मालिका, सिनेमा ही माध्यमं आपल्याला सतत खुणावत असतात. आपल्यापैकी अनेक जणांना या माध्यमांची प्रेक्षक म्हणून आणि कलाकार म्हणून भुरळ पडते. पण प्रत्येकालाच या माध्यमांत काम करण्याची संधी मिळतेच असं नाही. त्यामुळे अनेक गुणी कलाकारांना अभिनयाची आवड असूनही स्वतःचं कौशल्य पूर्वी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवता येत नसे. पण युट्युब, इतर ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म आल्याने अनेक गुणी कलाकारांना स्वतःची अभिनय कला पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पोहोचवता येते आहे. या कलाकारांना पुढे आणण्याचं काम अनेक वेब सिरीजनी केलं आहे. त्यातील एक लोकप्रिय वेब सिरीज म्हणजे गावरान मेवा. या वेब सिरीजमधील प्रत्येक भागातून विविध व्यक्तिरेखा आपल्या पुढ्यात समाजोपयोगी विषय मांडत असतात.
त्यामुळे ही वेब सिरीज खूपच प्रसिद्ध झाली आहे. तसेच या वेब सिरीज मधील कलाकार सुद्धा. आजच्या या लेखातून आपण अशाच एका गुणी अभिनेत्रीच्या कारकीर्दीची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत जी, गावरान मेवा या वेब सिरीज मधील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारते आहे. गावरान मेवा मधील ही व्यक्तिरेखा म्हणजे प्रिया आणि ती साकारली आहे ऐश्वर्या कांबळे या अभिनेत्रीने. ऐश्वर्या मुळची अहमदनगरची. तिचं बालपण आणि शिक्षण अहमदनगर येथे झालं. तिला लहानपणा पासून कलाक्षेत्राची आवड. ती उत्तम नृत्यांगना आहे. नृत्याची आवड जोपासत असताना तिला काही ब्रँड्स कडून मॉडेलिंग करण्यासंदर्भातही विचारणा झाली. तसेच अभिनय करण्याचीही संधी चालून आली. कलाक्षेत्राची आवड असल्याने नृत्यासोबत तिने या क्षेत्रांतही काम करणं सुरू केलं. शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज मधून तिने मुख्यत्वे अभिनय केला आहे. त्यात गावरान मेवा आणि उचापत्या या तिच्या गाजलेल्या वेब सिरीज. दोन्ही मधील तिच्या अनुक्रमे प्रिया आणि ममता या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या.
तिच्या अभिनयाचा प्रवास आता गतिशील झाला असताना म्युझिक व्हिडियो मध्ये काम करण्याचीही संधी तिला चालून आली. तिने त्यातही उत्तम अभिनय केला. लय लय भारी, चांद मातला हे तिचे प्रसिद्ध म्युझिक व्हिडियोज. एका युट्युब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत येत्या काळात तिची अजून ऐक वेब सिरीज एम. एक्स. प्लेयर वर दाखल होईल असं तिने सांगितलं आहे. ऐश्वर्या हीचा हा प्रवास प्रतिशील टप्प्यावर आहे असं म्हणता येईल. नृत्य, अभिनय, मॉडेलिंग या विविध माध्यमांतून काम करताना तिने दाखवलेलं सातत्य हे कौतुकास्पद आहे. तिने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे पुढे जाऊन चित्रपट क्षेत्रात स्वतःला अभिनय करताना पाहणं, हे तिच्यासाठी एक ध्येय आहे. तिच्या या ध्येयासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)