काही सिनेमे कधीही आणि किती वेळा बघा. त्यातल्या कलाकारांमुळे त्यातला ताजेपणा नेहमीच टिकून असतो. असाच एक लोकप्रिय सिनेमा म्हणजे, गाढवाचं लग्न. काही वर्षांपूर्वी आलेला हा सिनेमा आजही आपल्या स्मरणात नक्कीच असणार. यातील सावळ्या कुंभार आणि गाढव झालेला गंधर्व यांनी तर अगदी धम्माल उडवून दिली होती. पण त्यांच्या बरोबर अजून एक व्यक्तिरेखा होती जिने पूर्ण सिनेमात आपल्याला हसवून हसवून सोडलं होतं. ती व्यक्तिरेखा म्हणजे सावळ्या कुंभाराची बायको गंगी. तिचं तिखट बोलणं, शाब्दिक कोट्या आणि चेहऱ्यावरचे हावभाव यांच्यामुळे मकरंदजींच्या सावळ्या कुंभारासमोर तेवढ्याच ताकदीने गंगीची व्यक्तिरेखा उभी राहिली. पण हि गंगी साकारली होती कोणी ? आणि आत्ता पुन्हा गंगीची चर्चा का होते आहे ?
हि लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच नाव आहे राजश्री लांडगे. राजश्री या अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी ‘गाढवाचं लग्न’ हा सिनेमा करण्याअगोदरही काम केलं होतं. पण प्रत्येक कलाकाराच्या काही भूमिका त्यांची ओळख बनून जातात. त्यांच्या आयुष्यात त्यांची अभिनेत्री म्हणून ओळख महाराष्ट्राच्या घराघरात नेली, ती त्यांच्या गंगी या व्यक्तिरेखेने. या व्यक्तिरेखेसाठी त्यांची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा मस्त गावरान पद्धतीचा केला होता. त्यांनी व्यक्तिरेखेचा लहेजा एवढा उत्तम पकडला, कि त्यांच्या या भूमिकेसाठी सगळ्यांकडून खूप कौतुक झालं. त्यांनी पुढे ‘सिटीझन’ नावाचा सिनेमा केला. या सिनेमात त्यांची समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी महत्वपूर्ण अशी राजश्री राजेशिर्के हि भूमिका निभावली होती. हि राजश्री शिर्के म्हणजे गंगी च्या अगदी उलट पेहराव आणि लहेजा असणारी त्यांनी साकारली होती. हि व्यक्तिरेखाही त्यांनी आत्मविश्वासाने साकारली.
या सिनेमात त्यांनी उदय टिकेकर, पुष्कर श्रोत्री, माधव देवचके यांसारख्या लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं. या सिनेमातून तरुणाई, तिच्या विविध छटा मांडल्या होत्या. या सिनेमात त्यांनी अभिनयाबरोबरच निर्माती म्हणूनही भूमिका बजावली होती. अनेक प्रथितयश वर्तमानपत्रांनी सिटीझनचा विषय, त्याची मांडणी आणि राजश्री यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. पण लोकप्रिय भूमिका केल्यानंतर, चहूबाजूंनी कौतुक होत असतानाहि, सरसकट येईल ते सिनेमे करण्यापेक्षा राजश्री यांनी निवडक पण उत्तम कामे करणे पसंत केले. निवडक पण उत्तम काम करण्याकडे कल असलेल्या राजश्री सोशल मिडीयावरही निवडक प्रमाणात असतं. अभिनयाबरोबरच सामाजिक प्रश्नांसाठी काम करणं, मदत करणं यामध्ये त्या आघाडीवर असतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठी सढळहस्ते मदत केली होती. अनेक प्रथितयश वृत्तपत्रांनी त्यांच्या या समाजजाणिवेचं कौतुक केलं होतं. लोकप्रिय कलाकार असताना, सामाजिक भान सांभाळणं फार महत्वाचं असतं आणि या दोन्हीमधला तोल त्यांनी छान सांभाळला आहे असं नक्कीच म्हणता येईल.
पण गेल्या काही काळात त्या अभिनयापासून दूर जातात कि काय असं वाटत असताना, सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. लॉकडाऊन मुळे त्या सोशल मिडीयावर जास्त वेळ येऊ लागल्या. आपले स्टायलिश लुक मधील फोटोज अपलोड करू लागल्या. त्यांच्या चाहत्यांनाही हा सुखद धक्का होताच. आणि मग काय, त्यांच्या नवीन लुकची चर्चा वायरल होऊ लागली. त्यांना स्वतःलाही पारंपारिक आणि वेस्टर्न अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे लुक्स आवडत होतेच. तेव्हा त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी, डोक्यात काहीतरी नवीन प्रोजेक्ट आहे असं एका सोशल मिडिया पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यामुळे बदलेल्या लुक बरोबरच त्या पुन्हा एकदा अभिनेत्री/निर्माती म्हणून आपल्या समोर येतील अशी आशा करायला हरकत नाही. अभिनयाची जाण, छाप पडेल असं उत्तम व्यक्तिमत्व आणि संवेदनशील मन असलेल्या राजश्री यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)