापर त्यांनी अभिनय करायची सुरुवात केल्यापासून तितक्याच, उत्तमरीतीने केला आहे. तसेच संवादफेकीचं टायमिंगहि उत्तम. त्यांची सुरुवात एकांकिका आणि नाटकांतून झाली. भूमिका उत्तम वठत होत्या, प्रेक्षकांची दाद मिळत होती पण अफाट लोकप्रियता मिळेल असं काही हाताला गवसत नव्हतं. त्यात त्यांच्या वडिलांचं अकाली नि धन झालं होतं. त्यामुळे भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय, डोंबिवली येथे रहायला गेले होते. नाटकांत काम करून पुरेसे पैसे मिळत नसत. पण घर चालावायचं म्हणून त्यांनी पानाची गादी सुरु केली. या खडतर दिवसांत त्यांना साथ लाभली ती कुटुंबियांची. खासकरून त्यांच्या पत्नीची. त्यांचं नाव ममता कदम. आजही त्या भाऊंच्या पाठीशी तेवढ्याच खंबीरपणे उभ्या आहेत.

काळ कितीही खडतर असला तरीही कधी ना कधी ओसरतोच आणि सुकाळ सुरु होतो. भाऊंच्या आयुष्यातील अशाच काळात, ‘फु बाई फु’ चं आगमन झालं. या स्पर्धेचं विजेतेपदही त्यांनी मिळवलं. पुढे फु बाई फु चे प्रयोग होत असताना, ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. फु बाई फु गाजवत असणाऱ्या भाऊंचा अर्थातच समावेश झाला. पुढे या कार्यक्रमाने जो इतिहास घडवला तो सर्वज्ञात आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी अनेकविविध भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःची अशी लकब पेश केली. त्यांचं विनोदाचं टायमिंग तर अफाट. याचमुळे त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहतात. आजतागायत त्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना जो आनंद दिला त्यात भाऊंचा महत्वपूर्ण वाटा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये, इतकं भाऊ आणि चला हवा येऊ द्या चं घट्ट नातं निर्माण झालं आहे. या कार्यक्रमाप्रमाणेच भाऊंनी रंगमंचावरचा वावर चालू ठेवला. एक डाव भटाचा, करून गेलो गाव, शांतेचं कार्ट चालू आहे हि त्यांच्या कारकिर्दीतली अग्रगण्य अशी नाटकं.

नाटकांसोबत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये कामं केली आहेत. ‘टाईमपास’ या रवी जाधवांच्या सिने सिरीजमधील दोन्ही सिनेमांत ते होते. त्यातील त्यांच्या भूमिकेस प्रेक्षक पसंती मिळाली होती. वी. आय.पी. गाढव, सायकल, नारबाची वाडी, आलटून पालटून, शहाणपण देगा देवा, हाफ तिकीट, झाला बोभाटा, नशीबवान हे त्यांचे अन्य काही सिनेमे. यातील बहुतांश गाजले. त्यांच्या भूमिकांचं कौतुक झालं. यातील हाफ तिकीट या सिनेमाला सकाळ सन्मान पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच परदेशातही हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मराठीसोबतच त्यांनी फरारी कि सावरी या हिंदी सिनेमातही काम केलेलं आहे.

रंगमंच, टेलीविजन, सिनेमा अशा सगळ्या प्रस्थापित मनोरंजन माध्यमांत स्वतःचं असं स्थान त्यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेलं आहेच. पण म्हणून नवीन माध्यमांतील नवीन प्रयोग त्यांनी अव्हेरले असं झालं नाही. त्यांनी लिफ्टमन हि वेब सिरीज काही काळापूर्वी केली होती. तसेच स्ट्रगलर साला या प्रसिद्ध मराठी वेब सिरीजच्या लंडन येथील एका महत्वपूर्ण भागात ते होते. तसेच भुताचा जन्म या शॉर्ट फिल्ममध्येही त्यांनी काम केलं आहे. द. मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित अशी हि शॉर्ट फिल्म आहे. आत्तापर्यंत बारा लाखांहून अधिक लोकांनी हि शॉर्ट फिल्म बघितली आहे. तसेच ओसरत चाललेल्या लॉक डाऊनमध्येही ऑनलाईन माध्यमांतून भाऊ आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होते. ‘कृतज्ञता’ या कलाकरांच्या विडीयोमध्येही त्यांचा सहभाग होता. या विडीयोच्या माध्यमांतून को-विड वॉरीयर्सना सलाम केला गेला होता.

भाऊंच्या पत्नीचे नाव ममता असून त्यांना तीन मुली आहेत. मृण्मयी, समृद्धी आणि संचित अशी त्यांची नावे आहेत. आज भाऊ हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. भाऊंची कामावरची निष्ठा, उत्तम निरीक्षण शक्तीचा तेवढाच उत्तम वापर आणि अर्थातच कुटुंबाचा भक्कम पाठींबा यामुळे आज त्यांनी यश संपादन केलेलं आहे. पण आजही भाऊंचा साधा स्वभाव काही बदललेला नाही. ते आजही कुटुंबाशी, प्रेक्षकांशी तेवढेच प्रामाणिक आहेत जेवढे सुरुवातीपासून होते. त्यांचा हाच प्रामाणिकपणा त्यांच्या भूमिकांतून नेहमी झिरपतो आणि म्हणूनच केवळ प्रसिद्ध न होता, भाऊ लोक-प्रिय होतात. अशा या लोकांच्या निखळ प्रेमास पात्र ठरलेल्या तेवढ्याच निर्मळ मनाच्या कलाकारास मराठी गप्पाचा मानाचा मुजरा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *